What is the Daruma doll? परदेशात प्रवासाच्या आठवणी जपण्यासाठी अनेकजण एखादं स्मृतिचिन्ह घरी आणतातच आणतात. कधी ते फ्रिज मॅग्नेट असतं, कधी की-चेन, तर कधी एखादी आकर्षक पण छोटीशी वस्तू. जागतिक नेत्यांनाही स्मृतिचिन्हांच्या रूपात अशाच भेटवस्तू दिल्या जातात. याचचं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जपान भेट. जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोरीनझान दरुमा-जी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी म्हणजे सेइशी हिरोसे यांनी एक दरुमा बाहुली भेट दिली. ही बाहुली जपानमध्ये सर्वत्र दिसते आणि ती त्या देशातील सर्वात प्रसिद्ध स्मृतिचिन्हांपैकी एक मानली जाते. त्याच पार्श्वभूमीवर दरुमा बाहुलीचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं ठरावं.
दरुमा बाहुली काय आहे?
जपानमध्ये दरुमा बाहुली ही सुदैव आणि भविष्यातील समृद्धीचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच या बाहुल्या जपानी दुकाने, रेस्टॉरंट्समधील शेल्फ आणि घरांमध्ये सर्वत्र दिसून येतात.

बोधीधर्म आणि बाहुली
गोलसर आकार आणि चेहऱ्यावर रागीट भाव असलेली ही बाहुली प्रत्यक्षात बोधिधर्म (जपानी भाषेत दरुमा) यांचं प्रतीक आहे. बोधिधर्म हे इ.स.५ व्या शतकातील भिक्षू होते. त्यांनी झेन बौद्ध धर्माची स्थापना केली. असं मानलं जातं की, बोधिधर्म यांनी तब्बल नऊ वर्षे स्थिर बसून ध्यान केलं आणि त्यामुळे त्यांच्या हातापायांची हालचाल थांबून ते अनंतात विलीन झाले. त्यामुळेच दरुमा बाहुली केवळ डोके आणि धड अशा स्वरूपात, हातपायांशिवाय तयार केली जाते.
परिश्रमपूर्वक साधना
जपानमध्ये राहणारे इटालियन टूर गाईड मार्को फसानो यांनी सीएनएनला सांगितलं की, दरुमा बाहुली म्हणजे धैर्य आणि चिकाटीचं प्रतीक आहे. झेन बौद्ध धर्मानुसार, “सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यातच दडलेली असतात. ती अचानक भेट म्हणून मिळत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला परिश्रमपूर्वक साधना करावी लागते आणि उत्तरं स्वतःमध्ये शोधावी लागतात.”

दीर्घायुष्य आणि सुदैव
आणखी एक दंतकथा असं सांगते की, ध्यानधारणेदरम्यान झोप येऊ नये म्हणून बोधिधर्मांनी स्वतःची पापणी कापून टाकली, म्हणूनच दरुमा बाहुली नेहमी मोठ्या डोळ्यांनी एकटक पाहणारी दिसते. दरुमा बाहुलीच्या डोळ्याखाली सोनेरी कांजी अक्षरे रंगवली जातात, ज्याला फुकू-इरी म्हणतात आणि त्याचा अर्थ सुदैव आणणारी असा होतो. बाहुलीच्या चेहऱ्यावरची वैशिष्ट्ये जपानी पौराणिक प्राणी सारस (क्रेन) आणि कासव यांच्या प्रतीकात्मक रूपांवर आधारित असतात. सारस पक्षी दीर्घायुष्य आणि सुदैवाशी जोडला गेला आहे, तो हजार वर्षे जगतो असा समज आहे. त्याचप्रमाणे कासवही शतकानुशतकं जगतं आणि ते संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुरक्षिततेसाठी हे दोन्ही प्राणी पूजनीय आहेत.
लाल रंगातील दरुमा बाहुली
दरुमा बाहुल्या विविध रंगांत तयार केल्या जातात, मात्र पारंपरिक रंग लाल आहे. एका दंतकथेनुसार, आशियात एकदा भीषण देवीचा (smallpox) प्रादुर्भाव झाला होता. देवीच्या देवतेला प्रसन्न करून रोग थांबावा या हेतूने त्यावेळी लोक लाल कपडे घालू लागले होते आणि घरांच्या दारांवर लाल दोरा बांधू लागले होते. त्यामुळे लाल रंगात दरुमा बाहुली प्रचलित झाली.

रंग आणि त्याचे अर्थ
आज मात्र दरुमा बाहुल्या विविध रंगांत दिसतात आणि प्रत्येक रंगाचं स्वतःचं महत्त्व आहे. उदाहरणार्थ, पिवळा दरुमा सुरक्षितता आणि संरक्षणाचं प्रतीक आहे, तर पांढरा दरुमा प्रेम आणि सौहार्दाचं प्रतीक मानला जातो.
दरुमा बाहुलींचा उगम
दरुमा बाहुल्यांचा उगम १७व्या शतकात जपानमधील गुन्मा प्रीफेक्चरमधील ताकासाकी शहरात झाला. परंपरेनुसार, ताकासाकीतील शेतकरी या बाहुल्या तयार करून त्या भिक्षूंनी आशीर्वादस्वरूप द्याव्यात म्हणून देत असत. या बाहुल्या पेपर-मॅश (papier-mâché) पासून तयार केल्या जात आणि अशा प्रकारे तयार केल्या जात की, त्या खाली पडल्या तरी पुन्हा सरळ उभ्या राहत. हे वैशिष्ट्य बौद्ध धर्मातील तत्त्व “नानाकोरोबी या ओकी”चे प्रतीक मानले जाते, ज्याचा अर्थ सात वेळा पडलात तरी, आठव्यांदा पुन्हा उभं राहावं असा आहे.
शेतकऱ्यांचा असा विश्वास होता की, या बाहुल्या त्यांना चांगलं पीक देतील. पण त्याचबरोबर त्यांनी या बाहुल्या विकून कठीण काळात अतिरिक्त उत्पन्न मिळवायला सुरुवात केली. आजच्या काळात दरुमा बाहुल्या प्रामुख्याने जपानी नववर्षाच्या सुरुवातीला विकत घेतल्या जातात. असा विश्वास आहे की, त्या तुमच्या ध्येयपूर्तीत मदत करतात. हळूहळू या बाहुल्या जपानी जीवनाच्या प्रत्येक पैलूत रुजल्या. साहित्य, चित्रपट, दूरदर्शन, अॅनिमे, मांगा आणि व्हिडिओ गेम्समध्ये त्या वारंवार दिसून येतात.
दरुमा बाहुल्या कुठे तयार होतात?
जपानभर दरुमा बाहुल्या मिळतात, पण त्यापैकी तब्बल ८० टक्के बाहुल्या ताकासाकी शहरात तयार केल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेली दरुमा बाहुलीही शोरीनझान दरुमा-जी मंदिराची आहे. असं मानलं जातं की सुमारे २०० वर्षांपूर्वी या बाहुल्या सर्वप्रथम याच मंदिरात तयार होऊ लागल्या. सुमारे १०० वर्षांपूर्वी भक्तांनी या बाहुल्या मंदिराच्या प्रांगणात ठेवायला सुरुवात केली. आता तर इतक्या मोठ्या संख्येने बाहुल्या येथे दिसतात की, या बाहुल्यांमुळे हे मंदिर स्वतःच एक पर्यटनस्थळ ठरलं आहे.
इच्छापूर्तीसाठी दरुमा बाहुली कशी वापरावी?
दरुमा बाहुली ही साधी शुभचिन्हासारखी नसते. ती वापरण्याची एक ठरलेली पद्धत आहे. तुम्ही एखादी इच्छा ठरवली की, तुम्हाला बाहुलीच्या एका डोळ्यावर रंग भरायचा असतो. याने बाहुलीला आत्मा प्राप्त होतो, असा अर्थ घेतला जातो. त्यानंतर त्या बाहुलीच्या प्रतिकात्मक सुदैवाच्या बळावर तुम्ही आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता.
जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते, तेव्हा तुम्ही दुसऱ्या डोळ्यात रंग भरता.
मुळात असं मानलं जात होतं की, बाहुलीचा प्रभाव एक वर्षापुरताच टिकतो. त्यानंतर बाहुली जाळून तिच्यातील देवतेला मुक्त करावं लागतं. यासाठी जपानमधील अनेक मंदिरांमध्ये दरुमा कुयो किंवा डोंडोयाकी नावाचा विधी होतो. यात हजारो लोक आपापल्या बाहुल्या घेऊन येतात, त्या पुजल्या जातात आणि नंतर सामूहिकरित्या जाळल्या जातात.
म्हणूनच पुढच्या वेळेस तुम्ही जपानला गेलात, तर कोणतं स्मृतिचिन्ह घ्यायचं हे नक्की लक्षात ठेवा. दरुमा बाहुली म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि सुदैवाचं अनोखं मिश्रण आहे.