सध्याच्या भांडवली बाजारातील अस्थिर वातावरणात किरकोळ गुंतवणूकदारांना मिळणारा नफा दुर्लभ झाला आहे. मात्र या परिस्थितीत देखील गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू ठेवली असून मासिक आधारावर एसआयपीतून येणारी नवीन ओघ उच्चांक गाठत आहे, हे समाधानकारक आहे.
एसआयपीच्या माध्यमातून किती गुंतवणूक?
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या जून महिन्यात त्यायोगे आजवरची सर्वोच्च २७,२६९ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. भांडवली बाजारात अस्थिरतेचे वातावरण असूनही किरकोळ गुंतवणूकदारांकडून ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक कायम आहे.
‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, मे महिन्यात झालेल्या २६,६८८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा सरलेल्या जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये २.२ टक्के वाढ आहे. जून महिन्याअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही वाढून ९.१९ कोटींवर पोहोचली आहे, जी मे महिन्यात ९ कोटी नोंदवली गेली होती. म्हणजेच सरलेल्या महिन्यांत एकूण १३ लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांची भर पडली.. या महिन्यात ६२ लाख नवीन एसआयपी नोंदणी झाल्या होत्या, तर ४८ लाख खाती बंद झाली किंवा त्यांची मुदत झाली.
‘एसआयपी’चा ओघ वाढण्याची कारणे काय?
‘एसआयपी’च्या माध्यमातून येणारा ओघ हा गुंतवणूकदारांच्या शिस्तबद्ध सहभागाचे प्रतिबिंब आहे. जूनमधील गुंतवणूक हा एक संभाव्य वळणबिंदू आहे, जो भारतीय भांडवली बाजारावरील आत्मविश्वास आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढती जोखीम घेण्याची क्षमता अधोरेखित करतो. म्हणजेच ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि विक्रमी योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढती विश्वासार्हता निदर्शनास येते. जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या मासिक गुंतवणुकीने नवीन उच्चांक गाठला आहे. सलग पाच महिन्यांच्या अवधीनंतर इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडात निव्वळ ओघ आला आहे.
म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील मालमत्ता किती?
‘एसआयपी’च्या खात्यांमधील व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १४.६१ लाख कोटी रुपयांवरून १५.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘एसआयपी’ एयूएमचे म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत (एयूएम) २०.६ टक्के योगदान आहे, जे मे महिन्यामध्ये २०.२ टक्के होते. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण निव्वळ व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ७४.४१ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली, जी मेमध्ये ७२.२० लाख कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये ६९.९९ लाख कोटी रुपये होती.
‘इक्विटी’मधील ओघ किती वाढला?
सलग पाच महिन्यांच्या घसरणीनंतर इक्विटी फंडांमध्ये नक्त वाढ झाली आहे. इक्विटी फंडांतील निव्वळ आवक डिसेंबरमध्ये ४१,१५६ कोटी रुपयांवरून जानेवारीमध्ये ३९,६८८ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये २९,३०३ कोटी रुपये, मार्चमध्ये २५,०८२ कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये २४,२६९ कोटी रुपयांवर सतत घसरली. या घसरणीपूर्वी, नोव्हेंबरमध्ये आवक ३५,९४३ कोटी रुपये होती. मेमध्ये इक्विटी फंडामध्ये २२ टक्के घट झाल्यानंतर, जूनमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमधील आवक २४ टक्क्यांनी वाढली असून,ती २३,५८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मुख्यतः ओपन-एंडेड इक्विटी योजनांमध्ये निव्वळ गुंतवणूक सुरू राहिल्याचा हा सलग ५२ वा महिना राहिला आहे.
‘एसआयपी स्टॉपेज रेश्यो’ काय सांगतो?
म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या काही महिन्यांनंतर ‘एसआयपी स्टॉपेज रेश्यो’ अर्थात एसआयपी बंद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात एसआयपीच्या टक्केवारीनुसार स्टॉपेज रेश्यो ५६.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो मे २०२५ मध्ये सुमारे ७२ टक्के आणि एप्रिलमध्ये जवळजवळ ३०० टक्के होता. मासिक आधारावर पाच महिन्यांच्या कालावधीत पुन्हा एकदा एसआयपीच्या माध्यमातून होणारी मासिक गुंतवणूक वाढते आहे.
भांडवली बाजारातील सध्याचे अडसर काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राष्ट्रांवर अतिरिक्त कर (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा केली आहे. शिवाय भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मकता कायम असली तरी अद्याप घोषणा न झाल्याने गुजतावणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे. अमेरिकेतील जेन स्ट्रीटवरील बंदीमुळे शेअर बाजारावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाला असून वायदे बाजारातील व्यवहार संख्या घटली आहे. तसेच देशांतर्गत आघाडीवरदेखील बाजाराला चालना देणाऱ्या घटनांचा अभाव असल्याने बाजार मर्यादित श्रेणीत व्यवहार करतो आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी एसआयपीच्या माध्यमातून होणारी दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते आहे. यामुळे बाजार तेजीला अडसर असले तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजारावरील विश्वास कायम ठेवल्याचे प्रतीत होते आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप म्युच्युअल फंड
चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४७,००० कोटी रुपये गुंतवून मिडकॅप आणि स्मॉलकॅप म्युच्युअल फंडांना गुंतवणूकदारांनी स्पष्ट पसंती दर्शविली आहे आणि या श्रेणींनी चांगला परतावा दिला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, अलिकडच्या वर्षांत उच्च परतावा मिळाल्याने यातील गुंतवणूक वाढली आहे आणि निधी गमावण्याची भीती (फोमो) देखील गुंतवणूकदारांना मागील कामगिरीचा पाठलाग करण्यास प्रवृत्त करत असल्याची शक्यता आहे. चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, मिड कॅप फंडांमध्ये एकूण २१,८७० कोटी रुपयांची, तर त्याच कालावधीत स्मॉल कॅप फंडांना २४,७७४ कोटी रुपयांचा निधी मिळाला.
गोल्ड ईटीएफकडे ओढा का वाढतोय?
शिखराला भिडल्यानंतर आता सोन्याच्या किमतीतील स्थिरता आणि जागतिक अनिश्चिततेमुळे जून महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफमध्ये २,०८ कोटी रुपयांचा नक्त ओघ राहिला. ही पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. ॲम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात २९२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर त्याआधीच्या एप्रिलमध्ये ६ कोटी रुपये आणि मार्चमध्ये ७७ कोटी रुपयांचा निव्वळ निधी ‘गोल्ड ईटीएफ’मधून काढून घेण्यात आला होता. यासह, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) गोल्ड ईटीएफमध्ये निव्वळ ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
यातून या श्रेणीतील व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) जूनअखेर ४ टक्क्यांनी वाढून ६४,७७७ कोटी रुपयांवर पोहोचली, जी मे महिन्यात ६२,४५३ कोटी रुपये होती. जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरण आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा गोल्ड ईटीएफला पसंती दिली आहे. स्थिर उत्पन्न बाजारपेठेतील अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओला पुनर्संतुलित करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा आकर्षक
गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंडांच्या युनिट्सप्रमाणे शुद्ध सोन्यातील गुंतवणुकीचे युनिट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करतात आणि डिमॅट खात्यात साठवले जातात. भौतिक धातूंमध्ये गुंतवणूक करण्याइतकाच हा सरळ, सुरक्षित व सोपा पर्याय आहे. गोल्ड ईटीएफचे प्रत्येक युनिट अत्यंत उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या मूल्याइतकेच असते. इतर कोणत्याही ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड-ईटीएफ’प्रमाणे गोल्ड ईटीएफदेखील भांडवली बाजारात सूचिबद्ध आणि निरंतर खरेदी-विक्री व्यापारास खुले असते. गोल्ड ईटीएफमध्ये कमीत कमी ४५ रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. सोन्यात गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ एक सुरक्षित पर्याय समजला जातो. गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडच असतो.