Modi Visit to China पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी चीनला जाणार आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात तियानजिन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनहे देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे, पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टच्या आसपास जपानला भेट देऊन नंतर चीनला जातील, असेही वृत्त आहे. पंतप्रधान मोदींचा चीन दौरा महत्त्वाचा का आहे? या दौऱ्यामुळे भारत-चीन संबंध सुधारणार का? त्याविषयी जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदींचा चीन दौरा
- पंतप्रधान मोदी या महिन्याच्या शेवटी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेसाठी चीनला भेट देण्याची शक्यता आहे.
- तब्बल सात वर्षांनी मोदी चीनला भेट देणार आहेत. याआधी त्यांनी जून २०१८ मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी चीनचा दौरा केला होता.
- २३ ऑक्टोबर २०२४ रोजी कझानमधील १६ व्या ब्रिक्स (BRICS) परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.
- शी जिनपिंग यांनी शेवटचा भारत दौरा ऑक्टोबर २०१९ मध्ये केला होता, त्यानंतर काही महिन्यांनी पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली.
- पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ऑगस्ट रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्याबरोबर दोन्ही देशांमधील सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारतात येणार आहेत, अशी माहिती ‘द प्रिंट’ने दिली आहे.

पंतप्रधान मोदींचा चीन दौरा महत्त्वाचा का आहे?
२०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गलवान येथे झालेल्या लष्करी संघर्षात २० भारतीय जवान आणि अनेक चिनी सैनिक मारले गेले होते. चीनने अधिकृतपणे त्यांच्या बाजूचे चार सैनिक मारले गेल्याचे कबूल केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे. तेव्हापासून, दोन्ही देशांनी सीमावाद सोडवण्यासाठी राजकीय, लष्करी आणि राजनैतिक स्तरांवर अनेक चर्चा केल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची रशियामधील कझान शहरात भेट झाली आणि त्याच्या काही दिवसांनी, भारत आणि चीनमधील सैनिकांनी माघार घेतली, असे सांगितले जाते. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध सुधारत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चीनमधील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकांमध्ये आपला सहभाग दर्शवला.
गेल्या महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकीदरम्यान वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत, जयशंकर यांनी व्यापार निर्बंध, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच दहशतवाद, फुटीरतावाद याविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळेच मोदींच्या चीन दौऱ्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते, असे स्वतंत्र परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. साहेली दास यांनी ‘द इंटरप्रिटर’ साठी लिहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दबाव वाढवला आहे, अशाच वेळी पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर जाणार आहेत.
या दौऱ्यामुळे गोष्टी सुधारणार का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती आणि आता अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले आहे. अमेरिकेची पाकिस्तानशी वाढलेली जवळीकही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ‘द इंटरप्रिटर’ च्या लेखानुसार, “या परिस्थितीत, चीनबरोबरच्या संबंधांमध्ये तात्पुरता समतोल साधल्यास भारताला अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेण्याची संधी मिळेल.” भारत आणि चीनमध्ये काही मतभेद अजूनही कायम आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मे महिन्यात भारताबरोबरच्या संघर्षादरम्यान चीनने पाकिस्तानला मदत केली होती. पंतप्रधान मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या व्यासपीठाचा वापर करून जगाला सीमापार दहशतवादावर कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करू शकतात. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींचे हे भाषण होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी चीनला भेट देण्याचा निर्णय घेतल्याने या मंचाला भारत किती महत्त्व देत आहे हेदेखील दिसून येते. दास यांच्या मते, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनबरोबर भारताचा सहभाग “क्वाड, ब्रिक्स (Brics), जी-७ यांसारख्या गटांबरोबरची मोदी सरकारची रणनीती दर्शवतो. या परिषदांच्या मदतीने चीन, रशिया, इराण आणि काही मध्य आशियाई देशांबरोबर सर्वोच्च स्तरावर संवाद सुरू ठेवण्यासाठी भारताला एक धोरणात्मक जागा मिळते.”
भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा
पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यावर सरकार लवकरच निर्णय घेईल आणि योजना निश्चित झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीपासून भारत आणि चीनमधील तणाव कमी झाला आहे. त्यांच्या भेटीपूर्वीच भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील देपसांग भागात पुन्हा गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संवाद वाढला आहे. चीनने कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू केली आहे आणि भारताने चिनी पर्यटकांसाठी व्हिसा पुन्हा सुरू केला आहे.
भारत चीनी विमान कंपन्यांसाठी भारतातून थेट हवाई प्रवास पुन्हा सुरू करण्याचाही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. दोन्ही देशांतील संबंधामध्ये सुधारणा असूनही, भारत आणि चीनमध्ये सीमेचा मुद्दा कायम आहे. अजूनही सुमारे ५० हजार ते ६० हजार सैनिक सीमा रेषेवर दोन्ही बाजूंनी तैनात आहेत. लष्करी दल कमी करण्यासाठी आणि माघारीसाठी चर्चा सुरू आहेत. पंतप्रधान मोदींचा चीन दौरा भारत आणि चीन यांच्यातील संबंधांना नवीन दिशा देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.