निमा पाटील

युक्रेनने २२ सप्टेंबरला क्रिमियातील सेवास्टोपोल येथे रशियाच्या काळा समुद्र नौदल ताफ्याच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यामध्ये रशियाचे अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याचा दावाही युक्रेनने केला. हे मुख्यालय रशियाच्या सर्वात शक्तिशाली संरक्षण स्थानांपैकी एक आहे. या हल्ल्यासाठी पाश्चात्त्य देशांनी मदत केल्याचा आरोप रशियाने केला आहे. त्याला लक्ष्य करण्यात आल्याने क्रिमिया परत मिळवण्यासाठी युक्रेनने सर्व शक्ती पणाला लावली आहे का, रशिया आणि युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सेवास्टोपोलमध्ये २२ सप्टेंबरला काय झाले?

सेवास्टोपोल हे क्रिमियातील सर्वात मोठे शहर आणि काळ्या समुद्रातील महत्त्वाचे बंदर आहे. रशियाच्या काळ्या समुद्रातील नौदल ताफ्याचे मुख्यालय येथेच आहे. २२ सप्टेंबरला या ठिकाणी रशियाच्या नौदल अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना सकाळीच युक्रेनच्या दोन क्षेपणास्त्रांनी या मुख्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात रशियाच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला. त्याचे अधिक तपशील दिले गेले नाहीत, मात्र त्यानंतर एक संरक्षण अधिकारी बेपत्ता झाल्याचे रशियाने सांगितले. दोनच दिवस आधी या मुख्यालयाच्या जवळच्याच कमांड पोस्टवर युक्रेनने हल्ला चढवला होता.

आणखई वाचा-विश्लेषण: अरुण गवळीला फर्लो मंजूर… फर्लो आणि पॅरोलमध्ये काय फरक? ही सवलत म्हणजे कैद्यांचा हक्क असतो का?

या हल्ल्यानंतर रशियाने काय आरोप केला?

सेवास्टोपोलमधील मुख्यालयावर हल्ल्यासाठी युक्रेनला पाश्चात्त्य देशांनी मदत केल्याचा आरोप रशियाने केला. पाश्चात्त्य देशांच्या गुप्तहेरांकडून मिळालेली माहिती, नाटोचे उपग्रह आणि टेहेळणी विमाने यांचा वापर करून, तसेच अमेरिका व ब्रिटनच्या सुरक्षा संस्थांच्या सल्ल्याने आणि त्यांच्याशी समन्वय ठेवून युक्रेनने हा हल्ला केला असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा बुधवारी म्हणाल्या. या युद्धामध्ये अमेरिका आणि नाटो युक्रेनला केवळ पाठिंबा देत नसून ते युद्धामध्ये सक्रियपणे सहभागी असल्याचा आरोप रशिया वारंवार करत आहे.

युक्रेन कधीपासून आक्रमक झाला?

युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाश्चात्त्य देश अधिक सक्रिय झाले. युक्रेनला पाठिंबा आणि रशियावर निर्बंध याद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होतीच. नंतर हे देश युक्रेनला आवश्यक शस्त्रपुरवठा करण्यासही तयार झाले. त्यानुसार अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे तर नाटोने प्रशिक्षित सैनिकांचा पुरवठा केला आहे. ब्रिटनने प्रशिक्षित वैमानिक युक्रेनच्या मदतीला पाठवले. या सामग्रीच्या बळावर युक्रेनने जून महिन्यापासून अधिक आक्रमकपणे उत्तर द्यायला सुरुवात केली. यासाठी युक्रेन देशांतर्गत बनावटीच्या ड्रोनचाही समर्थपणे वापर करत आहे. त्यांनी रशियाने ताब्यात घेतलेला स्वतःचा काही भूप्रदेश परत मिळवला. मात्र त्यांना अद्याप लक्षणीय यश मिळालेले नाही.

आणखी वाचा-ॲमेझॉनची बाजारावर मक्तेदारी? एकाचवेळी १७ राज्यांनी का दाखल केला खटला?

युद्धादरम्यान दोन्ही देशांच्या रणनीती कशा बदलत गेल्या?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी झटपट युक्रेनचा काही भूप्रदेश ताब्यात घेऊन तिथे आपले मर्यादित सैन्य तैनात करून परत येण्याचे लक्ष्य ठेवले होते. ही रणनीती आखताना युक्रेन फारसा विरोध करणार नाही असा त्यांचा अंदाज होता. २०१४ मध्ये रशियाने क्रिमिया ताब्यात घेतले तेव्हा युक्रेनने दाखवला तसाच शिथिलपणा आताही दिसेल अशी रशियाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात युक्रेनने प्रतिकार केला. सुरुवातीला युक्रेनने स्वतःचा बचाव करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या बाजूने मत वळवून घेणे यावर भर दिला. आंतरराष्ट्रीय आघाडीवर मुत्सद्देगिरीमध्ये पाठिंबा आणि युद्धसामग्री मिळाल्यानंतर युक्रेनने युद्धात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. रशियाची ताकद पाहता त्यांना एकदम मोठे यश मिळणे अत्यंत कठीण असले तरी लहानलहान गावे परत मिळवून रशियाला मागे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, सुरुवातीला आक्रमण केलेल्या रशियाने आता बचावात्मक भूमिका घेतली आहे. बचाव हा रशियाचे पारंपरिक बलस्थान राहिले आहे.

युक्रेनचे सध्याचे लक्ष्य काय आहे?

अलिकडील महिन्यांमध्ये युक्रेन क्रिमिया, काळा समुद्र आणि अगदी मॉस्कोलाही लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे. काळ्या समुद्रातील रशियाच्या नौदलाचा ताफ्यावर युक्रेनने गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या प्रकारे ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ले केले आहेत त्यावरून ही बाब स्पष्ट होते. त्यामुळेच, २०१४ मध्ये गमावलेला क्रिमिया परत मिळवण्याच्या दृष्टीने युक्रेनने आपली रणनीती बदलली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nima.patil@expressindia.com