Rooh Afza Indian or Pakistani drink? अलीकडेच योगगुरू बाबा रामदेव यांनी रूह अफ़ज़ा सरबतावर टीका केली होती. या सरबताच्या विक्रीतून मिळणारा पैसा मदरसे आणि मशिदी तयार करण्यासाठी वापरला जातो, असे म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी हे सरबत पाकिस्तानी असल्याचीही टीका केली, त्याच पार्श्वभूमीवर या सरबताचे मूळ नेमकं कोणतं हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

जगभरातील १ अब्ज लोक रुह अफ़ज़ाचे सेवन करतात. हे पेय औषधी आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. या पेयाचा इतिहास १०० वर्षांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपातील अनेक देशांमध्ये या सरबताला विशेष पसंती आहे. विशिष्ट प्रकारचा सुवास, चव आणि गोडवा अशी या पेयाची ओळख. मिलेनियल्स असोत की, बेबी बूमर्स सगळ्यांमध्येच या सरबताची चव प्रिय आहे किंबहुना प्रत्येकाच्या आठवणी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने या सरबताशी संबंधित आहेत.

रुह अफ़ज़ाचा इतिहास

‘रुह अफ़ज़ा’चा इतिहास रोचक आहे. या सरबताच्या जन्माची कहाणी फाळणीपूर्व भारतात सुरु होते. हे पेय भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच अस्तित्वात आलं होतं. १९०७ सालच्या प्रचंड उकाड्यात या सरबताचा जन्म झाला. दिल्लीच्या लालकुआ बाजारात हमदर्द नावाच्या एका लहानशा युनानी दवाखान्यात औषधी सिरपच्या स्वरूपात हे सरबत जन्माला आलं. १९०७ साली हकीम अब्दुल मजीद यांनी ‘रुह अफ़ज़ा’ची निर्मिती केली. त्यांचा हेतू उष्णतेपासून होणारा त्रास, डिहायड्रेशन यावर उपचार करणं हा होता. थोडक्यात, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधी सिरपची निर्मिती करण्यात आली होती. हकीम मजीद यांनी युनानी वैद्यकशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी काही महत्त्वाची जडीबुटी एकत्र करून या औषधी सिरपची निर्मिती केली होती. या औषधाचा खप मोठ्या प्रमाणात झाला.

रुह अफ़ज़ाचा लोगो

दिल्लीच्या तत्कालीन ब्रिटिश राजवटींच्या कालखंडात हे सरबत हळूहळू संपूर्ण देशभर पसरू लागलं. त्यामुळेच हकीम मजीद यांनी या सरबताचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेतला. हकीम मजीद यांनी १९१० साली मिर्झा नूर अहमद यांना ‘रुह अफ़ज़ा’चा लोगो डिझाईन करण्यास सांगितलं होत. मिर्झा नूर अहमद यांनी गुलाब, केवडा, गाजर, पालक, द्राक्ष या घटकांचा समावेश असलेलं डिझाईन तयार केलं. त्या काळी दिल्लीत उत्तम दर्जाची प्रिंटिंग टेक्नॉलॉजी उपलब्ध नसल्याने लोगोमध्ये अचूक रंग यावेत यासाठी लोगोची मुंबईमध्ये (तत्कालीन बॉम्बे) छपाई केली गेली. या सरबताच्या लेबलवर रुह अफ़ज़ाचे नाव हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये छापण्यात आले. आजही हे लेबल तसेच आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. रुह अफ़ज़ा म्हणजे रुह-आत्म्याला शांती देणारे सरबत. या कामात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना मदत केली होती. १९१५ पासून हे पेय दिल्लीमध्ये विशेषतः मुस्लिम समुदायात लोकप्रिय झालं.

फाळणी आणि रुह अफ़ज़ाचा प्रसार

१९४७ साली भारताची फाळणी झाली. अब्दुल मजीद यांचा मोठा मुलगा अब्दुल हमीद भारतात राहिला आणि धाकटा हकीम सईद कराचीला गेला. पाकिस्तानमध्ये त्यांच्या धाकट्या मुलाने दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरातून रुह अफ़ज़ाच्या निर्मितीची सुरुवात केली. एक रंजक गोष्ट म्हणजे सुरुवातीला हकीम सईद आणि त्यांच्या टीमने जुन्या बाटल्यांचा वापर केला आणि ते प्रत्येक बाटलीवर लेबल हाताने चिकटवायचे. काही वर्षांनंतर जर्मनीमध्ये नव्या बाटल्यांचे डिझाईन तयार झाले. सुरुवातीला काचेच्या बाटल्या होत्या. परंतु, नंतर प्लास्टिकच्या बाटल्याही आल्या. पाकिस्तानमध्ये ‘हमदर्द लॅबोरेटरी’ स्थापन झाली आणि ‘रुह अफ़ज़ा’ तिथे सर्वात प्रिय पेय ठरलं. हकीम सईद यांना जाहिरातीची ताकद माहीत होती. त्यांनी सुरुवातीच्या अनेक जाहिराती स्वतः लिहिल्या होत्या. ते उत्तम लेखक होते. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली रुह अफ़ज़ाने भरारी घेतली. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९९३ साली सिंध प्रांताचे गव्हर्नर झाले. त्यांनी युनानी उपचार पद्धतीला प्रोत्साहन दिले होते. १९९८ साली काही अज्ञातांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली.

रुह अफ़ज़ा आणि लॉकडाऊन

फाळणी ही केवळ सीमा किंवा भूभागाची विभागणी नव्हती, ती कुटुंबांची विभागणी होती. भारतात जन्माला आलेला आणि पाकिस्तानात वाढलेला हा ब्रँड आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे. सध्या सिरप मार्केटचा अर्ध्याहून अधिक भाग ‘रुह अफ़ज़ा’च्या ताब्यात आहे. इतकंच नाही, तर २०२० मध्ये लॉकडाऊन लागू झाल्यावर ‘रुह अफ़ज़ाला ‘आवश्यक वस्तू’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

रमझानमधील रुह अफ़ज़ाचं महत्त्व

रमझानच्या काळात या पेयाचे महत्त्व आणखीनच वाढते. २०१९ साली रमझानच्या काळात भारतात ‘रुह अफ़ज़ा’चा तुटवडा निर्माण झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुह अफ़ज़ा ही केवळ एक सरबताची बाटली नाही, तर ती आपल्या उपखंडाच्या इतिहासाची, सांस्कृतिक समृद्धीची आणि सामायिक आठवणींची साक्ष आहे. फाळणी, संघर्ष, स्पर्धा या सगळ्यांपलीकडे जाऊन हे पेय अनेक पिढ्यांच्या जिव्हाळ्याचं प्रतीक ठरलं आहे. एका बाजूला धार्मिक आणि राजकीय मतभेदांच्या वादळात हे पेय वारंवार टीकेच्या भोवऱ्यात सापडतं, पण दुसऱ्या बाजूला ते आपली गोड परंपरा, मेळ आणि ओळख जपून आजही अनेक घरांमध्ये स्थान टिकवून आहे.