प्रबोध देशपांडे
पश्चिम विदर्भात पूर्णा नदीच्या खोऱ्यात खारपाणपट्टा येतो. खारपाणपट्ट्यातील भूजल हे पूर्णत: खारे आहे. क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने शेतीचा पोतही खराब झाला. खारपाणपट्ट्यावर आतापर्यंत विविध संशोधन करण्यात आले. कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, अद्यापही खारपाणपट्ट्याचा प्रश्न व तेथील समस्या कायमच आहेत.
खारपाणपट्ट्याने नेमके किती क्षेत्र व्यापले आहे?
पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खारपाणपट्टा आहे. खारपाणपट्ट्यामध्ये १६ तालुक्यांतील चार लाख ७० हजार हेक्टरवर क्षेत्र येते. पूर्णा नदी काठच्या दोन्ही काठांवरील भागात भूगर्भातील पाणी खूप खारे आहे. त्यामुळे सुमारे ४० ते ५० कि.मी. रुंद आणि १५५ कि.मी.लांबीच्या भागाला खारपाणपट्टा म्हटले जाते. पूर्व-पश्चिम वाहिनी असलेल्या पूर्णा नदीने ७ हजार ५०० चौरस कि.मी.चे क्षेत्र व्यापले आहे. यात ४,७०० चौरस कि.मी. म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र खारपाणपट्ट्यात मोडते. खारपाणपट्ट्यात सुमारे ९३२ गावांचा समावेश आहे.
पाण्याची समस्या काय?
भूगर्भात खारे पाणी तसेच माती क्षारयुक्त असल्याने भूपृष्ठावर संचयित केलेल्या पाण्यात क्षार मिसळून पाणी खारट होते. या नैसर्गिक समस्यांमुळे परिसरातील नागरिकांना गोड्या पाण्याची समस्या कायम भेडसावते. खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये विहिरी आहेत. परंतु, सर्वच विहिरींचे पाणी खारे आहे. गोड पाण्याचे दुसरे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पिण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा लागतो. या भागातील नागरिक पाण्यासाठी पूर्णा व तिच्या उपनद्यांवर अवलंबून राहतात. धरणांमध्ये पाणी साठवले जात असल्याने पावसाळा झाल्यावर काही महिन्यांतच नद्या कोरड्या पडतात. नदी किंवा नाल्याच्या पात्रात खोदलेल्या खड्ड्यांभोवती हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतांनाचे चित्र खारपाणपट्ट्यात सर्वत्र दिसून येते. अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. खारपाणपट्ट्यातील गावांसाठी मंजूर केलेल्या विविध पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या असून अनेक योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी खारपाणपट्ट्यातील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
विश्लेषण: पंचांगकर्ते पावसाचा अंदाज काय वर्तवितात?
खारपाणपट्ट्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
वर्षानुवर्षे गढूळ व क्षारयुक्त पाणी पिल्याने खारपाणपट्ट्यातील गावांमधील नागरिकांना मूत्रपिंडाच्या आजारासह विविध व्याधींनी ग्रासले आहेत. नियमित खारे पाणी प्यावे लागत असल्याने शरीरात विविध रोगांचा जन्म होतो. खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराने दरवर्षी शेकडो रुग्णांचा बळी जातो. खारपाणपट्ट्यातील बहुतांश घरांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून येतात. त्यांना ‘डायलिसिस’ सारखे महागडे उपचार करावे लागतात. खाऱ्या पाण्यामुळे पोटाचे व इतर आजार देखील बळावतात. आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. उपचाराच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध नाहीत. उपचारासाठी शहराच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने शारीरिक व आर्थिक संकटामुळे खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
कृषी क्षेत्राला बाधा पोहोचते का?
पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाणपट्ट्याचा शाप शेती, मातीलादेखील बसला आहे. खारपाणपट्ट्यातील जमीन व पाणी खारे असल्याने भूगर्भातील पाणी सिंचन तसेच पिण्यासाठी अयोग्य आहे. पर्यायाने भू-पृष्ठावरील साठ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सिंचनाच्या सोयीसुद्धा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे संपूर्णत: निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून कोरडवाहू शेती आहे. खारपाणपट्ट्यातील जमीन तसेच पाणी दोन्ही घटक क्षारयुक्त असल्याने नागरिकांना कृषी व पिण्याचे पाणी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागतो. या जमिनीत मातीच्या कणांवर चिकटलेल्या क्षाराचे (सोडियम) सरासरी शेकडा प्रमाण ३.९७ ते १५.३५ दरम्यान आहे. शेती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. खारपाणपट्ट्यात शेतीचे करणे कमालीचे अडचणीचे ठरते. मात्र हरभरा, रब्बी ज्वारी, कपाशी आदी काही पिके चांगली येतात.
संशोधनाची स्थिती काय?
खारपाणपट्ट्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी आजपर्यंत असंख्य संशोधन झाले. कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. राज्य शासनाने अनेकवेळा खारपाणपट्ट्याच्या समस्येवर समित्या गठीत केल्या. त्याचे अहवाल तयार झाले. मात्र, ते धुळखात पडून आहेत. त्यामुळे आजही खारपाणपट्ट्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. खारपाणपट्ट्याच्या समस्येवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देखील अनेक संशोधन केले. ते संशोधन व्यापक स्वरूपाचे असून त्याची अंमलबजवणी झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. आता नव्याने संशोधन करून खारपाणपट्टात कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ४ हजार कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प देखील राबविण्यात येत आहे. पारंपरिक योजनांभोवतीच हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने त्याचा मूळ उद्देशच भरकटला. खारपाणपट्ट्यात ठोस व कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची खरी गरज आहे.
prabodh.deshpande@expressindia.com