Satyajit Ray ancestral home history: भारत-बांगलादेश यांच्यातील सध्या तणावपूर्ण असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताने ढाक्याला मदतीचा हात पुढे केला आहे. जगद् विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे बांगलादेशातील मूळ जुने घर पाडून तिथे नवी इमारत बांधण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला होता. तर या वास्तूच्या जतनासाठीचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मयमनसिंह येथे असलेली प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि साहित्यिक सत्यजित रे यांची वडिलोपार्जित मालमत्ता तोडण्यात येत आहे. ही मालमत्ता सत्यजित रे यांचे आजोबा आणि प्रसिद्ध साहित्यिक उपेंद्रकिशोर रे चौधुरी यांच्याशी संबंधित आहे. हे ठिकाण सध्या बांगलादेश सरकारच्या मालकीचं असून बिकट अवस्थेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटलं आहे की,”या वास्तूला बंगाली सांस्कृतिक पुनर्जागरणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हे घर पाडण्याचा निर्णयावर पुनर्विचार होणं आवश्यक आहे. ते घर दुरुस्त करून साहित्य संग्रहालय किंवा भारत-बांगलादेशच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचं प्रतीक म्हणून जतन करण्याच्या पर्यायांचा विचार करणं गरजेचं आहे. यासाठी भारत सरकार सहकार्य करण्यास तयार आहे.”
या वास्तूचा नेमका इतिहास काय आहे?
बांगलादेशातील मयमनसिंह येथील हरिकिशोर रे चौधुरी रोडवर भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचं वडिलोपार्जित घर आहे. हे घर तब्बल ३६ एकरांवर पसरलेलं असून, सत्यजित रे यांचे आजोबा आणि प्रख्यात साहित्यिक उपेन्द्रकिशोर रे चौधुरी यांनी बांधले होते. उपेन्द्रकिशोर रे चौधुरी यांना बंगाली भाषेतील बालसाहित्याचे जनक मानलं जातं. त्यांनी मुलांसाठी विज्ञानविषयक लेखन आणि इतरही अनेक साहित्यकृती लिहिल्या. त्यांचा मूळ वंश किशोरगंज जिल्ह्यातील काटियाडी उपजिल्ह्यातील मसुआ गावातील जमीनदार घराण्याचा होता. जवळपास शंभर वर्षांपूर्वी त्यांनी हे प्रासादसदृश घर बांधलं. या प्रासादात राहण्यासाठीची वास्तू, प्रार्थनागृह आणि स्वयंपाकघर होतं. प्रार्थनागृहाच्या शेजारी ‘कचहरी बारी’ म्हणून ओळखलं जाणारं कार्यालयही होतं.
वाद नेमका काय?
या प्रासादाला लागूनच उद्यानगृह, हत्तींचा तलाव (Elephant Pond), खेळाचं मैदान, घराच्या मागे एक छोटा तलाव आणि समोर एका भव्य पायऱ्यांच्या घाटासह आणखी एक तलाव होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सत्यजित रे कधीही बांगलादेशातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी गेले नाहीत, हे स्थानिक रहिवाशांना खटकतं. या भागात राहणाऱ्या अनेक लोकांना वाटतं की, त्यांनी कधीच या ठिकाणात काही स्वारस्य दाखवलं नाही. इतिहासकार रफीकुल हक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “सत्यजित रे कधीच या घरात आले नाहीत आणि त्यांनी या ठिकाणाबद्दल कधीच काही रस दाखवला नाही. मग आपण याला सत्यजित रे यांचं घर का म्हणतो?”
त्यांच्या मते या घराला ‘उपेन्द्रकिशोर रे यांचं वडिलोपार्जित घर’ असं म्हणायला हवं. कारण ना सत्यजित रे आले, ना त्यांच्या वडिलांनी म्हणजे सुकुमार रे यांनीही कधी परत येण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात ही मालमत्ता बांगलादेश सरकारच्या ताब्यात आली आणि १९८९ साली इथे मयमनसिंह शिशु अकादमी सुरू करण्यात आली. मात्र, २००७ पासून हे घर पूर्णतः दुर्लक्षित असून त्याचा वापर थांबवण्यात आला आहे.
रे यांच्या वडिलोपार्जित घराचं रक्षण करण्याची मागणी
बांगलादेशच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, मयमनसिंहमधील रे यांचा पॅलेस गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ जीर्णावस्थेत आहे. ते पाडून त्याच्या जागी नवीन अर्धवट काँक्रीटचं बांधकाम करायचं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या इमारतीत अनेक खोल्या असतील, असं सांगितलं जातं. मात्र स्थानिकांनी या ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. बांगलादेशी कवी शमीम अश्रफ यांनी डेली स्टारला सांगितलं की, अनेक वर्षांपासून स्थानिकांनी या घराच्या जतनासाठी वारंवार मागणी केली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. “हे घर अनेक वर्षांपासून भग्न अवस्थेत आहे, छताला तडे गेले आहेत. तरीही अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व कधी समजून घेतलं नाही.”
पुरातत्त्वीय वारसाच
ढाका आणि मयमनसिंह विभागातील पुरातत्त्व विभागाच्या फील्ड ऑफिसर सबीना यास्मिन यांनी डेली स्टारला सांगितलं की, हे घर विभागाकडून अधिकृत वारसास्थळ म्हणून घोषित झालेलं नसलं तरी, सर्वेक्षणानुसार तो पुरातत्त्वीय वारसा आहे. फेब्रुवारी २०२० साली, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांनी सत्यजित रे, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन यांच्या वडिलोपार्जित घरांच्या जतनासाठी एक आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली होती.
भारतीय अधिकाऱ्यांची हस्तक्षेपाची मागणी
सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घराच्या पाडकामाची बातमी समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आणि बांगलादेश सरकारने यावर पुनर्विचार करावा अशी विनंती केली. “मला माध्यमांतून कळलं की, बांगलादेशातील मयमनसिंह शहरात असलेलं प्रसिद्ध लेखक- संपादक उपेन्द्रकिशोर रे चौधुरी यांचं वडिलोपार्जित घर पाडलं जात आहे. वृत्तानुसार पाडकामाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. ही अत्यंत दुःखद बातमी आहे,” असं बॅनर्जी यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं आहे.
बंगालच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतिनिधित्व
“रे कुटुंब बंगालच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतिनिधित्व करतात. उपेन्द्रकिशोर हे बंगाल रेनसाँच्या आधारस्तंभांपैकी एक होते. हे घर बंगालच्या सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेलं आहे, असं मला वाटतं. मी बांगलादेश सरकार आणि त्या देशातील सर्व सुज्ञ लोकांला आवाहन करते की, त्यांनी या समृद्ध परंपरेच्या वास्तूचं जतन करावं. भारतीय सरकारनेही यात लक्ष घालावं,” असं बॅनर्जी यांनी पुढे म्हटलं.
पाडकाम तत्काळ थांबवलं
वाढत्या दबावामुळे बांगलादेश प्रशासनाने मयमनसिंह येथे सुरू असलेलं सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घराचे पाडकाम तत्काळ थांबवलं आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी एक समिती स्थापन केली आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घराचाही मुद्दा
भारतीय अधिकाऱ्यांनी बांगलादेशात हस्तक्षेपाची मागणी केली आहे, हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही. याआधी जून महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी बांगलादेशातील सिराजगंज जिल्ह्यात नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घर ‘कचहरी बारी’ची तोडफोड करण्यात आली होती. बांगलादेशातील अधिकाऱ्यांच्या मते, एका पर्यटक आणि संग्रहालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मोटारसायकल पार्किंगच्या शुल्कावरून वाद झाल्याने ही घटना घडली. सिराजगंज जिल्ह्यातील शाहजादपूरमध्ये असलेलं हे घर १८४० मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांनी लिलावात १३ रुपये १० आण्यांना खरेदी केलं होतं.
टागोरांकडूना लिहिण्यासाठी प्रेरणा देणारी वास्तू
पहिल्यांदा हे घर विकत घेतल्यानंतर पन्नास वर्षांनी रवींद्रनाथ टागोर स्वतः बांगलादेशातील या मालमत्तेत आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या इस्टेटचं व्यवस्थापन करण्यासाठी ही जागा वापरली. पुढील दहा वर्षांत त्यांनी उन्हाळ्यात अनेक दिवस इथे व्यतीत केले. शेतकऱ्यांशी आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला, जमीन-संबंधित व्यवहारांची देखरेख केली. या घराने त्यांच्या साहित्यिक प्रतिभेलाही चालना दिली. आपल्या पुतणीला लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं, “इथे (शाहजादपूरमध्ये) मला इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा लिहिण्यासाठी जास्त प्रेरणा मिळते.”
त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी, १९६९ साली या घराला संरक्षित पुरातत्त्वीय वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आणि नंतर ते रवींद्र स्मृती संग्रहालय म्हणून रूपांतरित करण्यात आलं.