स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली आणि देशाचे बहुस्तरीय हवाई व क्षेपणास्त्र संरक्षण कवच कसे असेल, याविषयी चर्चा सुरू झाली. खरेतर या प्रणालीचा प्रभाव सिंदूर मोहिमेत अधोरेखित झाला होता. आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपात हवाई हल्ल्यांपासून मजबूत संरक्षण आणि शत्रुवर जोरदार प्रतिहल्ल्याची सज्जता राखणे महत्त्वाचे ठरते. त्याच दिशेने सुदर्शन चक्र मोहीम मार्गक्रमण करणार आहे.
स्वदेशी संरक्षण कवच
लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील सामरिक स्थळांसह रुग्णालय, रेल्वे आणि श्रद्धास्थाने अशा महत्त्वाच्या ठिकाणांना आधुनिक तंत्रज्ञानाने राष्ट्रीय संरक्षण कवच देण्याचे जाहीर केले. २०३५ पर्यंत त्याचा परीघ बळकटीकरण आणि आधुनिकीकरणापर्यंत विस्तारणार आहे. महाभारतातील युद्धात श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राप्रमाणे अचूक लक्ष्यभेदासाठी शक्तिशाली शस्त्रप्रणाली विकसित केली जाईल, जी भविष्यातील युद्धाच्या कोणत्याही तंत्रात सरस ठरेल. महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रणालीचे संशोधन, विकास आणि निर्मिती भारतातच झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजे राष्ट्रीय हवाई व क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ही स्वदेशी असणार आहे.
वेळ आणि निकड
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे अलीकडेच नेहमीप्रमाणे बरळले. अमेरिकेतील एका चहापान कार्यक्रमात त्यांनी भारतासह जगाला अणू हल्ल्याची थेट धमकी दिली. पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आल्यास ते अणुयुद्ध छेडतील. सिंधू जल करार स्थगित करून भारताने आमच्या लोकांना उपासमारीच्या संकटात ढकलले. पाकिस्तानचा पाणी पुरवठा रोखण्यासाठी भारताने कोणतेही धरण बांधल्यास आम्ही ते क्षेपणास्त्रांनी उडवू, अशी धमकी मुनीर यांनी दिली. मुळात पाकिस्तानच्या अणू युद्धाच्या धमक्यांना भीक घातली जाणार नाही आणि कोणत्याही दहशतवादी कृत्याला युद्ध मानले जाईल, असे भारताने सिंदूर मोहिमेनंतर बजावले आहे. मुनीर यांची धमकी आल्यानंतर भारताने लगेचच सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली. क्षेपणास्त्र वा अन्य हवाई हल्ले निष्प्रभ ठरवून जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी शस्त्रागारात ही संरक्षण प्रणाली महत्त्वाची ठरते.
प्रणालीचे स्वरूप
पंतप्रधानांनी सुदर्शन चक्र मोहिमेविषयी दिलेल्या काही संदर्भांवरून या प्रणालीचा अंदाज येऊ शकतो. सध्या जगात आकारमानाने लहान असणाऱ्या देशाला संरक्षण कवच देण्यात सक्षम म्हणून इस्रायलच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली अर्थात ‘आयर्न डोम’ने नाव प्राधान्याने घेतले जाते. याच धर्तीवर अमेरिकेने ‘गोल्डन डोम’ची आखणी केली. या प्रणालीत लांब, मध्यम आणि कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असतात. विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी त्या सक्षम केल्या जातात. संपूर्ण देशाला संरक्षण कवच उभारण्याच्या योजनेसाठी निधीसह बरेच काही करावे लागते. पंतप्रधानांनी सुदर्शन चक्र केवळ शत्रुचा हल्ला निष्प्रभ करणार नाहीत तर, त्याच्यावर ती अनेकदा प्रहार करेल, असे म्हटले आहे. ही बाब भारताच्या शस्त्रागारात पारंपरिक बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांंच्या विस्ताराकडे लक्ष वेधते. विविध प्रकारातील क्षेपणास्त्र विकासातून ते साध्य केले जाईल.
पूर्वतयारी, वाटचाल
मजबूत हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण कवच तयार करण्यासाठी देशात आवश्यक घटकांवर काम सुरू आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा पाठलाग करून ती हवेत नष्ट करणारी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्र प्रणाली, हा त्याचाच एक भाग. भारताच्या विद्यमान एकात्मिक बहुस्तरीय हवाई संरक्षण साखळीत भारतीय आणि परदेशी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश आहे. असुरक्षित ठिकाणांच्या संरक्षणासाठी आकाश (सॅम) ही कमी पल्ल्याची स्वदेशी प्रणाली सेवेत आहे. पृथ्वी हवाई संरक्षण आणि अश्विन प्रगत हवाई संरक्षण इंटरसेप्टर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली. सिंदूर मोहिमेत शेकडो तुर्की ड्रोन, चीनी क्षेपणास्त्रांच्या लाटा थोपवल्या गेल्या. हवाई दलप्रमुख ए. पी. सिंग यांनीही रशियन एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने युद्धादरम्यान किमान पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक विशेष मोहीम विमान जमीनदोस्त केल्याचे नमूद केले होते. मध्यंतरी नव्या पिढीच्या आकाश -एनजी या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची अत्यंत कमी उंचीवर वेगवान लक्ष्याविरुद्ध यशस्वी चाचणी पार पडली. नव्या क्षेपणास्त्रात ५०० किलोमीटर मारक क्षमतेचे प्रलय हे अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि एक हजार किलोमीटर पल्ला असणारे स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र समाविष्ट असेल. ब्राम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा पल्ला ४५० किलोमीटरवरून ८०० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे काम प्रगतीपथा्वर आहे.
कुशा, बीएमडी प्रकल्प
काहींच्या मते पंतप्रधानांची घोषणा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महत्त्वाकांक्षी कुशा प्रकल्पांर्गत विकसित होणाऱ्या हवाई संरक्षण प्रणालीशी जुळणारी आहे. या अंतर्गत यंत्रणेचे तीन प्रकार विकसित केले जात आहेत. पहिला प्रकार कुशा एम – विमानभेदी तोफा बदलण्यासाठी रचना केलेला आहे. ते महत्त्वाच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. कुशा एम – २ अंतर्गत जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे मध्यम श्रेणीची आवृत्ती वेगवेगळ्या हवाई लक्ष्यांविरुद्ध वाढीव क्षमता देईल. कुशा एम-३ ही लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली विस्तृत हवाई संरक्षणात कामी येईल. या हवाई संरक्षण प्रणालीचा पहिला टप्पा पुढील दोन वर्षात तयार होण्याचा अंदाज वर्तविला जातो. लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बचाव प्रणाली (बीएमडी) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोठ्या क्षेत्राच्या संरक्षणासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणारी बीएमडी ही परिपूर्ण प्रणाली असल्याचे डीआरडीओचे म्हणणे आहे. बीएमडीच्या पहिल्या टप्प्यातील बीएमडी – एकच्या तैनातीला हिरवा कंदील मिळू शकतो. दुसऱ्या टप्प्यातील प्रणाली पाच हजार किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांना रोखू शकते. पृथ्वीच्या वातावरणात आणि वातावरणाबाहेर जाऊनही ती पाठलाग करू शकते. ही प्रगत नियंत्रण प्रणाली, दिशादर्शन आणि मार्गदर्शन व्यवस्थेमुळे हे क्षेपणास्त्र वायुवेगाने लक्ष्यभेद करू शकते.