Mumbai Rains School Holiday: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील गावा-शहरांमध्ये अनेकांची त्रेधा तिरपिट उडाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आणि बघता बघता सगळंच ठप्प होऊ लागलं. सगळंच बंद नव्हतं. नोकरदार आणि ऑफिसेस त्याचप्रमाणे दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये पावसाच्या पाण्याची साचलेली तळी, डबकी- नाले होते. एकतर ऑफिसला जाण्याची घाई, त्यात पावसामुळे ट्रेन उशिरा, गाड्यांचा खोळंबा म्हणजे एकतर जिथे जायचं तिथे पोहोचू शकत नाही आणि दुसरं म्हणजे माघारी जातानाही वांदेच झालेले, ही झाली मोठ्यांची गत. सकाळी शाळेसाठी निघालेली मुलं… त्यांचे हाल तर पाहावतच नव्हते. कदाचित मुलांसाठी ती एका दिवसाची सुट्टी, पाण्यात भिजण्याची मजा असेलही. पण त्यांच्या पालकांचं काय? मुलं पाण्यात बुडतील इतकं पाणी साचलं होतं. पोलीस किंवा इतर जबाबदार नागरिकांनी मुलांना मदत केल्याचे व्हिडीओ आपण पाहिले खरे. पण, प्रश्न तसाच राहतो, हे किती दिवस चालणार आणि दोष कुणाचा, पावसाचा म्हणावा का?
यापूर्वी मुंबईत पाऊस पडत नव्हता का? पण गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलामुळे त्याचं पडणं पुरतं बदललं आहे. हवामानशास्त्रातील तज्ज्ञ म्हणतात, तो पडतोय तितकाच पण त्याचं वितरण असमान आहे आणि त्याची तीव्रता ही कमी तर कधी प्रचंड असते. यासाठी वाढती लोकसंख्या, गमावत असलेली हिरवाई, विकासाच्या नावाखाली होणारं शहरांचं बकालीकरण अशी अनेक कारणं आहेत. त्यात शाळेत जाणारी मुलं मात्र नाहक भरडली जात आहेत. जरा पाऊस पडला की, पाणी भरतं, शाळा सोडल्या जातात, त्याचवेळी बऱ्याच मुलांचे पालक स्वतः कुठेतरी एखाद्या ठिकाणी वा ऑफिसात अडकलेले असतात. त्यात मुलांचं टेन्शन, अशा वेळी माणसाची मानसिक ओढाताणही होते. पण, मुंबईचा वाढता आवाका आणि त्या अनुषंगाने सुरू असलेलं राजकारण पाहाता प्रश्न पडतो, किती दिवस पावसावर खापर फोडणार आपण?
मुळातच मुंबई हा कोकणाचा भाग असून हा सर्वाधिक पावसाचा प्रदेश आहेत. पाऊस आजच एकविसाव्या शतकात पडतोय असंही नाही. कौटिल्याने तर या प्रदेशाचा उल्लेख अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून केला आहे. बौद्ध धर्माच्या नोंदीतही हा अतिवृष्टीचा प्रदेश म्हणूनच नोंद आहे. म्हणजे किमान गेल्या २५००- ३००० हजार वर्षांपासून या भागात अतिवृष्टी होतंच आहे आणि म्हणूनच त्यापद्धतीने पूर्वीच्या शहरांचे नियोजन आणि घरबांधणी केली जात होती. पावसाच्या महिन्यांचं नियोजन त्यानुसारच केलं जात होतं; जे आपल्या पूर्वजांना कळलं ते आपल्याला का कळत नाहीये? आज प्रत्येकजण इतिहास आणि संस्कृती मोठ्या अभिमानाने मिरवतो, परंतु त्यातून आपण काहीच बोध घेणार नाही का?, याचाही विचार करणं गरजेचं आहे.
म्हणूनच शाळा आणि पाऊस यांचा संबंध भारतात नेमका कधीपासून आला, हेही पाहणं गरजेचं आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीतील सण, समारंभ, उत्सव हे मुख्यतः शेती आणि निसर्गाशी संबंधित आहेत. पावसाचे चार महिने हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असतात. आषाढ महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडून वाफसा झाला की, पेरणी केली जाते. तर आश्विन महिन्यात पिकांची तोडणी केली जाते व कार्तिकात मळणी केली जाते. त्यामुळेच या चार महिन्यात आषाढी एकादशीपासून ते दिवाळीपर्यंत येणारे सण शेतीशी संबंधित असतात. या काळात शेतकरी स्वतः काही काळ विश्रांती घेतो. हे फक्त शेतीच्याच बाबतीत होतं असं नाही.
हिंदू धर्मात पावसाच्या काळात देव झोपी जातात अशी संकल्पना आहे, हा तोच चातुर्मासाचा काळ असतो. म्हणूनच या काळात प्रवास न करता.. एका जागी थांबून, व्रत वैकल्यांसाठी द्यावा असे संदर्भ सापडतात. जैन धर्मकल्पनेनुसार या काळात एका गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात.
बौद्ध धर्मातही चातुर्मासाची संकल्पना आहे. बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार फार काळ एका ठिकाणी राहण्याची परवानगी भिक्खूंना नाही. केवळ पावसाच्या काळात एका ठिकाणी राहण्याची परवानगी असे. पावसाळी वातावरणात प्रवास करणे कठीण होते, म्हणूनच बौद्ध धर्मात वर्षावास ही संकल्पना विकसित झालेली दिसते. एकूणच भारतीय संस्कृतीत मुसळधार पावसाच्या पहिल्या चार महिन्यात प्रवास टाळण्याचा सल्ला दिलेला आहे. प्राचीन गुरुकुल पद्धतीतही हाच प्रघात दिसतो. मुळात इथे एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे आजच्या काळात इथे कुणीही पावसाचे चार महिने घरात बसून राहा, असं सांगत नाही. काही प्रथा, पद्धती अनुभवातून आलेल्या असतात. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. त्यामुळे या काळातील उत्सवी अनुभवालाही एक वेगळे महत्त्व आहे. हे सांगण्यामागचा हेतू इतकाच की, पावसाळा आणि निसर्गाला अनुसरून आपल्या संस्कृतीत काही गोष्टी रुजत गेल्या, त्यातून बोध घेणं आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या हे ब्रिटिशांचं देणं
आजच्या भारतातील आधुनिक शिक्षणाचं श्रेय निश्चितच ब्रिटिशांकडे जातं. त्यांनी शाळांना एक निश्चित शैक्षणिक वर्ष आखून दिलं, जे योग्यही होतं. या शैक्षणिक वर्षात एप्रिल-मे महिन्यांमध्ये उन्हाळी सुट्टी ठेवली. म्हणजेच भारतीय शाळांमधील लांब उन्हाळी सुट्ट्यांची परंपरा ही ब्रिटिशांनी सुरु केली.
हवामानाशी जुळवून घेणे
ब्रिटिशांनी हेच महिने सुट्ट्यांसाठी का निवडले, हेही समजून घेणं गरजेचं आहे. ब्रिटिश हे युरोपातून भारतात आले, तिकडचं वातावरण थंड होतं. भारतात आल्यावर त्यांना उष्ण वातावरण सहन होईना. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचा उष्णता सहन न झाल्यामुळे मृत्यूही झाला होता. त्यामुळे भारतातील अतिउष्ण महिन्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कुटुंबासह शिमला, ऊटी, दार्जिलिंग, नैनीताल अशा हिल-स्टेशन्सकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एप्रिल-मे-जून या महिन्यांत शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवली जात असतं. हाच ‘समर रीसेस’ पुढे शैक्षणिक दिनदर्शिकेचा भाग झाला.
भारतीय शाळांनी केलेला स्वीकार
इंग्लंडमध्ये मोठी सुट्टी जुलै– ऑगस्टमध्ये असे. कारण तिथे उन्हाळा या काळात असतो. तिकडचा उन्हाळा हा सौम्य असतो, त्यामुळे ब्रिटिश नागरिक या काळात बीच किंवा तत्सम ठिकाणी सुट्टी घालवत. त्याच प्रमाणे ब्रिटिशांनी भारतात एप्रिल-मे–जून हे सर्वाधिक उष्णतेचे महिने असल्याने सुट्टी त्या काळात ठेवण्यास सुरुवात केली. परंतु, ते अतिउष्णतेचे असल्याने त्यांना थंड हवेच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत असे. त्यामुळे कचेऱ्या, शाळा, महाविद्यालयं यांना सुट्ट्या देण्यात येऊ लागल्या. नंतर भारतीयांनी चालवलेल्या शाळांनीही हीच पद्धत स्वीकारली.
स्वातंत्र्यानंतरचे सातत्य
१९४७ नंतरही भारतात हीच सुट्टीची पद्धत कायम राहिली. शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्च/ एप्रिलमध्ये होत असल्यामुळे जून/ जुलैमध्ये नवे सत्र सुरू करण्यासाठी ही वेळ सोयीस्कर ठरत होती. हळूहळू या सुट्ट्या एक सांस्कृतिक पद्धतच ठरल्या. याकाळात अनेक कुटुंबं सहली, विवाहसोहळे किंवा गावी जाण्याची योजना आखू लागली. म्हणूनच एप्रिल-मे मध्ये लांब सुट्ट्या देण्याची कल्पना ही प्रत्यक्षात ब्रिटिशांची देणगी असली तरी भारतीयांनीही स्वीकारली. ब्रिटिशांनी भारतातील उष्ण महिन्यांपासून बचाव करण्यासाठी ती पद्धत सुरू केली आणि नंतर ती आपल्या शालेय कॅलेंडरमध्ये कायमस्वरूपी स्थिर झाली.
तरीदेखील, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, केरळ आणि कर्नाटकच्या ग्रामीण भागात अजूनही काही शाळा अतिवृष्टीमुळे जून महिन्यात सुट्टी देतात. यावरून दिसते असे की, भारतातील शैक्षणिक सुट्ट्या या केवळ अभ्यासाच्या दिनदर्शिकेशीच नव्हे तर निसर्ग आणि परंपरांशीही घट्ट जोडलेल्या आहेत. ब्रिटिश भारतात उष्णता ही समस्या असली तरी आजकालच्या शाळांमध्ये एसी, पंखे यांची सोय केलेली असते. त्यामुळे, शहरातल्या मुलांसाठी भूतकाळातून धडा घेऊन पावसाच्या काळात शाळांना सुट्या देण्याचा विचार करण्यास काहीच हरकत नसावी, असाही एक विचार आता पुढे येतो आहे. तर काय वाटतं, आपल्याकडे शाळांना पावसाळ्यात सुट्टी असावी का?