-सिद्धार्थ खांडेकर

५ सप्टेंबर १९७२ रोजी म्युनिच ऑलिम्पिकदरम्यान काही इस्रायली खेळाडूंचे झालेले हत्याकांड या संपूर्ण  चळवळीवर आणि खेळांच्या राष्ट्रातीत, धर्मातीत स्वरूपावर काळा डाग ठरले. या हत्याकांडात इस्रायलचे ११ खेळाडू आणि प्रशिक्षक मारले गेले. एक जर्मन पोलीस अधिकारी आणि पाच पॅलेस्टिनी हल्लेखोरही ठार झाले. ‘ब्लॅक सप्टेंबर’ नामक पॅलेस्टिनी संघटनेने हे हत्याकांड घडवून आणले. तत्कालीन पश्चिम जर्मनीत ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही घटना घडली. पश्चिम जर्मनीचे कुचकामी आणि अप्रशिक्षित पोलीस दल, दहशतवादविरोधी कारवाईत जर्मन लष्कराला भाग घेता न येणे, चुकीची शस्त्रे अशी अनेक कारणे या घटनेला कारणीभूत ठरली. आता या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इस्रायलींच्या नातेवाईकांकडून भरपाईच्या रकमेविषयी मतैक्य झाल्यामुळे हा इतिहास पुन्हा चर्चेत आला. 

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

म्युनिच ऑलिम्पिकला कधी सुरुवात झाली?

बर्लिन १९३६ नंतर प्रथमच एखाद्या जर्मन शहरात ऑलिम्पिक होत होते आणि यानिमित्ताने नव्या, उदारमतवादी जर्मनीचे वैभव जगापुढे मांडण्यास तो देश उत्सुक होता. म्युनिच ऑलिम्पिकला २६ ऑगस्ट १९७२ रोजी सुरुवात झाली. या विसाव्या ऑलिम्पिकमध्ये १२० देश सहभागी झाले होते. आनंदी ऑलिम्पिक असे या स्पर्धेचे वर्णन आयोजकांच्या वतीने करण्यात येत होते.

५ सप्टेंबर १९७२ रोजी म्युनिच ऑलिम्पिक नगरीत काय घडले?

पहिले काही दिवस स्पर्धा सुरळीत पार पडली. ५ सप्टेंबरच्या पहाटे चार वाजता ब्लॅक सप्टेंबर संघटनेचे आठ पॅलेस्टिनी दहशतवादी ऑलिम्पिक ग्रामची भिंत चढून आत उतरले. ओळख लपवण्यासाठी त्यांनी अॅथलीटचे पोशाख परिधान केले होते. मूळ योजनेनुसार ते इस्रायली पथकाच्या इमारतींजवळ आले. तेथे त्यांच्याशी झालेल्या झटापटीदरम्यान एक इस्रायली कुस्ती प्रशिक्षक आणि एक वेटलिफ्टर मारले गेले. एक इस्रायली खेळाडू पळून जाण्यात यशस्वी झाला. इस्रायली पथकातील आणखी नऊ जणांना ओलीस ठेवण्यात आले. 

‘ब्लॅक सप्टेंबर’ दहशतवाद्यांच्या मागण्या काय होत्या?

इस्रायली तुरुंगांमध्ये बंदीवान असलेल्या २०० पॅलेस्टिनींची त्वरित मुक्तता ही प्रमुख मागणी होती. याशिवाय आणखी दोन दहशतवाद्यांची जर्मन तुरुंगांतून मुक्तता, तसेच पश्चिम आशियातील एखाद्या देशात विमानाने सुरक्षित प्रवासाची हमी आणि व्यवस्था या इतर मागण्या होत्या. 

ऑलिम्पिक स्पर्धेचे काय झाले?

दोन इस्रायलींची हत्या आणि नऊ इस्रायलींना ओलीस ठेवल्याचे वृत्त ऑलिम्पिक ग्राम, जर्मनी आणि जगात वाऱ्यासारखे पसरले. तरीही स्पर्धा सुरूच ठेवाव्यात अशी अजब भूमिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अॅव्हरी ब्रुंडाग यांनी घेतली. दहशतवाद्यांबरोबर वाटाघाटी सुरू असताना, ओलिसांच्या सुटकेसाठी एक प्रयत्न झाला. परंतु जगभरच्या वृत्तमाध्यमांचे कॅमेरे घटनास्थळावर रोखलेले होते आणि त्यांच्या मार्फत पोलिसांच्या साऱ्या हालचाली दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत होत्या असे कळताच हा प्रयत्न सोडून देण्यात आला.  

वाटाघाटींची परिणती कशात झाली?

दिवसभर वाटाघाटी सुरू होत्या. आपल्या  मागण्या मान्य झाल्या या समजातून दहशतवादी ओलिसांना घेऊन ५ सप्टेंबर रोजीच विमानतळाकडे निघाले. तेथे प्रथम बसगाड्या आणि नंतर दोन हेलकॉप्टरमधून म्युनिचपासून २५ किलोमीटरवर एका हवाईतळावर पोहोचले. तेथे जर्मन पोलीस सापळा रचून बसले होते. हवाईतळावर लुफ्तान्सा या जर्मनीच्या राष्ट्रीय विमान कंपनीचे विमान तयार ठेवण्यात आले होते. या विमानात कोणीही प्रवासी नव्हते आणि १७ जर्मन पोलिसांचे एक पथक कॅबिन क्रूच्या पोशाखात तेथेही तैनात होते. सारे काही नियोजनानुसार होतेय असे वाटत असतानाच घात झाला. 

अप्रशिक्षित जर्मन पोलीस इस्रायलींच्या जिवावर…?

दहशतवादविरोधी प्रशिक्षणाचा अभाव असल्यास परिस्थिती कशी चिघळू शकते, याचा पुढील घटनाक्रम म्हणजे एक दुर्दैवी नमुना ठरला. डोळ्यांवर पट्टी आणि हात बांधलेले अशा अवस्थेतील इस्रायली ओलिसांना घेऊन विमानात चढण्यापूर्वी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी त्या विमानाची तपासणी करायचे ठरवले. त्यानुसार दोन दहशतवादी विमानात शिरले आणि त्यांना कसला तरी संशय आला. त्यांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तो ऐकून हवाईतळ परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी नियोजन झुगारून देऊन गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडूनही गोळीबार सुरू झाला, यात काही दहशतवादी आणि एक पोलीस ठार झाला. या चकमकीत दहशतवाद्यांनी तो परिसर प्रकाशमान करणारे मोठाले दिवे फोडून टाकले. त्यामुळे अंधार झाला. हेलिकॉप्टर कर्मचारी पसार झाले, पण बांधलेल्या अवस्थेतील इस्रायली दोन्ही हेलिकॉप्टरांमध्ये अडकून पडले. अधूनमधून गोळीबाराचा आवाज येत होता. सारे काही शांत झाले असे वाटत असताना मध्यरात्रीच्या जरा आधी अचानक एका जर्मन अधिकाऱ्याने ‘सर्व ओलिसांची मुक्तता झाली आणि सर्व दहशतवादी मारले गेले’, अशी घोषणा एकतर्फीच केली. त्यामुळे पोलीस बेसावध झाले आणि ती संधी साधून एका दहशतवाद्याने एका हेलिकॉप्टरमध्ये ग्रेनेड फेकले, ज्याच्या स्फोटात त्यातील चारपैकी तीन इस्रायली ठार झाले. उर्वरित इस्रायलीचा मदतपथके पोहोचण्यापूर्वी धुराने घुसमटून मृत्यू झाला. दरम्यान आणखी एका दहशतवाद्याने दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये गोळ्यांचा वर्षाव केला, ज्यात तेथील चार इस्रायली ठार झाले. तोपर्यंत जर्मन पोलिसांच्या मदतीला चिलखती गाड्या पोहोचल्या, परंतु त्यांच्याकडे दूरसंदेशवहनाची साधनेच नव्हती. त्यामुळे या गाड्या, विमानातील पोलीस आणि परिसरात तैनात पोलीस यांच्यात कोणताही समन्वय नव्हता. अशा मोहिमांमध्ये लागणाऱ्या स्नायपर बंदुकाही पुरेशा नव्हत्या. अजून काही काळ गोळीबार सुरू राहिला. ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजता मोहीम संपली, त्यावेळी ११ इस्रायली, एक जर्मन पोलीस आणि पाच दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जर्मन पोलिसांना यश आले, पण त्यांच्या चुकांची मोठी किंमत इस्रायलींना चुकवावी लागली. 

घटनेचे पडसाद…?

एके काळी ज्या जर्मन शासकांमुळे लाखो ज्यूंना अमानुष छळ आणि मृत्यूला सामोरे जावे लागले, त्याच जर्मनीतील नवीन शासकांनीही ज्यूंना किंवा इस्रायलींना वाचवण्यात पुरेशी खबरदारी आणि संवेदनशीलता दाखवली नाही, ही जगभरातील ज्यूंची सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. ऑलिम्पिक स्पर्धा ६ सप्टेंबर रोजी एक दिवस मृत इस्रायलींप्रति शोकसंवेदना म्हणून थांबवण्यात आली. ऑलिम्पिक इतिहासातील अशी पहिलीच घटना होती. ऑलिम्पिक समिती अध्यक्ष ब्रुंडाग यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेची चर्चाही पुढे अनेक दिवस चालली. अटक झालेले तीनही दहशतवादी पुढे विविध मार्गांनी सुटले. तरी इस्रायलच्या तत्कालीन खमक्या पंतप्रधान गोल्डा मायर यांच्या पुढाकाराने हा कट रचणाऱ्या बहुतेकांचा इस्रायली गुप्तहेर आणि सैनिकांच्या हस्ते काटा काढण्यात आला. युद्धोत्तर पश्चिम जर्मनीत नागरी मोहिमांमध्ये तेथील लष्करी सहभागावर निर्बंध घालण्यात आले होते. या घटनेनंतर जर्मनीमध्ये दहशतवादविरोधी प्रशिक्षित पथकाची बांधणी करण्यात आली. ११ इस्रायलींच्या नातेवाईकांना २.८ एकूण कोटी डॉलरच्या भरपाईवर अगदी अलीकडे शिक्कामोर्तब झाले. तसेच या काळ्या घटनेस ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने जर्मनीकडून जाहीर माफी मागण्याचा निर्णयही अगदी अलीकडे घेण्यात आला.