Amrita Devi and 363 Bishnoi villagers sacrificed their lives: भारतीय संस्कृतीत निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तरीही निसर्गाची होणारी हानी आपल्याला रोखता आलेली नाही. परंतु, आपण एखादी गोष्ट मनात आणली तर त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची तयारी असली तर काय घडू शकतं, हे सांगणारी एक घटना ११ सप्टेंबर १७३० साली जोधपूरजवळील एका छोट्याशा वाळवंटी गावात घडली. एका धाडसी स्त्रीच्या नेतृत्त्वाखाली बिष्णोई समाजातील ३६३ जणांनी खेजडीच्या झाडांची होणारी तोड थांबण्यासाठी राजाच्या सैनिकांनी केलेले प्रहार झेलले होते. म्हणूनच २०१३ साली पर्यावरण आणि वन खात्याने हा दिवस राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून घोषित केला. या सर्वोच्च बलिदान गाथेचा परिणाम म्हणूनच भारतभर पुढे अनेक पर्यावरण चळवळी उभ्या राहिल्या. म्हणूनच, बिष्णोई लोकांनी खेजडी झाडांसाठी प्राण का दिले, हे समजून घेण्यासाठी त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध समजून घेणं गरजेचं आहे.
थरचा रुक्ष प्रदेश
भारतीय वाळवंटापैकी (थर वाळवंट) साठ टक्क्यांहून अधिक भाग राजस्थानात आहे. येथील पर्जन्यमानात प्रचंड चढ -उतार पाहायला मिळतात. येथे उन्हाळ्यातील तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं आणि त्याच बरोबर सतत वाळुची वादळ होत असतात. वारे ताशी १४०–१५० किलोमीटर वेगानं वाहतात. राजस्थानात विरळ आणि नाजूक झुडपी वनस्पतींमध्ये झाडं फारच तुरळक आहेत. यांपैकी सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे खेजडी (प्रोसोपिस सिनेरेरिया) आहे. त्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. येथे काळवीट आणि चिंकारा हरिणे आढळतात, तसेच तित्तिर आणि बटेर पक्षीही आढळतात. असा उग्र आणि प्रतिकूल भूभाग बिष्णोई समाजाचं घर आहे. त्यांच्या वेगळ्या वेशभूषेमुळे ते सहज ओळखता येतात. परंपरेनुसार पुरुष पांढरे कपडे परिधान करतात, तर स्त्रिया लाल आणि पिवळ्या रंगांच्या विशिष्ट डिझाईनची घाघरा-चोळी आणि घुंगट घेतात. स्त्रिया चंद्रकोरीसारख्या आकाराच्या नथी घालतात.
बिष्णोई हे १५ व्या शतकातील संत गुरु जांभेश्वर यांचे अनुयायी आहेत. त्यांच्या दिलेल्या २९ आज्ञा हेच त्यांचे जीवनमूल्य ठरले. ‘बिष्णोई’ हा शब्दच ‘बिस’ (वीस) आणि ‘नोई’ (नऊ) या शब्दांवरून तयार झाला आहे, म्हणजेच ‘एकोणतीस’. या आज्ञांपैकी सात सामाजिक आचारधर्म शिकवतात, दहा वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित आहेत, चार दैनंदिन उपासनेसंबंधी आहेत, तर उरलेल्या आठ प्राण्यांचे आणि झाडांचे संरक्षण व उत्तम पशुपालन याबाबत आहेत. ह्याच तत्त्वांमुळे ते या प्रतिकूल वाळवंटी प्रदेशातही समाधानाने जगतात. २०१९ साली एका बिष्णोई स्त्रीचा स्वतःच्या लेकराबरोबर काळविटालाही स्तनपान करत असलेला फोटो व्हायरल झाला होता. बिष्णोई लोक झाडं आणि वन्यप्राण्यांचं रक्षण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यामुळेच बिष्णोईंची गावं इतरांपेक्षा हिरवळीनं नटलेली दिसतात आणि हरणं, निलगाय यांचे कळप मोकळेपणाने फिरताना सहज दिसतात.
पवित्र खेजडी
खेजडी झाडाचं बिष्णोईंच्या जीवनात विशेष स्थान आहे आणि ही झाडं तोडणं किंवा त्याच्या फांद्या छाटणं हे निषिद्ध मानलं जातं. हे लहानसं सदाहरित झाड थर वाळवंटाची जीवनवाहिनी म्हणून गौरवलं गेलं आहे. ते सावली देतं; त्याची पानं उंट, शेळ्या, गुरं आणि इतर जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडतात; त्याची शेंगं खाण्यायोग्य आहे आणि लाकूड इंधनासाठी वापरलं जातं; त्याच्या मुळांमुळे जमिनीत नायट्रोजन स्थिरावतं आणि माती सुपीक होते. म्हणूनच खेजडी वाळवंटी अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी अनमोल मानली जाते. वैदिक काळापासून शमी म्हणून पूज्य मानलं गेलेलं हे झाड रामायण आणि महाभारतातही ठळकपणे आढळतं.
महाबलिदान
जोधपूरपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर खेजडली हे छोटंसं गाव आहे. इतर बिष्णोई गावांसारखंच हेही हिरवाईनं नटलेलं असून खेजडीच्या झाडांनी विशेष समृद्ध आहे. ११ सप्टेंबर १७३० च्या सकाळी मोठ्या कुऱ्हाडी हातात घेऊन काही अनोळखी माणसं घोड्यांवरून गावात उतरली. ते काय घडतंय हे पाहण्यासाठी अमृता देवी आपल्या तिन्ही मुलींना घेऊन घराबाहेर धावून आल्या आणि इतर गावकरीही बाहेर पडले. त्यांना कळलं की हे राजा अभयसिंहाचे सैनिक होते, त्यांच्यावर खेजडीची झाडं तोडून जोधपूरच्या मेहरानगढ किल्ल्यात नेण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. महाराज अभयसिंह नवीन राजवाडा बांधण्याच्या तयारीत होते आणि बांधकामासाठी लागणाऱ्या भट्ट्या पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाची गरज होती.
चुनखडीपासून चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये अतिउष्ण तापमानाची गरज होती. वाळू आणि पाण्याबरोबर मिसळल्यावर हा चुना गारा बनायचा, जो दगड- विटा जोडण्यासाठी वापरला जाई. भट्ट्या सतत पेटत्या ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाकडाची गरज भासत असे. त्यामुळेच या सैनिकांचा ताफा खेजडली गावात खात्रीशीर लाकूड मिळवण्यासाठी पोहोचला होता.
झाडं, विशेषतः खेजडीचं झाड तोडणं किंवा त्याला इजा करणं हे बिष्णोई धर्माविरुद्ध असल्यामुळे अमृता देवी यांनी सैनिकांना विरोध केला. पण, ते ढिम्म हलले नाहीत. मग अमृता देवींनी एका झाडाला मिठी मारली कठोर सैनिकांनी कुऱ्हाडीचे फटके झाडावर मारताना तिचं शिर धडापासून वेगळं झालं. आईचं धडापासून वेगळं झालेलं शिर पाहून तिच्या तिन्ही मुलींनी शौर्याने तिचा मार्ग धरला. त्यांनीही झाडांना मिठी मारली आणि त्याचप्रकारे आपला बळी दिला. पण राजाच्या माणसांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी उलट अधिक जोमानं झाडं तोडणं सुरू ठेवलं.
ही बातमी वणव्याप्रमाणे पसरली आणि ८३ बिष्णोई गावांतील लोक खेजडलीला जमले. सभेत ठरलं की, प्रत्येक झाड तोडलं जाईल, तेव्हा एक बिष्णोई स्वेच्छेने आपला जीव अर्पण करेल. शेवटी ४९ गावांतील एकूण ३६३ बिष्णोई त्या दिवशी शहीद झाले. खेजडलीची माती त्यांच्या रक्तानं लाल झाली.
राजाला ही भयानक बातमी कळल्यावर त्याने झाडं तोडण्यावर त्वरित बंदी घातली. बिष्णोईंच्या शौर्याचा मान राखून त्याने संपूर्ण समाजाची माफी मागितली आणि एक ताम्रपत्र कोरून कायमस्वरूपी असा फतवा जारी केला की, बिष्णोई गावांच्या हद्दीत आणि आजूबाजूला झाडं तोडणं व प्राण्यांची शिकार करणं निषिद्ध राहील. हा कायदा आजही लागू आहे आणि बिष्णोई आपली जैवविविधता तितक्याच कठोरपणे जपत आहेत.
पहिले पर्यावरणप्रेमी
खेजडलीचं बलिदान हे पूर्णपणे अहिंसक होतं. बिष्णोईंनी ते आपलं कर्तव्य समजून निभावलं. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक झाड किंवा प्राणी हा माणसाइतकाच जिवंत आहे आणि त्यामुळे त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. यामुळे माणूस, त्याचं पर्यावरण, धार्मिक विश्वास आणि समाज यांच्यात अधिक सुसंवाद निर्माण झाला आणि सर्वांना सौहार्दाने जगता आलं. आज तज्ज्ञ यालाच ‘शाश्वत विकास’ म्हणतात आणि बिष्णोई समाजाला ‘भारताचे पहिले पर्यावरणप्रेमी’ मानतात. मात्र बिष्णोईंसाठी हे काही वेगळं नाही, तो त्यांच्या धर्माचाच एक भाग आहे.
या घटनेनंतर जवळपास २३० वर्षांनी खेजडलीच्या कथेने आणखी एका पर्यावरण चळवळीला प्रेरणा दिली. तेहरी-गढवाल हिमालयातील चिपको आंदोलन (१९७३). याच चळवळीपासून बिहार-झारखंडमधील जंगल बचाव आंदोलन (१९८२), कर्नाटकातील पश्चिम घाटात अप्पिको चळवळ (१९८३) आणि अशाच इतर आंदोलनांना जन्म मिळाला. या सर्व चळवळींचा उद्देश निसर्गाचं रक्षण हा होता आणि यामुळे सार्वजनिक धोरणांमध्येही बदल घडून आला.
‘झाडाला मिठी’ मारण्याची चिपको चळवळीची पद्धत आणि तिचा संदेश भारताच्या सीमा ओलांडून स्वित्झर्लंड, जपान, मलेशिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि थायलंडपर्यंत पोहोचला. एकुणखेजडलीची ही चळवळ आता जगभर पोहोचते आहे