Silent killer heart disease गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी अनेक घटनांसाठी शरीरातील अनियंत्रित कोलेस्ट्रॉलची पातळी आणि उच्च रक्तदाब कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. परंतु, हृदयरोगतज्ज्ञ रक्तामध्ये दडलेल्या एका धोक्याविषयी सांगतात. कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब या धोक्यांबद्दल जितकी जागरूकता आहे, तितकी जागरूकता या धोक्याविषयी नाही किंवा त्याची तपासणी (स्क्रीनिंग) केली जात नाही. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, हा ‘सायलेंट किलर’ हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे नुकसान वेगाने वाढवू शकतो. जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण हृदयविकार असल्यामुळे, रुग्ण आणि डॉक्टर या दोघांसाठीही या नवीन धोक्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा धोका नक्की काय आहे? त्यामुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढतो? डॉक्टर या धोक्याविषयी काय सांगतात? त्याविषयी जाणून घेऊयात…

‘सायलेंट किलर’ म्हणजे काय?

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रक्तातील एका थरकाप उडवणाऱ्या धोक्यावर प्रकाश टाकला आहे, जो कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यांसारख्या सामान्य चिन्हांपेक्षा अधिक हानिकारक असू शकतो. त्यांच्या पोस्टनुसार, त्यांनी धमन्यांच्या प्लेकमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म प्लास्टिकच्या कणाविषयी सांगितले आहे. त्यांनी एका निरीक्षण अभ्यासाचाही उल्लेख केला आहे, जो ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झाला होता. त्यानुसार ज्या रुग्णांच्या धमन्यांच्या प्लेक नमुन्यांमध्ये हे कण आढळले, त्यांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा मृत्यू होण्याचा धोका जास्त होता. या तपासात मानवी एथेरोमासमध्ये, रोगप्रतिकारक पेशींच्या अगदी आत, पॉलिथिलीन आणि पॉलीविनाइल क्लोराईडसारखे प्लास्टिकआधारित तुकडे आढळले.

अभ्यासात काय आढळले?

हा मुख्य पुरावा एका अभ्यासातून आला आहे, ज्यामध्ये कॅरोटीड धमनीचे प्लेक शस्त्रक्रिया करून काढले गेले होते, त्यांचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीखाली परीक्षण करण्यात आले. २५७ रुग्णांच्या ऊतींच्या नमुन्यांपैकी अर्ध्याहून अधिक नमुन्यांमध्ये प्लेकच्या आत प्लास्टिक अडकलेले आढळले. आतापर्यंत हृदयविकार मुख्यतः कोलेस्ट्रॉल (विशेषतः लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन), उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह आणि जीवनशैलीच्या घटकांमुळे येतो हे स्पष्ट होते. मात्र, या नव्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, हे कण शरीरात असले तरीही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

प्लेकमध्ये सूक्ष्म प्लास्टिकसारखे कण, म्हणजेच मायक्रोस्कोपिक फॉरेन मॅटर्स उपस्थित असल्यास तीव्र जळजळ, एंडोथेलियलचे नुकसान रक्तवाहिन्यांना इजा पोहोचवते. या सर्वांमुळे एथेरोस्क्लेरोसिसची जलद वाढ होते आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या घटनांची शक्यता वाढते. याचा अर्थ असा आहे की, केवळ कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आदींची तपासणी करणे पुरेसे नाही. तज्ज्ञ असेही सुचवतात की, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांसाठी पर्यावरण किंवा भौतिक पदार्थांच्या संपर्काचा विचार करणे आवश्यक असू शकते.

सर्वाधिक धोका कोणाला?

प्लास्टिकसारखे सूक्ष्म कण ऊतींमध्ये अडकून जळजळ निर्माण करतात. ज्या व्यक्तींमध्ये पूर्वीपासून एथेरोस्क्लेरोसिस किंवा धमनी प्लेक आहे, त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. पर्यावरण, पाणी, खाद्यपदार्थांची पॅकेजिंग किंवा श्वासाद्वारे मायक्रोप्लास्टिक्स किंवा नॅनोप्लास्टिक्सच्या उच्च पातळीच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही याचा धोका अधिक असतो. ज्या व्यक्तींना लवकर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार होण्याचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा ज्यांना हृदयविकाराचा झटका वाढवणारी अनुवांशिक प्रवृत्ती आहे, त्यांनादेखील याचा धोका असतो. डॉ. यारानोव्ह सांगतात की, अन्न, पेयांचे कंटेनर, पॅकेजिंग सामग्री आणि हवेतील कण यांच्याद्वारे लोक अधिकाधिक प्लास्टिकच्या संपर्कात येतात. धमनी प्लेकसाठी प्लास्टिक कणांची नियमित तपासणी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांसाठी महत्त्वाची आहे.

हा धोका ओळखल्याने खालील गोष्टी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते:

  • हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रुग्णांची इमेजिंग किंवा बायोमार्कर चाचणी करणे.
  • पर्यावरणाचा संपर्क, व्यावसायिक धोका किंवा कणांचा संपर्क वाढवू शकणारे जीवनशैलीचे घटक याबद्दल चौकशी करणे.
  • पाण्याच्या बाटल्या, पॅकेजिंग सामग्री, अन्न साठवण आदींसाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे.
  • हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम घटकांवर (कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान सोडणे) नियंत्रण राखणे.
  • दाह कमी करणारे जीवनशैलीचे उपाय (नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन व्यवस्थापन) समाविष्ट करणे.

हृदयाचे आरोग्य वाढवणारे इतर उपाय:

सूर्यप्रकाश आणि दररोज चालण्याचे महत्त्व : बाहेर फिरायला जाण्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. सूर्यप्रकाश आणि बाहेर फिरायला जाणे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटनुसार, “दररोज चालणे हृदयविकार, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते.”

आतड्याच्या आरोग्यावर (गट हेल्थ) लक्ष केंद्रित करणे : उदयोन्मुख विज्ञान ओळखते की आतड्यांचे आरोग्य लिपिड मेटाबोलीझमवर परिणाम करते. त्यासाठी फायबर-समृद्ध संपूर्ण अन्न, शेंगा, भाज्या आणि आंबवलेल्या पदार्थांचे सेवन योग्य असते. आतडे केवळ पचनासाठी नाहीत, ते तुमच्या शरीरात चरबी कशी हाताळली जाते याच्याशी जोडलेले आहेत; ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.

ताण आणि झोप : दीर्घकाळचा ताण आणि झोप नीट न झाल्यास शरीरात सूज येते (इन्फ्लेमेशन), ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. यासाठी आनंदी राहणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळणे आणि नियमित झोप घेणे फायदेशीर ठरते. खराब झोप आणि ताण यामुळे इन्फ्लेमेशन वाढते; ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि लिपिड प्रोफाइल खराब होतात. हे सर्व हृदयासाठी हानिकारक आहे. त्यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.