पाकिस्तानात सामान्य माणूस असो वा कोणी मोठा माणूस; ते सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक संघर्ष अद्याप कायम असताना इस्लामबादमध्ये एका टिकटॉक स्टारची घरात घुसून गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी इस्लामाबादमध्ये १७ वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफ हिची तिच्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे ऑनर किलिंगचे प्रकरण असू शकते,असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पाकिस्तानी प्रसारक समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, संस्कृती, जीवनशैली व युवा सक्षमीकरणावरील व्हिडिओंसाठी ओळखल्या जाणाऱ्या या किशोरवयीन मुलीवर तिच्या एका नातेवाइकाने अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

सना युसूफ कोण होती? आणि तिची हत्या का करण्यात आली? हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे की अजून काही याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

कोण होती सना युसूफ?

२ जून २००८ रोजी जन्मलेली सना युसूफ पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील चित्राल येथील रहिवासी होती. ती एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी होती आणि महिला हक्क, संस्कृती आणि शिक्षण यावरील माहिती व जागरूकता यांसाठी ती तरुण प्रेक्षकांकरिता कंटेंट शेअर करण्याच्या दृष्टीने ती स्वतःच्या व्यासपीठाचा वापर करत असे. कालांतराने, तिने इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवीत डिजिटल विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. तिचे सुरुवातीचे आयुष्य व शिक्षण याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही.

सना ही वैद्यकीय शिक्षण घेत असून, ती पहिल्या वर्षात शिकत होती, अशी माहिती मिळत आहे. तिच्या सोशल मीडिया कंटेंटमध्ये विनोद, प्रेरणा आणि चित्रली संस्कृतीबद्दलचे खोल प्रेम ठळकपणे दिसत होते. टिकटॉकवर तिचे आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यानंतर इन्स्टाग्रामवरही ती पाच लाख फॉलोअर्ससह प्रसिद्ध होती. स्थानिक रीतिरिवाजांचे उत्सव साजरे करणारे आणि स्वतःला व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या रील्स जेन झेड पिढीला खूप आवडत. अनेकांनी तिची पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरशी तुलनाही केली होती. मनोरंजनाव्यतिरिक्त सनाने ब्रँड्ससोबतही काम केले आणि तिच्या वाढत्या ऑनलाइन फॉलोअर्सद्वारे इतर तरुणींना स्वतःला व्यक्त करण्यास ती प्रोत्साहित करत होती.

नेमकं काय घडलं?

सोमवारीच सना १७ वर्षांची झाली होती. सना युसूफची इस्लामाबादच्या जी-१३ सेक्टरमधील तिच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
द एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, हल्लेखोर तिला घरी भेटायला आला होता. बाहेर थोड्या वेळासाठी तिच्याशी बोलल्यानंतर त्याने तिच्यावर अगदी जवळून गोळीबार केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.
“इस्लामाबादच्या सेक्टर जी-१३ मध्ये राहणाऱ्या अप्पर चित्राल येथील सना युसूफला भेटायला आलेल्या एका पाहुण्याने तिला गोळ्या घालून ठार मारले”, असे पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. “हल्लेखोर घटनेनंतर लगेचच पळून गेला आणि त्याचा शोध सुरू आहे”, असेही पोलिसांनी सांगितले.

हत्येमागील हेतू अद्याप अस्पष्ट असला तरी तपासकर्त्यांना संशय आहे की, हे ऑनर किलिंगचे प्रकरण असू शकते. संशयिताची ओळख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांच्या स्थानिक अहवालांवरून असे दिसून येते की, तो तिच्या घराबाहेर इतर लोकांशी ज्या रीतीने तिच्याबद्दल बोलत होता, त्यावरून तो तिला वैयक्तिकरीत्या ओळखत असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सनाचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) इथे पाठविण्यात आला. या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सनाच्या मृत्यूची बातमी पसरताच तिच्या फॉलोअर्सना धक्का बसला आहे आणि पाकिस्तानमध्ये महिलांवरील हिंसाचार व त्यांच्या हत्येबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. सनाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा वर्षाव झाला. एका वापरकर्त्याने लिहिले की, तिच्या वाढदिवशीच तिचे निधन झाले आणि सनाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पोलिसही गुन्हेगाराची ओळख पटवून, त्याला अटक करण्याच्या दिशेने तपास करीत आहेत.

पाकिस्तानमधील पहिलीच घटना?

दुर्दैवाने, सना युसूफचा मृत्यू ही एक वेगळी घटना नाही. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये अशाच अनेक घटना घडल्या आहेत. जिथे तरुणींना त्या सोशल मीडियावर सक्रिय असल्या कारणाने लक्ष्य केले गेले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, क्वेटामध्ये हिरा नावाच्या १५ वर्षीय मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, असा आरोप तिच्या वडिलांनी आणि मामाने केला होता. पोलिसांना असा संशय आहे की, ती टिकटॉकवर सक्रिय असल्याने हा ऑनर किलिंगचाच प्रकार होता.
नंतरच्या अहवालांमध्ये असे उघड झाले की, हिराचे वडील अन्वरुल-हक यांनी तिला ऑनलाइन व्हिडीओ पोस्ट करणे थांबविण्याचा इशारा दिला होता. तिने नकार दिल्यावर त्याने त्याचा मेव्हणा तय्यब अली याच्यासोबत तिला मारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६ मध्ये पाकिस्तानच्या सर्वांत हाय-प्रोफाइल ऑनर किलिंग प्रकरणांपैकी एक म्हणजे कंदील बलोच. रूढीवादी नियमांना आव्हान देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोशल मीडिया स्टार कंदील बलोचची तिच्याच भावाने गळा दाबून हत्या केली. नंतर त्याला तिच्या हत्येबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तिच्या धाडसी व्यक्तिरेखेमुळे बलोच अनेकदा वादांत सापडली होती. ती पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास सांगत असे आणि व्हॅलेंटाईन डेला लाल रंगाचा ड्रेस परिधान करीत असे.
तिला अनेकदा टीकांना सामोरे जावे लागले आणि धमक्याही मिळाल्या होत्या. पण, अनेकांकडून, विशेषतः तरुण पाकिस्तानी लोकांकडून तिचे कौतुकही झाले होते. एएफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, समर्थकांनी तिला अशा देशात नवीन पाया रचणारी व्यक्ती म्हणून पाहिले, जिथे स्वतःला किम कार्दशियनसारखी व्यक्तिरेखा म्हणून सादर करणे हे महिला सक्षमीकरणाचे धाडसी पाऊल मानले जाऊ शकते