Sunjay Kapur’s Sona Comstar Rs 30,000-Crore Feud : ऑटो पार्ट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष संजय कपूर यांचं १२ जून रोजी अकाली निधन झालं. प्राथामिक माहितीनुसार- लंडनमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. संजय कपूर यांच्या निधनानंतर सोना ग्रुपच्या वारसा हक्कावरून कपूर कुटुंबात वाद उफाळून आला आहे. कंपनीच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा…
कपूर कुटुंबीयांचे दावे काय?
संजय कपूर यांची बहीण मंधिरा कपूर व त्यांच्या ८० वर्षांच्या आई राणी कपूर यांनी सोना कॉमस्टारच्या कारभारावर तसेच वारसा हक्कावर आपला दावा सांगितला. मात्र, कंपनीच्या विद्यमान मंडळाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले. संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांची सोना कॉमस्टारच्या संचालकीय मंडळावर नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे मंधिरा व राणी कपूर बाजूला पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी संचालक मंडळाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली असून आता हा वाद कायदेशीर लढाईकडे वळण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप कपूर कुटुंब किंवा कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मंधिरा कपूर यांनी काय आरोप केला?
कोट्यवधींची आर्थिक उलाढाल असलेल्या सोना कॉमस्टारचे नियंत्रण कोणाच्या हाती यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. ३०,००० कोटींच्या सोना कॉमस्टार साम्राज्यात आपली आणि आईची कोणतीही मालकी उरली नसल्याचा आरोप दिवंगत मंधिरा कपूर यांनी केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आम्हाला नुकतंच कळालं की कंपनीच्या शेअर्स आणि मालमत्ता एका तथाकथित ट्रस्टमध्ये हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. “ज्या कंपनीच्या उभारणीसाठी मोठे कष्ट घेतले, त्याच कंपनीतून आम्हाला बाहेर काढलं”, असा दावाही मंधिरा यांनी केला आहे.
आणखी वाचा : अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का बसणार? चीनचं स्टेबलकॉइन्स आहे तरी काय?
राणी कपूर यांच्याकडून घेतल्या स्वाक्षऱ्या?
मंधिरा कपूर यांच्या म्हणण्यानुसार- संजय कपूर यांच्या निधनानंतरच्या १३ दिवसांच्या शोकसभेत त्यांच्या ८० वर्षीय आई राणी कपूर यांच्यावर काही कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्यासाठी वारंवार दबाव आणला गेला. त्यावेळी बंद दाराआड कायदेशीर कागदपत्रांवर त्यांच्याकडून स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे कागदपत्रांचा खरा आशयदेखील त्यांना समजावून सांगण्यात आला नाही. राणी कपूर यांना आपण नेमके कशावर सही करत आहोत, याची पूर्ण कल्पना नव्हती. कपूर कुटुंबात कौटुंबिक वाद सुरू असतानाच २५ जुलै रोजी प्रिया सचदेव कपूर यांची सोना कॉमस्टारच्या संचालक मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती प्रमोटर कंपनी Aureus Investments Pvt. Ltd. यांच्या शिफारशीवर झाली.
सोना कॉमस्टारचे संचालकीय मंडळ काय म्हणाले?
यापूर्वी २३ जुलै रोजी संचालक मंडळाने एकमताने स्वतंत्र संचालक जेफ्री मार्क ओव्हरली यांची कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलंय की, या दोन्ही नियुक्त्या प्रमोटर कंपनीच्या मतांशिवायसुद्धा सहज मंजूर झाल्या असत्या, कारण प्रिया सचदेव यांच्या नियुक्तीला ९८.९% तर जेफ्री ओव्हरली यांच्या नियुक्तीला ९९.४% भागधारकांनी पाठिंबा दिला होता. या आकडेवारीवरून गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास स्पष्टपणे दिसून येतो. दरम्यान, कपूर कुटुंबाच्या कौटुंबिक वादावर कंपनीनं आपली बाजू मांडली. “राणी कपूर यांचा २०१२ पासून कंपनीमध्ये कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. तसेच त्या कंपनीच्या भागधारक, संचालक किंवा अधिकारी नाहीत, त्यामुळे त्यांना कंपनीच्या कोणत्याही बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असं कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

कंपनीनं फेटाळले सर्व आरोप
कंपनीनं स्पष्ट केलं की, राणी कपूर यांच्यावर कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव आणला गेला नाही. कंपनीच्या कामांसाठी त्यांच्या संमतीची कोणतीही गरज नव्हती. त्यांनी संचालकीय मंडळावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहेत. “सोना कॉमस्टार ही एक सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी आहे. कंपनीचे सुमारे ७१.९८% शेअर्स संस्थात्मक आणि गुंतवणूकदारांकडे आहेत. प्रमोटर कंपनीकडे फक्त २८.०२% हिस्सा आहे आणि त्यांना कोणतेही विशेष अधिकार किंवा नियंत्रण नाही. त्यांचा कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात किंवा धोरणात्मक निर्णयात कोणताही सहभाग नाही, त्यामुळे कंपनी ही कौटुंबिक व्यवसाय असल्याचा आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे,” असंही निवेदनात सांगण्यात आलं.
हेही वाचा : अमेरिकेचा भारताविरोधी डाव, पाकिस्तानशी वाढवली जवळीक; पण शेवट निराशेतच होणार?
सोना कॉमस्टार कोणत्या क्षेत्रात कार्यरत?
सोना बीएलडब्ल्यू प्रिसीजन फोर्जिंग्स लिमिटेड (सोना कॉमस्टार) ही जगातील आघाडीची मोबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनी मानली जाते. १९९५ मध्ये सुरिंदर कपूर यांनी या कंपनीची स्थापना केली असून तिचे मुख्यालय हरियाणाच्या गुरुग्राममध्ये आहे. सोना कॉमस्टार ही जगातील अनेक देशांमध्ये आपला व्यवसाय चालवते. कंपनीचे उत्पादन आणि असेंब्ली युनिट्स, तसेच संशोधन आणि विकास केंद्रे- भारत, अमेरिका, सर्बिया, मेक्सिको आणि चीनमध्ये आहेत. कंपनी मुख्यत्वे ऑटोमोबाईल उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचे तसेच उच्च दर्जाचे इंजिनिअरिंग केलेले सुटे भाग आणि सिस्टिम्स डिझाइन, उत्पादन आणि पुरवठा करते. जगभरातील वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या ग्राहकांमध्ये आहेत.
सोना कॉमस्टारची आर्थिक स्थिती
झपाट्याने वाढणाऱ्या जागतिक इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत ड्राइव्हलाइन आणि ट्रॅक्शन मोटर सोल्यूशन्स पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये सोना कॉमस्टारचा समावेश होतो. २०२४-२५ या वर्षात कंपनीने तीन हजार २३२ कोटींचा महसूल आणि ५८० कोटींचा नफा कमावला आहे. २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कंपनीचे बाजार भांडवल २७ हजार ८७७ कोटी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीच्या शेअरची किंमत ५४५ वरून कमी होऊन सुमारे ४५० पर्यंत आली आहे. दरम्यान, संजय कपूर यांच्या निधनानंतर सोना कॉमस्टारची मालकी नेमकी कुणाकडे जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.