Rajendra Chola’s Historic Maritime Expedition: चोल साम्राज्याने भारताच्या मध्ययुगीन कालखंडात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूच्या दौर्यावर होते. त्यांच्या या दौर्यादरम्यान त्यांनी चोल राजवंशाच्या राजेंद्र चोल याच्या स्मृतींना उजाळा दिला. राजेंद्राने उत्तरेत गंगानदीपर्यंत दिग्विजय केला. त्याने गंगैकोंड (गंगाविजयी) पदवी धारण केली आणि आपल्या नावे गंगैकोंडचोळपुरम् नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी वसवली. तिथे अनेक सुंदर देवालये व प्रासाद बांधले, वेदांच्या अध्ययनाकरिता मोठे विद्यालय स्थापन केले व शेतीकरिता सुमारे सव्वीस किमी. लांबीचा विशाल तलाव खोदून त्यास गंगासागर नाव दिले. राजेन्द्र चोलाने याहीपेक्षा मोठा आणि अद्वितीय असा विक्रम केला. त्याने आपल्या आरमाराच्या साहाय्याने जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प यांवर स्वारी करून तत्कालीन शैलेंद्रांच्या साम्राज्याचा विध्वंस केला. त्याच्या या सागरी मोहिमेला १००० वर्षे पूर्ण झाली म्हणून केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आदि तिरुवातिराई महोत्सव साजरा करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्या ऐतिहासिक मोहिमेचा घेतलेला हा आढावा.
मोहिमेची पूर्व तयारी
१०२४ मध्ये राजेंद्र चोलाने एका धाडसी मोहिमेला हात घातला होता. या मोहिमेचा हेतू समुद्र पार करून आजच्या मलेशियातील केदाहवर हल्ला करणे हा होता. या काळात केदाहचे व्यापारी महत्त्व वाढले होते. ते जाणूनच राजेंद्र चोलाने या मोहिमेला हात घातला होता. शेती आणि भूपृष्ठावरील युद्धांमधूनच मुख्य महसूल मिळत असल्यामुळे त्यावेळचा इतर कोणताही राजा अशा प्रकारच्या मोहिमेला हात घालणार नव्हता.
व्यापारी ताफ्यामार्फत हल्ला
परंतु, राजेंद्रचे सेनापती आणि पंचशतक (व्यापारी संघटना) या दोघांनीही व्यापारी जहाजांच्या मदतीने जलद आणि अत्यंत चपळ मोहिमा राबविण्याचे फायदे ओळखले होते. हे स्वप्न आकारास आणण्यासाठी त्या कालखंडात राजेंद्र वगळता इतर कोणाकडेही असे दूरदृष्टी असलेले सेनापती, प्रशिक्षित सैन्यदल आणि व्यापारी संधी नव्हत्या. राजेंद्र चोलाच्या दरबाराने जवळपास सर्व तपशील निश्चित केले होते. दरवर्षी निघणाऱ्या मोठ्या व्यापारी ताफ्यामार्फत चोल सैन्य हल्ला करून केदाह लुटणार होते.
१०२५ मोहिमेला सुरुवात झाली
१०२५ या वर्षीच्या सुरुवातीलाच मोहिमेला प्रारंभ झाला. नागपट्टणम येथील शिवमंदिरे आणि बौद्ध विहारांत विधी पार पडले. ढोलाच्या तालावर, फुलांनी सजवलेली जहाजे अग्रभागी असलेला व्यापारी नौकांचा ताफा दक्षिणेच्या दिशेने लंकेकडे निघाला. असा प्रवास ते पिढ्यान्पिढ्या करत होते. त्यांनी किनाऱ्यापासून पूर्वेला वळसा घालून दोन आठवड्यांच्या प्रवासानंतर मलय द्वीपकल्प गाठण्यासाठी मोहीम सुरू केली.
नावाडी सज्ज
वादळाने केस उडालेले, दोरखंड आणि पाल हाताळून हात कडक झालेले असे दर्यावर्दी तमिळ किनाऱ्यावरील विविध समुदायांतून आले होते. त्यांच्याकडे प्रवाह आणि वाऱ्यांसाठी डझनभर नावे होती आणि वर्षाच्या कोणत्या काळात कोणते वारे वापरता येतील याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. समुद्रात दिशाभानासाठी तारकांची उंची बोटांनी, अंगठ्याने मोजली जात असे, तसेच गाठींच्या सहाय्याने माहिती साठवणारा साधा लाकडी सेक्टंट वापरला जात असे.
खगोलशास्त्राची मदत
उत्तर तारा (ध्रुवतारा) ११ व्या शतकात तमिळ किनाऱ्यावरून दिसत नसे; म्हणून त्यांनी वडामीन (अल्कॉर) आणि चेम्मीन (बेटेलज्यूस) या तारकांचा आधार घेतला होता. लंका आणि मलय द्वीपकल्प साधारणपणे समान तारकांच्या उंचीवर होते. एकदा ताफा पूर्वेकडे वळल्यावर, सर्व जहाजे एकाच दिशेला ठेवणे आवश्यक होते, शक्यतो एकमेकांच्या नजरेत, जेणेकरून ध्वज, मशाली आणि ढोल यांच्या मदतीने संकेत पाठवता येतील.
हत्तीही सागरी मोहिमेवर…
नावाड्यांचे काम सोपे होते, पण जहाजांवर बसलेल्या चोलांच्या उच्च दर्जाच्या सैनिकांचे तसे नव्हते. या मोहिमेत भूमीवरील सैन्यतैनातीच्या तुलनेत अत्यल्प सैन्य होते. शिवाय त्यांनी काही हत्ती आणले होते. या समुद्र प्रवासादरम्यान या हत्तींना गवत, चारा, तूप आणि भात मिळून प्रत्येकी दोन टनाहून अधिक खाद्य द्यावे लागत होते. पंचशतकाने घाईघाईने जीर्ण जहाजांचे आतील भाग पुन्हा बांधले होते. जेणेकरून योद्ध्यांच्या तुकड्यांना बसता येईल. ही जहाजे परिचित जहाजांसारखी नव्हती. मध्यमयुगीन हिंद महासागरातील बहुतेक जहाजांना पूर्णपणे आच्छादित डेक नव्हते, त्यामुळे कर्मचाऱ्यांना आत साठवलेले अन्न व साधने सहज वापरता येत असत. जहाजांच्या तळाला वाढवून तात्पुरते कप्पे बनवले जात, त्यावर समुद्री सरींपासून बचाव करण्यासाठी छप्पर घातले जात असे.
स्वयंपाक, मालमत्ता व कचऱ्याची जबाबदारी
मध्यमयुगीन हिंद महासागरातील प्रवास अत्यंत जोखमीचा होता. नौकानयन आणि पालही आपल्याला परिचित असलेल्या सोयी-सुविधांच्या तुलनेत खूपच प्राथमिक अवस्थेत होते. प्रवाशांची देखभाल करण्यासाठी कुणालाही मोकळे करता येत नव्हते. चोल सैनिकांना स्वतःचे स्वयंपाक, मालमत्ता आणि कचरा यांची जबाबदारी घ्यावी लागे. त्यांनी मीठात मुरवलेले आले, लिंबू आणि आंबे, भाताची पेज आणि नारळ; काही बकऱ्याही आणल्या होत्या. मोठ्या जाळ्यांनी मासे पकडले जात आणि भाजून किंवा तळून ते खाल्ले जात असत.
अरब, चिनी आणि पारशीही मोहिमेत
हिंद महासागरातील नौकानयन पथके विविधतेने नटलेली असत. केदाह मोहिमेत बहुधा तमिळ नावाडी होतेच, पण त्यांच्याबरोबर सिंहली, मलय, सुमात्रन आणि कदाचित काही अरब, पारशी व चिनीही होते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. ते सैनिकांबरोबर जुगार खेळत, गोष्टी सांगत. नेव्हिगेटर ताऱ्यांकडे आणि लाटांकडे पाहत, कप्तान खाऱ्या पाण्याच्या सरींमध्ये पालांची व्यवस्था लावत, तर पतवारांचे नियंत्रण केले जात होते. ताऱ्यांच्या आधारे नौकानयन करणे सोपे पण प्रभावी होते. मध्ययुगीन अरब लेखकांनी त्यांच्या तमिळ समकालीनांच्या अचूक तारा-आधारित मार्गदर्शनाचे कौतुक केले आहे.
केदाहवर हल्ला
राजेंद्रचे नौदल केदाहला पोहोचताच केदाहचा राजा हत्तींच्या तुकडीसह बाहेर पडला. परंतु, हे राजेंद्र चोळाच्या प्रशिक्षित सैनिकांसाठी काहीच नव्हते. फासे, भाले आणि बाणांचा मारा झाला; राजा पकडला गेला. केदाहवर तुफानी हल्ला झाला, त्याची रत्नजडित फाटकं उखडून टाकली गेली. या विध्वंसामुळे केदाहचे वस्तीचे स्वरूप कायमचे बदलले. शहराचे केंद्र मुडा नदीकडून मर्बोककडे सरकले. परंतु, तमिळ व्यापारी ताफ्याला लवकरच परतावे लागले.
केदाहचा पाडाव
केदाहच्या अचानक झालेल्या संहाराने श्रीविजयात, म्हणजे मलाया आणि सुमात्रापर्यंत पसरलेल्या सैल महासंघात, भीतीची लाट उसळली. कधीकाळी या महासंघात केदाहचा राजवंशी सहयोगी, सुमात्रातील पालेंबंग शहर वर्चस्व गाजवत होते, इतके श्रीमंत की, तिथे नदीत वास करणाऱ्या नागदेवांना रोज सोन अर्पण केले जात असे. केदाहच्या विध्वंसानंतर पालेंबंगची प्रतिष्ठा कोसळली आणि अखेर तेही ढासळले. श्रीविजयामधील लहान शहरे एकमेकांशी वर्चस्वासाठी झुंजू लागली, पण एकत्र येऊ शकली नाहीत. पुढील शतकभर आग्नेय आशियातील बेटांवर कोणतेही एकमेव राज्य प्रभुत्व गाजवू शकले नाही.