Sankaran Nair Jallianwala Bagh Case : १३ एप्रिल १९१९ साली पंजाबच्या अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना घडली. ब्रिटिश अधिकारी जनरल डायरच्या आदेशानंतर ब्रिटिश सैन्याने नि:शस्त्र भारतीयांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. सोमवारी या घटनेला १०६ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत कायदेतज्ज्ञ सी. शंकरन नायर यांची आठवण करून दिली, ज्यांनी या हत्याकांडाला जबाबदार असलेल्या जनरल डायरला कोर्टात खेचलं होतं. दरम्यान, कोण होते सी. शंकरन नायर? त्यांनी ब्रिटिशांविरोधात न्यायालयीन लढा कसा दिला? याबाबत जाणून घेऊ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना रविवारी (तारीख १३ एप्रिल) श्रद्धांजली वाहिली. “जालियनवाला बाग हत्याकांडात हुतात्मा झालेल्या शूरांना विनम्र अभिवादन… हे हत्याकांड एका हुकूमशाही राजवटीच्या क्रूरतेचे प्रतीक होते, जे आपण कधीही विसरू शकत नाही. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शूर हुतात्म्यांचे बलिदान भावी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील”, अशी पोस्ट पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली. यावेळी मोदींनी सी. शंकरन नायर यांचीही आठवण करून दिली. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला कोर्टात खेचणारे शंकरन नायरही प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत राहतील, असेही पंतप्रधान म्हणाले.

नायर यांच्या आयुष्यावर ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपट

सी. शंकरन नायर यांच्या आयुष्यावर आधारित ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार वकील शंकरन यांची भूमिका साकारणार आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ चित्रपटात २१ शीख सैनिकांच्या धैर्य आणि बलिदानाची कहाणी दाखविण्यात आली होती. आता ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित विविध गोष्टी मांडण्यात येणार आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘The Case That Shook the Empire : One Man’s Fight for the Truth about the Jallianwala Bagh Massacre’ या पुस्तकावर आधारित आहे, जे नायर यांचे पणतू रघु पळट व त्यांची पत्नी पुष्पा पळट यांनी लिहिले आहे.

आणखी वाचा : परंपरेनुसार देवाला मांसाहारी नैवेद्य दाखविणे हिंदुत्त्वाच्या व्याख्येत बसत नाही का? दिल्लीतील घटनेची पश्चिम बंगालमध्ये प्रतिक्रिया?

कोण होते सी. शंकरन नायर?

सी. शंकरन नायर यांचा जन्म १८५७ मध्ये मलबारच्या पलक्कड जिल्ह्यातील मणकरा गावातील एका श्रीमंत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी तमिळनाडूच्या मद्रास येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित होऊन ब्रिटिश अधिकारी सर होरॅटिओ शेफर्ड यांनी त्यांना नोकरी दिली. त्यानंतर सी. शंकरन नायर हे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. वकील म्हणून सुरुवातीच्या काळापासूनच नायर हे आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकदा त्यांना ब्रिटिश सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे सहकारी वकील व समवयस्कांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. विशेषतः मद्रासमधील उच्चभ्रू समुदायाने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती

‘The Case That Shook the Empire’नुसार, त्या वेळचे भारताचे परराष्ट्र सचिव एडविन मोंटेग्यू म्हणाले होते, सी. शंकरन नायर यांचे व्यक्तिमत्त्व कुणाच्याही लक्षात येईल, असेच होते. कारण- ते दुसऱ्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. नेहमीच त्यांचा आवाज उंच असतो. कोणत्याही गोष्टीत ते तडजोड करण्यासाठी तयार होत नाहीत. दरम्यान, नायर हे एक हुशार वकील व थोर समाजसुधारक होते. १८९७ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष झाले. १९०८ मध्ये त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यांचे निर्णय सामाजिक सुधारणांप्रति त्यांची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात. त्यांनी बुडासना विरुद्ध फातिमा या १९१४ च्या खटल्यात असा निर्णय दिला की, हिंदू धर्मात परत आलेल्या व्यक्तींना बहिष्कृत मानले जाऊ शकत नाही. तसेच इतर काही प्रकरणांमध्ये न्या. नायर यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाचे समर्थन केले.

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर राजीनामा

सी. शंकरन नायर हे भारताच्या स्वातंत्र्यावर ठाम विश्वास ठेवणारे होते. १९१९ मध्ये त्यांनी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या सुधारणांमुळे भारतीयांचा प्रशासनातील सहभाग वाढला. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध करीत व्हाइसरॉय कौन्सिल परिषदेचा राजीनामा दिला. १९२२ मध्ये नायर यांनी ‘Gandhi and Anarchy’ हे पुस्तक प्रकाशित केले, ज्यात त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार, अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या मार्गांवर टीका केली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नरपदाची जबाबदारी मायकेल ओ’ड्वायर यांच्यावर होती. त्यांच्या धोरणांमुळेच ही घटना घडल्याचा आरोप नायर यांनी केला.

जनरल डायरला नायर यांनी कोर्टात खेचलं.

जालियनवाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असलेला ब्रिटिश अधिकारी जनरल डायरलाही त्यांनी कोर्टात खेचलं. यादरम्यान नायर यांना भारतीयांनी पाठिंबा देत या घटनेविरोधात आवाज उठवला. त्यामुळे ब्रिटिश सरकार दबावाखाली आले आणि त्यांनी या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची स्थापना केली. दुसरीकडे, ओ’ड्वायर यांनी नायर यांच्यावर इंग्लंडमध्ये मानहानीचा खटला दाखल केला. ब्रिटिश न्यायालय या खटल्यात आपली बाजू घेईल असं ओ’ड्वायर यांना वाटत होतं. लंडनमधील किंग्ज बेंच कोर्टात हा खटला पाच आठवड्यांहून अधिक काळ चालला. त्या काळातील सर्वांत दीर्घकाळ चाललेला दिवाणी खटला म्हणून याची नोंद करण्यात आली.

हेही वाचा : विश्लेषण : अमेरिकेकडून महासंहारक अणुबॉम्बची निर्मिती… हिरोशिमा बॉम्बपेक्षा २४ पट अधिक शक्तिशाली? 

ब्रिटिश अधिकाऱ्याची माफी मागण्यास नकार

न्यायमूर्ती हेन्री मॅकार्डी यांच्या नेतृत्वाखालील १२ न्यायमूर्तीच्या बेंचसमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्याय मंडळातील ११ सदस्यांनी ओ’ड्वायर यांच्या बाजूने मत दिले; तर मार्क्सवादी राजकीय विचारवंत हेरॉल्ड लास्की यांचं एक मत त्यांच्याविरोधात होतं. या खटल्याच्या निकालानंतर न्यायालयाने नायर यांना ५०० पौंडांचा दंड ठोठावला आणि खटल्याचा संपूर्ण खर्च भरण्याचे आदेश दिले. त्याच वेळी ओ’ड्वायर यांनी जाहीर केले की, नायर यांनी माफी मागितल्यास ते दंड माफ करतील. मात्र, नायर यांनी त्यांची माफी मागण्यास ठामपणे नकार दिला होता.

ब्रिटिश साम्राज्यावर तीव्र परिणाम

जालियनवाला बाग हत्याकांडातील खटल्याचा ब्रिटिश साम्राज्यावर तीव्र परिणाम झाला. त्याच काळात भारतात राष्ट्रवादी चळवळीने वेग घेतला होता. ब्रिटिश सरकार त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कसा पक्षपातीपणा करीत आहे, हे भारतीयांच्या लक्षात आले. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याची मागणी आणखीच वाढली. १९३४ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी नायर यांचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत नायर यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला होता.