Prostate Cancer Symptoms in Marathi : नवी दिल्लीतील एक ६२ वर्षीय सेवानिवृत्त बँक कर्मचारी राजेश मेनन यांना लघवी करण्यास त्रास होऊ लागला. सुरुवातीला त्यांनी वाढत्या वयामुळे याकडे दुर्लक्ष केले; पण काही दिवसांतच त्रास अधिकच वाढल्याने त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजेश यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला. या अहवालातून त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाला असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या दशकभरात भारतात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषत: शहरी भागात राहणाऱ्या पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण होत असल्याचे समोर आले आहे. नेमकी काय आहेत त्यामागची कारणे? तज्ज्ञांचे मत काय? याविषयीचा हा आढावा…
हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅफ्रोलॉजी अँड युरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. तैफ बेंडीगेरी यांनी इंडिया टुडेला कर्करोगाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रोस्टेट कर्करोग हा जगभरातील पुरुषांना होणाऱ्या सर्वांत सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. काही देशांमधील प्रत्येक आठ पुरुषांपैकी एकाला या आजाराची लागण होत आहे. भारतातही गेल्या दशकात या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये सतत वाढ झाली आहे. विशेषत: ५० वर्षांवरील पुरुषांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे.
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे कोणती?
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला फारशी दिसून येत नाहीत.
 
- या आजाराची लागण झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात लघवी करण्यात अडचण येणे, लघवीचा प्रवाह कमी होणे, वारंवार लघवी होणे किंवा पाठदुखी अशा किरकोळ तक्रारी दिसायला लागतात.
 
- अनेक पुरुषांसाठी हा कर्करोग ‘सायलेंट किलर’ ठरतो. रक्तातील पीएसए (Prostate Specific Antigen) पातळी वाढल्यानंतरच त्याचे निदान होते; परंतु तोपर्यंत हा आजार बऱ्याचदा पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो.
 
- “प्रोस्टेट कर्करोगाबद्दलची चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान झाल्यास तो बरा होण्याची शक्यता खूपच जास्त असते,” असे डॉ. बेंडीगेरी यांनी इंडिया टुडेला सांगितले.
 
आणखी वाचा : युद्धविराम होताच पाकिस्तानची मुस्कटदाबी; अफगाणिस्तानच्या ‘त्या’ निर्णयाला भारताचा पाठिंबा, प्रकरण काय?
हार्मोन थेरपी का अपयशी ठरतेय?
रोबोटिक सर्जरी यांसारख्या प्रगत उपचार पद्धतींमुळे प्रोस्टेट कर्करोगावरील सुरुवातीच्या टप्प्यातील उपचार खूप अधिक प्रभावी झाले आहेत. मात्र, या आजाराचे उशिरा निदान झाल्यास डॉक्टरांना प्रामुख्याने हार्मोन थेरपीवर अवलंबून राहावे लागते. प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यापासून रोखण्यासाठी हार्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ची गरज असते. या उपचार पद्धतीमुळे काही काळ कर्करोगाची वाढ थांबवता किंवा मंदावता येते. “अनेक पुरुषांमध्ये सुरुवातीला या थेरपीचा अतिशय चांगला परिणाम दिसतो; पण काही महिन्यांनंतर उपचाराचा परिणाम कमी होतो आणि कर्करोग पुन्हा वाढू लागतो. काही रुग्णांमध्ये तर हार्मोन थेरपीचा परिणाम होतच नाही,” असे डॉ. बेंडीगेरी यांनी म्हटले आहे.
उपचारानंतरही पुन्हा कर्करोगाची लागण का होते?
- यशस्वी उपचारानंतरही काही रुग्णांना पुन्हा प्रोस्टेट कर्करोगाची लागण का होते, असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांना पडला होता.
 
- अलीकडील एका नवीन संशोधनात तज्ज्ञांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
 
- कर्करोगाच्या पेशींमधील काही विशिष्ट प्रोटीन हार्मोन थेरपीचा परिणाम रोखतात.
 
- परिणामी त्यावरील उपचार निष्फळ ठरतात आणि आजार पुन्हा बळावतो, असे संशोधकांनी शोधून काढले आहे.
 
- या प्रोटीनचा अंडी, डाळी किंवा मांसातून मिळणाऱ्या आहारातील प्रोटीनशी तिळमात्र संबंध नाही.
 
- हार्मोन थेरपीवर परिणाम करणारे हा घटक शरीरात नैसर्गिकरीत्या जनुकांमधून तयार होणारा जैविक रेणू असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
 
काही रुग्णांवर थेरपीचा परिणाम का होत नाही?
पेशींचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी हे रेणू सूक्ष्म मशीन्सप्रमाणे काम करतात. मेंदूपर्यंत सिग्नल पाठवणे, नुकसान दुरुस्त करणे, तसेच पेशींची वाढ व विभागणी नियंत्रित करणे, असे त्यांचे कार्य असते. मात्र, कर्करोगाच्या पेशींमध्ये यापैकी काही प्रोटीन असामान्य किंवा अतिसक्रिय होतात, ज्यामुळे ट्यूमरला जगण्यास किंवा उपचारांना विरोध करण्यास मदत मिळते. या प्रक्रियेत दोषी ठरणाऱ्या प्रमुख प्रोटीनमध्ये AR-v7, Bcl-2, Bcl-xl व HSP यांचा समावेश होतो. डॉ. बेंडीगेरी यांच्या मते, हे रेणू प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींमध्ये आढळतात आणि ते हार्मोन थेरपीला प्रभावीपणे कार्य करण्यापासून थांबवतात.
हेही वाचा : Dopamine Detox रिल्स आणि मोबाईलपासून दूर राहिलं की खरंच मेंदू रीसेट होतो का?
थेरपी अपयशी ठरण्याचे उलगडले रहस्य
दिलासादायक बाब म्हणजे संशोधक आता साध्या रक्त तपासणीद्वारे हार्मोन थेरपीला विरोध करणारे हे प्रोटीन ओळखू शकतात. रक्तप्रवाहात फिरणाऱ्या कर्करोगाच्या पेशी किंवा संबंधित रेणूचा शोध घेऊन हे परीक्षण केले जाते. याचा अर्थ असा की, कोणत्या रुग्णांवर हार्मोन थेरपीचा अपेक्षित परिणाम होणार नाही हे आपण सुरुवातीलाच ओळखू शकतो, असे डॉ. बेंडीगेरी यांनी म्हटले आहे. अशा रुग्णांना लगेचच पर्यायी किंवा संयुक्त उपचारांकडे वळवता येते, ज्यामुळे वेळ वाचतो आणि उपचारांचे यशस्वी प्रमाण वाढते, असेही ते म्हणाले.
प्रोस्टेट कर्करोगावर कसे नियंत्रण मिळवता येते?
आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारपद्धतीत कशी आमूलाग्र क्रांती घडवत आहे याचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वीची ‘सर्वांसाठी एकच उपचारपद्धती’ ही संकल्पना आता बदलून अचूक औषधांकडे वळली आहे, जिथे प्रत्येक उपचार रुग्णाच्या विशिष्ट कर्करोगाच्या जीवशास्त्रानुसार तयार केला जातो. राजेश मेनन यांच्यासारख्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती आशेचा किरण घेऊन आली आहे. त्याचबरोबर या आजारावर मात करण्याचे त्याचे लवकर निदान आणि जागरूकता खूप महत्त्वाची आहे. “५० वर्षांवरील पुरुषांनी लघवीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, नियमित रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. प्रोस्टेट कर्करोगाचे सुरुवातीला निदान झाल्यास या आजारावरही चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते,” असे आवाहन डॉ. बेंडीगेरी यांनी केले आहे.
