स्टँडअप कॉमेडीयन आणि वाद हे समीकरण आपल्यासाठी तसं नवीन नाही. गेल्या ७-८ वर्षात भारतात स्टँडअप कॉमेडीचं कल्चर हे चांगलंच रुजलं आहे. खासकरून मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली अशा मोठ्या शहरात आपल्याला हे ओपन माइक शो बघायला मिळतात. या सगळ्या स्पर्धेतून बरीच लोकं पुढे आली. अतुल खत्री, जीवेशू अहलूवालिया, अभिषेक उपमन्यु, झाकीर खान, रोहन जोशी, बिसवाकल्याण, वरुण ग्रोवर, मूनव्वर फारूकि, अशा काही लोकांची सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा असते. त्यापैकी आणखी एक नाव म्हणजे कुणाल कामरा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कायम चर्चेत असं म्हणण्यापेक्षा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कॉमेडीयन कुणाल कामरा सध्या पुन्हा एका वादात अडकला आहे. १७ आणि १८ सप्टेंबरचे गुरुग्राम इथले त्याचे कार्यक्रम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यामुळे रद्द झाले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अजित यादव म्हणाले की, “अगोदरच कुणाम कामरा याच्या विरोधात बऱ्याच तक्रारी दाखल आहेत. आणि हा कार्यक्रम जर रद्द झाला नाही तर आम्ही याविरोधात जोरदार निदर्शनं करू.” यावर नुकतंच कुणालने विश्व हिंदू परिषदेला उद्देशून एक खुलं पत्रंदेखील लिहिलं ज्याची प्रचंड चर्चा झाली. त्या पत्रात कुणालने त्याच्या खास खरमरीत शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे. पण अशा प्रकारच्या वादात फसण्याची कुणाल कामराची ही काही पहिली वेळ नाही, याआधीतो बऱ्याचदा त्याच्या विनोदबुद्धीमुळे किंवा वादग्रस्त विधानांमुळे वादात अडकला आहे. त्याचाच आढावा आपण घेऊयात.

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’वर सडकून टीका करणाऱ्या कंगना रणौतच्या वक्तव्यावर कॉमेडीयन कुणाल कामराची प्रतिक्रिया

अर्णब गोस्वामीचा व्हायरल व्हिडिओ :

एका विमानप्रवासादरम्यान कुणालने अर्णब गोस्वामीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याने अर्णबवर चुकीच्या भाषेत टीका केली. शिवाय तो राष्ट्रवादी आहे की भित्रा आहे? असा प्रश्नही त्याला सतत विचारला. अर्णबने या व्हिडिओमध्ये काहीही उत्तर दिलं नाही. अर्थात तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनाही कुणालचं वागणं खटकलं.

इतकंच नाही तर सिव्हिल एविएशन मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांनी कुणालच्या या वर्तणूकीची निंदा केली आणि यामुळे विमानातले वातावरण कलुषित झाल्याचंही स्पष्ट केलं. या घटनेनंतर इंडिगो आणि इतर काही एयरलाइन कंपन्यांनी कुणाल कामरा याच्यावर काही काळासाठी प्रवास करण्यावर बंदीदेखील घातली होती.

लहान मुलाच्या देशभक्तीवर विनोद :

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी जेव्हा जर्मनीच्या दौऱ्यावर गेले तेव्हा बर्लिन येथे त्यांचा आणि एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो लहान मुलगा पंतप्रधान मोदी यांच्यासमोर एक देशभक्तीपर गीत गात होता. त्या व्हिडिओला एडिट करून कुणालने एक वेगळाच सरकारच्या महागाईच्या मुद्द्यावर बेतलेला व्हिडिओ म्हणून सोशल मीडियावर शेअर केला.

नंतर त्याच्याविरोधात कारवाई झाली आणि लोकांनी त्याच्या या मानसिकतेवर चांगलीच टीका केली. इतकंच नाही तर त्या व्हिडिओमधल्या लहान मुलाच्या वडिलांनीसुद्धा यावर भाष्य केलं. “त्या निरागस मुलाला तुमच्या गचाळ राजकारणापासून लांब ठेव. माझ्या ७ वर्षाच्या मुलाला आपल्या मातृभूमीसाठी ते गीत गावंसं वाटलं म्हणून त्याने ते सादर केलं. एवढ्या कमी वयातही तुमच्यापेक्षा जास्त देशप्रेम त्या मुलामध्ये आहे.” असं म्हणत त्यांनी कुणाल कामराला सुनावलं होतं. लहान मुलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मोठ्या संस्था तसेच दिल्ली पोलिस यांच्या सहयोगाने कुणालवर कारवाई झाली आणि ते ट्वीट डिलिट करायला त्याला भाग पाडलं.

आणखी वाचा : विश्लेषण : बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘ब्रह्मास्त्र’ हिट की फ्लॉप? जाणून घ्या व्हायरल ट्रेंडमागची ‘ही’ कारणं

याबरोबरच न्यायव्यवस्था, जातीव्यवस्था यावरही कुणाल कामराने अशी बरीच वक्तव्यं केली आहेत ज्यावर अजूनही कोर्टाची कारवाई सुरू आहे. एकूणच कुणाल कामरा हे नाव त्याच्या उत्कृष्ट विनोदासाठी नव्हे तर त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यं आणि कृतीसाठी जास्त चर्चेत आहे. यावेळेसही त्याचे कार्यक्रम रद्द झाल्याने त्याने हा राग व्यक्त केला आहे. आपले विचार मांडायचं स्वातंत्र्य या देशात प्रत्येकाला आहे, पण ते विचार कोणत्या भाषेत आणि कोणत्या पद्धतीने मांडतोय हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे हे यावरून लक्षात येतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand up comedian kunal kamra infamous for his viral controversial tweets and statements avn
First published on: 13-09-2022 at 15:43 IST