Porsche Teen’s Blood Sample Thrown Into Dustbin सध्या गाजत असणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून कार चालविल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातानंतर मुलाच्या रक्ताचे दोन नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास मुलाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्ततपासणी अहवाल निगेटिव्ह आला. परंतु पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ससूनच्या नमुन्यात डॉक्टरांनी फेरफार केल्याचा संशय आला. त्यामुळे १९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ओैंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यात मद्यांश असल्याचे आढळून आले नाही. अपघातांतर दीड तासाच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्तात मद्यांश आढळून आलेला नाही, असे उघडकीस आले आहे. यानंतर रक्तात मद्यांश का आढळला नाही, याविषयी अनेक ठोकताळे मांडण्यात येते आहेत.
अधिक वाचा: Pune Porsche Accident: सलमान खान हिट अॅण्ड रन केस आणि पुणे पोर्श कार अपघात; साम्य-भेद कोणते?
रक्ताच्या नमुने बदलले
या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी पुरावा लपविण्याचा निर्लज्ज प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सांगितले की, ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या निर्देशानुसार १७ वर्षीय मुलाचे रक्ताचे नमुने कचराकुंडीत टाकण्यात आले आणि त्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नमुने बदलण्यात आले. त्या संदर्भात ससून जनरल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि सरकारी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. कुमार म्हणाले की, अल्पवयीन आरोपीचे वडील थेट डॉक्टर तावरे यांच्या संपर्कात होते. म्हणूनच हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. आणि ज्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना वापरण्यात आला त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. एकूणच रक्ताचा नमुना बदलल्यामुळे या खटल्याच्या निकालावर परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याच खटल्याशी साधर्म्य दर्शवणाऱ्या सलमान खानच्या हिट अॅण्ड रन केसच्या बाबतीतही रक्ताच्या नमुन्यानेच महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे संपूर्ण खटल्यालाच वेगळे वळण लागले. त्याचा घेतलेला हा आढावा.
हिट अॅण्ड रन केस आणि रक्ताचे नमुने
२००२ साली देखील सलमान खानच्या हिट अॅण्ड रन केसलाही ब्लड सॅम्पलमुळे अशीच कलाटणी मिळाली होती. २००२ साली झालेल्या या घटनेचा निकाल २०१५ साली लागला. या खटल्यातही रक्ताच्या नमुन्यांमध्ये अशाच प्रकारचा घोळ झाल्याचे उघड झाले होते. परिणामी अंतिम निकालाच्या वेळेस रक्ताची झालेली चाचणी ग्राह्य धरली गेली नाही. रक्ताच्या चाचणीच्या वेळेस योग्य ती काळजी घेतली होती की नाही हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला. सलमान खानच्या टोयोटा लँड क्रूझरने वांद्रे येथील हिल रोडवरील बेकरीबाहेर झोपलेल्या पाच जणांना धडक दिल्याने झालेल्या अपघाताच्या काही तासांनंतर २८ सप्टेंबर २००२ रोजी दुपारी सरक्ताचे नमुने घेण्यासाठी सलमानला जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप सलमान खानवर होता. आणि त्यामुळे रक्तातील मद्याशांचा अहवाल महत्त्वाचा होता.
अधिक वाचा: Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?
रक्त चाचणीतील घोळ
जे पुरावे संशयास्पद आहेत त्यात सलमानच्या रक्ताचे नमुने प्रामुख्याने येतात, असे निकालपत्रामध्ये उच्च न्यायालयाने म्हटले होते. शिवाय न्यायवैद्यक (फोरेन्सिक) चाचणीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. सलमान खानच्या रक्ताचे नमुने जे. जे. रुग्णालयात घेतले गेले होते. परंतु या नमुन्याच्या हाताळणी वेळी योग्य काळजी घेतलेली नव्हती, असा आरोप सलमान खानच्या वकिलांनी केला. शिवाय न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणात एक महत्त्वाची बाब होती. रक्ताचा नमुना घेताना ६ ml रक्त घेण्यात आले होते. परंतु फोरेन्सिक चाचणीसाठी केवळ ४ ml इतकेच रक्त तपासण्यात आले होते. हे नेमके कसे झाले याविषयी न्यायालयाकडून जाब विचारण्यात आला. त्यामुळे या चाचणीच्या विश्लेषणाचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला नाही.
सलमान खान प्रकरणात काय घडले ?
२८ सप्टेंबर २००२ रोजी रक्ताचा नमुना घेण्यात आला होता, परंतु वीकएण्ड असल्याने केमिकल अॅनालिस्टचे कार्यालय बंद होते. त्यामुळे रक्त चाचणीसाठी ३० सप्टेंबर रोजी पाठविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीचे नमुने स्वीकारण्याऐवजी केमिकल अॅनालिस्ट कार्यालय बंद राहिले, हे दुर्दैवी असल्याची टीका न्यायालयाकडून करण्यात आली. इतकेच नाही तर २८ ते ३० यादरम्यान रक्ताचे नमुने पोलिस स्टेशनमधील फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु पोलिस अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये रेफ्रिजरेटर असल्याचा कोणताही पुरावा नव्हता, असे तपासणीत उघड झाल्याचे न्यायाधीशांनी म्हटले होते. एकूणच सलमान खानच्या हिट अॅण्ड रन केसप्रकरणी रक्ताच्या नमुन्यांच्या बाबतीत घोळ झाल्याने परिणामी न्यायालयात पुराव्यांमध्ये त्रुटी राहिल्या आणि त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले.
अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
प्रत्यक्ष पुरावा नाही?
अपघाताच्या काही तास आधी सलमान रेन बारमध्ये मद्यपान करत होता या फिर्यादीच्या दाव्यावर, हायकोर्ट म्हणाले, “वेटर किंवा मॅनेजर यांच्यापैकी कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही.” किंबहुना त्या बारमधील बिलाचा पुरावाही ग्राह्य धरला गेला नाही. कारण सलमान आणि त्याच्या मित्रांनी रात्री १ वाजता बार सोडला होता, म्हणजे २८ च्या पहाटे. तर बिलावर तारीख २७ सप्टेंबरची आहे. आणि हा पुरावा अपीलकर्त्याची मद्यधुंदता सिद्ध करत करतो की नाही याविषयी सत्र न्यायालयाने कोणतेही मतप्रदर्शन केलेले नव्हते. शिवाय सलमान ड्रायव्हिंग सीटवर होता याविषयी त्याच्या वकिलाकडून तो ड्रायव्हिंग सीटवरून डाव्या सीटवर गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुराव्या अभावी हिट अॅण्ड रन केसमधून सलमानची निर्दोष सुटका झाली होती.
रक्त चाचणीच कळीचा मुद्दा?
या संपूर्ण खटल्यात कळीचा ठरला तो, रक्ताच्या नमुना चाचणीचा मुद्दा. त्यातील त्रुटीमुळे सलमान खान निर्दोष मुक्त झाला. अशा प्रकारच्या हिट अॅण्ड रन प्रकरणात हाच कळीचा मुद्दा ठरतो हे लक्षात आल्यानेच या खेपेस आरोपीच्या वतीने रक्ताच्या नमुन्यांमध्येच त्रुटी राहण्यासाठी घोळ घालण्याचा रितसर प्रयत्न करण्यात आला. आता हा प्रयत्न आरोपीच्या गळ्याशी येतो की, हा प्रयत्न उघडकीस आल्याने आरोपी अधिक अडचणीत येतो हे कायदेशीरदृष्ट्या पाहणे महत्त्वाचे ठरेल.