Viral Reddit post: स्वतःच्या हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण, मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या प्रत्येकालाचं ते शक्य होईल असं नाही. त्यामुळे अनेक जण नाखुशीने भाड्याच्या घरात राहण्याचा पर्याय निवडतात. म्हणूनच दरमहा काही हजारोंचा ईएमआय भरून घर विकत घ्यावं किंवा भाडं देऊन राहावं हा प्रश्न जेवणाच्या एकाच टेबलवर बसलेल्या लोकांना दोन गटात विभागू शकतो. मोठं कर्ज घेऊन घर खरेदी करण्यात शहाणपण आहे की, घर भाड्याने घेऊन उरलेल्या रकमेची गुंतवणूक करण योग्य आहे? या प्रश्नाने सध्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. एका रेडिट पोस्टाने या वादाला वाचा फोडली आहे. त्यानंतर लोकांनी आपले अनुभव, ठोस मतं मांडली आहेत आणि आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या काय अधिक फायदेशीर ठरणार आहे, याविषयी विचार व्यक्त केले आहेत.

पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

ज्या (Reddit) रेडिट पोस्ट वरून या चर्चेला सुरुवात झाली त्या पोस्टमध्ये एका युजरने म्हटले होते की, फ्लॅट खरेदीसाठी कर्ज घेऊ नये, त्याऐवजी भाड्याने राहावे. कुठल्याही टियर १ शहरात कुठलाही साधारण प्लॅट खरेदी करण्यासाठी किमान १.५ कोटी खर्च करावे लागतात. त्या किंमतीच्या २०% म्हणजे ३० लाख रुपये डाऊन पेमेंट दिलं तरी कर्जाची रक्कम १.२ कोटी उरते. तर सध्याच्या वार्षिक ७.५% गृहकर्ज व्याजदरांनुसार दरमहा ८०,००० रुपयांचा ईएमआय मोजावा लागतो, म्हणजे ईएमआयचा हप्ता निवृत्तीपर्यंत भरावा लागतो.

या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, हे कर्ज फेडण्यासाठी जे व्याज भरावं लागतं, ते व्याज फ्लॅटच्या किंमती इतकंच होण्याची शक्यता आहे. म्हणजे हप्ता फिटेपर्यंत आपण बँकेचे भाडेकरू असतो. तुम्ही मालक नसता, हप्ता थकला की तुम्हाला कधीही घराबाहेर काढलं जाऊ शकतं. कालांतराने फ्लॅटची किंमत घटते, अनेकांना घरं हे वारसाहक्काचं साधन वाटतं, पण तसं ते नसतं. उलट, हाच फ्लॅट दरमहा ३०,००० ते ३५,००० रुपयांत भाड्याने घेता येऊ शकतो. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीसाठी अतिरिक्त रक्कम उरते.

इंटरनेटवरील चर्चा

या पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. एका युजरने मान्य केलं की, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत फ्लॅट खरेदी करणं धोकादायक ठरू शकतं, तर वीस वर्षांपूर्वी हा निर्णय निःसंकोच घेता आला असता. मात्र, दुसऱ्या युजरने या मताला विरोध करत म्हटलं की १.५ कोटींचा फ्लॅट फक्त ३५,००० रुपयांत भाड्याने मिळणं हे नोकरीच्या भरपूर संधी असलेल्या शहरांत अवास्तव आहे आणि घरमालकी हा केवळ आकड्यांचा हिशोब नसतो. त्याच्या मते, घर खरेदीविरुद्ध सल्ला देणारे अनेक वित्तीय प्रभावक (finance influencers) हे सुरक्षित आणि स्थिर कुटुंबीय पार्श्वभूमीतून आलेले असल्याने असा सल्ला देतात. परंतु, ज्यांच्याकडे वारसा म्हणून काहीच नाही, त्यांच्यासाठी स्वतःचं घर मिळवणं ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची प्राथमिकता असू शकते.

इतरांनी घरमालकीचे प्रत्यक्ष फायदे अधोरेखित केले. एका युजरने नमूद केले की, ईएमआय वेळेवर भरत असाल, तर बँक तुम्हाला घरातून बेदखल करू शकत नाही. पण, ज्या घरात भाड्याने राहात आहेत, त्या घराचा मालक मात्र नोटीस देऊन, कधीही मनमानीने घर रिकामं करण्यास भाग पाडू शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, घरमालकांना आपली मालमत्ता कायदेशीररित्या भाड्याने देण्याचा, रचनेत बदल करण्याचा आणि हाऊसिंग सोसायटीच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो हे अधिकार बहुतेक भाडेकरूंना मिळत नाहीत. शिवाय, ईएमआयवर रेपो रेट्सचा परिणाम होतो, तर भाडं अनेकदा पूर्णपणे मालकाच्या मनाप्रमाणे ठरवलं जातं.

तरीही, काही युजर्सचा ठाम आग्रह होता की, फ्लॅट खरेदी फक्त तेव्हाच योग्य ठरते, जेव्हा ती तुम्हाला परवडणारी असते. कधीही असा फ्लॅट घेऊ नका ज्याच्या ईएमआयसाठी तुमचा पूर्ण पगार किंवा किमान ७५% पगार खर्च होतो,” असा इशारा एका युजरने दिला. त्याचा सल्ला होता की, किंमत कमी असलेला फ्लॅट खरेदी करा, मग तो कमी दर्जाच्या भागात असो किंवा अगदी टियर ३ शहरात, पण गरज पडल्यास परतण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचं घर कायम असलं पाहिजे.

आर्थिक विश्लेषक काय म्हणतात?

पूर्वी हैदराबादस्थित आर्थिक विश्लेषक हार्दिक जोशी यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं होते की, स्थिर नोकरी असलेल्या लोकांसाठी घर खरेदी करणं योग्य ठरतं, तर आर्थिक वाढ आणि जागतिक संधी शोधणाऱ्यांसाठी भाड्याने राहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. ‘भाड्याने राहणं की घर खरेदी करणं’ या चर्चेत त्यांनी सांगितलं की मुंबई, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू किंवा हैदराबादसारख्या मेट्रो शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी प्रचंड आर्थिक बांधिलकीची गरज असते. प्रमुख भागातला २ बीएचके फ्लॅट १.५ कोटी रुपयांचा पडतो, त्यासाठी ३० लाख रुपये डाऊन पेमेंट आणि १.२ कोटींचं कर्ज घ्यावं लागतं. ९% व्याजदराने हे कर्ज २० वर्षांत फेडताना एकूण परतफेडीची रक्कम २.५ कोटी रुपयांहून अधिक जाते. किंमतीव्यतिरिक्त, घर खरेदीमुळे स्वातंत्र्य कमी होतं आणि इतरत्र चांगल्या संधी शोधणं कठीण होतं. शिवाय, घरमालकांना देखभाल, मालमत्ता कर यांसारखे सततचे खर्चही करावे लागतात, तसेच पुनर्विक्री मूल्यावर परिणाम करणारे बाजारातील धोकेही पत्करावे लागतात. त्यामुळे घरमालकी हा केवळ आर्थिक नव्हे तर जीवनशैलीचा निर्णयही असतो.