मंगल हनवते
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महागड्या शहरांत हक्काचे घर घेणे सार्वसामान्यांसाठी अवघड ठरत आहे. मात्र अशा वेळी सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न परवडणाऱ्या दरात म्हाडा पूर्ण करते. त्यामुळेच म्हाडाच्या घरांवर उड्या पडतात. म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अनेक अटी आहेत. ज्या मंडळाची सोडत आहे त्या मंडळाच्या परिक्षेत्रात स्वतःचे घर नसावे यासह अनेक अटी आहेत. म्हाडाचे एकच घर घेता येते. असे असले तरी म्हाडाची एक योजना अशी आहे की ज्या योजनेद्वारे आधीचे म्हाडाचे घर असले, एकापेक्षा अधिक घरे असली, उत्पन्न कितीही असले तरी म्हाडाचे घर घेता येते. ही योजना म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. या योजनेअंतर्गत आता मुंबईकरांना विरार-बोळीजमधील घरे खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना नेमकी काय आहे याचा आढावा…
म्हाडाच्या स्थापनेमागील उद्देश काय?
पोटापाण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. या वाढत्या संख्येला समावून घेत त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी १९४८ मध्ये बॉम्बे हाऊसिंग बोर्ड कायद्यांतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाच्या माध्यमातून वसाहती उभ्या करून त्यावर घरे बांधून त्यांचे वितरण केले जाऊ लागले. पुढे १९७७ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ आणि या मंडळानंतर स्थापन झालेल्या इतर सर्व मंडळांचे विलनीकरण करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाची स्थापना करण्यात आली. म्हाडाची नऊ मंडळे असून सात विभागीय मंडळांच्या माध्यमातून गृहनिर्मिती करून सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. आतापर्यंत लाखो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील म्हाडाच्या घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. म्हाडाच्या सोडतीकडे मुंबईकर डोळे लावून बसलेले असतात. मध्यंतरी म्हाडा सोडतीत त्रुटी असल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर नुकताच सोडत प्रक्रियेत पूर्णतः बदल करण्यात आला असून नवीन संगणकीय सोडत प्रणाली अवलंबिली आहे. या नव्या प्रक्रियेअंतर्गत आणि नव्या प्रणालीच्या माध्यमातून आता लवकरच कोकण आणि मुंबई मंडळाच्या घरांची सोडत काढली जाणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना का सुरू झाली?
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईत घरे विकली जात नव्हती. त्यामुळे म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने घरे विकण्याची तरतूद केली. त्यानंतर अशी घरे विकली गेली. मात्र मागील वीस-पंचवीस वर्षात मुंबईतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजार घरांसाठी लाखोंनी अर्ज येतात. त्यामुळे मुंबईत वा कोकणात प्रथम येणाऱ्यास प्रधान्य योजना कधी राबवण्याची गरज पडली नाही. मात्र पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी मंडळातील अनेक घरे दोनदा, तीनदा सोडत काढूनही विकली जात नसल्याचे चित्र आहे. ही विकली न गेलेली घरे मंडळासाठी डोकेदुखी ठरतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने घरे विकली जात आहेत. विकल्या न गेलेल्या घरांची विक्री या योजनेद्वारे केली जात आहे.
विश्लेषण: घटता ग्राहक-उपभोग अधिक चिंताजनक का?
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना काय आहे?
ऑनलाईन सोडत पद्धतीने म्हाडाच्या घरांची विक्री केली जाते. मात्र अनेक कारणांनी काही घरे विकली जात नाहीत किंवा अनेक विजेते ही घरे परत करतात. एकदा घरे विकली गेली नाहीत की दुसऱ्यांदा सोडत काढली जाते. त्यावेळीही घरे विकली न गेल्यास तिसऱ्यांदा सोडत काढली जाते. या तिसऱ्या सोडतीत घरे विकली न गेल्यास मात्र ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रधान्याने विकली जातात. म्हणजेच विकली न गेलेली घरे सोडती प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट केली जातात. सोडतीच्या जाहिरातीत नमूद केल्यानुसार निश्चित वेळेत नोंदणी करून सर्वप्रथम अनामत रक्कमेसह अर्ज सादर करेल तो पात्र अर्जदार घरांसाठी थेट विजेता ठरतो. सोडतीच्या दिवशी औपचारिकरित्या याची घोषणा केली जाते. दरम्यान जितकी घरे तितकेच अर्ज स्वीकारले जातात आणि ही घरे विकली जातात.
या योजनेसाठी कोणत्या अटींमध्ये बदल झाला?
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्यात आलेली घरे प्राधान्याने विकली जावीत हाच उद्देश आहे. त्यामुळे या घरांच्या वक्रिीसाठी अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखाद्याचे महाराष्ट्रात कुठेही घर असले, एकापेक्षा अधिक घरे असली, म्हाडा-सिडको, एसआरए किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेतून पूर्वी घर घेतले असले तरी प्रथम प्राधान्य योजनेनुसार म्हाडाचे घर घेता येते. महत्त्वाचे म्हणजे एका वेळी या योजनेतून एक किंवा त्यापेक्षा अधिक घरेही विकत घेता येतात. फक्त त्यासाठी सर्वात आधी अनामत रकमेसह अर्ज बँकेत सादर करणे आवश्यक असते. या घरांसाठी उत्त्पन्नाचा दाखला किंवा प्राप्तिकर विवरण पत्र याची गरज नसते. म्हणजेच तुमचे उत्पन्न किती आहे हे येथे गृहित धरले जात नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासाचा दाखला आणि इतर आरक्षण असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र इतक्याच बाबी यासाठी आवश्यक असतात. ज्या मंडळाची सोडत असेल त्या मंडळाच्या परिक्षेत्रात (पालिका क्षेत्रात) मालकी हक्काचे घर नसलेल्यांनाच एरवी सोडतीत सहभागी होता येते. त्यामुळे एक घर असतानाही दुसरे घर घेऊ इच्छिणारे सोडतीपासून दूर रहातात. पण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेत कोणीही कितीही घरे घेऊ शकतात. म्हाडाची बांधलेली घरे विक्री वाचून धूळ खात पडलेली असतात. त्यामुळे या योजनेतील खरेदीदारांना आहे त्या स्थितीत घरे स्वीकारावी लागतात.
विरार-बोळीजमधील घरांची प्रथम प्राधान्य तत्त्वाने विक्री?
मुंबई किंवा मुंबई महानगर प्रदेशातील घरांची प्रथम प्राधान्याने विक्री करण्याची वेळ मागील काही वर्षात तरी आलेली नाही. पण आता मात्र विरारमधील २०४८ घरांची विक्री प्रथम प्राधान्याने केली जाणार आहे. ही घरे महाग असल्याने आणि तेथे पाण्याची सोय नसल्याने घरे विकली जात नसून विकलेली घरे परत केली जात आहेत. त्यामुळे आता ही घरे प्रथम प्राधान्याने विकली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना पहिल्यांदाच हक्काचे घर असले तरी त्याच परिक्षेत्रात म्हाडाचे आणखी एक घर घेता येणार आहे.