मे महिन्याच्या सुरुवातीपासून होत असलेल्या वळीव (पूर्वमोसमी) पावसामुळे राज्यातील फळपिकांची दाणादाण उडाली आहे. यंदा पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडतो आहे का, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का, याविषयी…
यंदा वळीव पाऊस सरासरीपेक्षा जास्त?
मोसमी पाऊस देशाच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. मोसमी पावसाने अंदमान समुद्रातून पुढे वाटचाल करून श्रीलंकेचा बहुतेक भाग व्यापला आहे. सरासरी वेळच्या काहीसा अगोदरच मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज असतानाच महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच वेळी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीनच्या प्रशांत महासागरात हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे देशात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. स्थानिक तापमान वाढ आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. यंदा पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे की कमी हे मे महिन्याच्या अखेरीस हवामान विभागाकडून जाहीर केले जाईल.
राज्यात किती नुकसान?
राज्यात होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नुकसानाची तीव्रता वाढली आहे. एक मेपासून २० मेपर्यंत म्हणजे मे महिन्यातील २० दिवसांत राज्यात सुमारे २६ हजार हेक्टरवरील फळपिके, भाजीपाला पिके आणि उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका अमरावतीला बसला. अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यांत दाणादाण उडाली असून, दहा हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. त्याखालोखाल जळगाव, नाशिक, जालना, चंद्रपूर जिल्ह्यांत नुकसानाचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे केळी, आंबा, डाळिंब, पपई, चिकू, संत्री, लिंबू, कांदा, भाजीपाला पिके, बाजरी, मका आदी उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवार, २० मेअखेर २६ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
बहुपीक पद्धतीमुळे हानी वाढली?
राज्यात पूर्वी प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेतली जात होती. आता सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे खरीप, रब्बीसह उन्हाळी हंगामातही पिके घेतली जात आहेत. सध्या कोकणात आंबा, फणस, मध्य महाराष्ट्रात डाळिंब, आंबा, पपई, चिकू आणि उत्तर महाराष्ट्रात केळी आणि विदर्भात संत्र्यांचा हंगाम सुरू आहे. राज्यात फळपिकांची शेती वाढली आहे. पूर्वी केळी लागवड दोन हंगामात होत होती. आता वर्षभर सुरू असते. त्यामुळे वळीव अथवा पूर्वमोसमी पावसानेही हानीची तीव्रता वाढली आहे. फळपिकांची लागवड होण्यापूर्वीच्या काळात उन्हाळी हंगामात पडणाऱ्या पावसामुळे इतके नुकसान होत नव्हते. उलट उन्हाळी पाऊस पडल्यानंतर खरीपपूर्व अथवा उन्हाळी मशागतींना वेग येत होता. आता तशी स्थिती राहिली नाही. कोणत्याही हंगामात पाऊस पडला तरी नुकसान होताना दिसत आहे. बहुपीक पद्धतीमुळे नुकसानाचा आकडा दिवसोंदिवस वाढत आहे.
शेतकऱ्यांना मदत मिळणार का?
राज्यात शेतीच्या नुकसानाला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांद्वारे मदत दिली जाते. खरीप, रब्बी हंगामात अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळी वारे आणि वीज पडून होणाऱ्या हानीनंतर मदत दिली जाते. हेच निकष उन्हाळ्यासाठीही लागू आहेत. त्यामुळे मे महिन्यात राज्यात सर्वदूर होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. राज्यात २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत. त्याचा अहवाल अंतिम झाल्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी किंवा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांद्वारे मदत दिली जाईल.
शहरांमधील नुकसानाकडे दुर्लक्ष?
उन्हाळी, वळीव किंवा पूर्वमोसमी पाऊस वादळी वारे, मेघगर्जनेसह पडत असतो. कमी काळात जोरदार पाऊस होत असल्यामुळे मोठमोठे जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना घडतात. फलक कोसळून होणारी आर्थिक आणि जीवितहानी होते. मुसळधार पावसामुळे पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरांमधील सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. शहरामधील बाजार समित्यांमध्ये उघड्यावर पडलेल्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आजवर पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. आता शहरी भागांतील नुकसानाचा आकडाही वाढताना दिसून येत आहे.
dattatray.jadhav@expressindia.com