आपलं पोट भरलेलं असलं तरीही गोड खाण्याची इच्छा होते का? तर अशावेळी आपलं पोट भरलं आहे हे सांगणाऱ्या चेतापेशीच गोडाची आवड निर्माण करतात असं एका अभ्यासात आढळलं आहे. तुम्ही नुकतंच एक चविष्ट जेवण जेवला आहात. तुमच्या पोटात आणखी काही खायला जराही जागा नाहीये, पण तुम्हाला आणखी भूक लागली ती केवळ गोडासाठी. मेंदूमध्ये जी केमिकल गडबड होते त्याचं परिवर्तन होतं ते ‘डेझर्ट स्टमक’मध्ये. कसं ते जाणून घेऊ…

जास्तीत जास्त कॅलरीज
‘डेझर्ट स्टमक’ हे अन्नाबाबत मानवाची उत्क्रांती पुढे रेटण्यासारखं आहे असं केंब्रिज विद्यापीठाचे अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. गिल्स येओ यांनी सांगितले आहे. येओ यांनी अन्नसेवन, अनुवंशिकता आणि लठ्ठपणा यावर संशोधन केले आहे. तुमचं पोट भरलेलं असतानाही प्रत्येक जेवणात तुम्ही आणखी कॅलरीज वाढवण्यासाठी (गोड पदार्थाचा वापर न करता) योग्य प्रकारचा आहार घेण्याची खात्री करणं आवश्यक आहे.
मनुष्याच्या उत्क्रांतीदरम्यान, बऱ्याचदा लोकांना एकदा जेवल्यानंतर पुढचं जेवण कधी मिळेल याबाबत शंका असायची. अन्नधान्याच्या शेतीमध्येही स्थैर्य येण्याआधी कोणालाही याची खात्री नव्हती. याच कारणामुळे किंबहुना आपली जडणघडणच अशाप्रकारे झालेली आहे की कॅलरीज जास्त असलेलं अन्न आपण मोठ्या प्रमाणात घेतो असं डॉ. येओ यांनी सांगितलं आहे. भारतात अन्नग्रहणाबाबत ही शैली प्रामुख्याने दिसून येते. पूर्वी शारीरिक मेहनत आताच्या तुलनेने जास्त होत, शिवाय दुष्काळासारख्या भयानक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी अशाप्रकारेच लोकांची शैली घडत असे.

उंदरांचा मेंदू काय सांगतो?
१२ फेब्रवारीला प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात गोड खाण्याची इच्छा होणाऱ्या जैविक यंत्रणेबाबत (बायोलॉजिकल मेकॅनिजम) सांगितलं आहे. संशोधकांनी उंदरांच्या एका गटाला त्यांचं पोट भरेपर्यंत जेवण दिलं. त्यानंतर त्यांनी उंदरांना साखर दिली. उंदरांनी ती खाल्ली आणि तृप्त झाल्यानंतरही ते खातच होते. या परिस्थितीत संशोधकांनी त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला.
यावेळी त्यांना असे आढळले की, POMC म्हणजे प्रो-ओपिओमेलानोकॉर्टिन नावाचे न्यूरॉन उंदरांच्या हायपोथॅलमस आणि मेंदूच्या पेशींमध्ये असल्याचे दिसून आले. उंदरांना साखरेचा अॅक्सेस मिळाल्यावर हे न्यूरॉन अॅक्टिव्हेट झाल्याचे आढळले. हे न्यूरॉन आपल्या अन्न सेवनाचे नियमन करण्याचे काम करतात. बहुतांश प्रकरणांमध्ये जेव्हा ते सक्रिय होतात तेव्हा ते अल्फा-मेलानोसाइट हे केमिकल रिलीज करतात, ज्यामुळे तृप्ततेची भावना निर्माण होते. पण वर उदाहरण दिल्याप्रमाणे साखरेचे सेवन केल्याने हे न्यूरॉन अॅक्टिव्हेट होत नाहीत. त्याऐवजी भूक उत्तेजित करणारे बिटा-एंडॉर्फिन हे केमिकल ट्रिगर होते असे अभ्यासात म्हटले आहे.

बिटा-एंडॉर्फिन हे शरीराच्या स्वत:च्या ओपिएट्सपैकी एक आहे. ओपिएट्स म्हणजे असे ड्रग्ज जे कोणताही त्रास कमी करण्यासाठी दिले जातात, ते प्रामुख्याने मध्यवर्ती मज्जासंस्था आणि जठरांत्र मार्गाच्या पेशी रिसेप्टर्सशी बांधले जाते. कोणतेही ओपिएट्स हे वेदना रोखणे, शांतता किंवा उत्साह निर्माण करते आणि शारीरिक सहनशीलतेशी संबंधित असते. ओपिएट्सचा दीर्घकाळ वापर केल्याने व्यसन लागू शकते. हे केमिकल तुम्हाला बेफिकिरीची भावना देते म्हणजेच कसलाही विचार न करता काहीही खाण्याची इच्छा झाल्यास लोकं ते खाऊन मोकळे होतात. कदाचित त्यामुळे तुम्ही साखरेचं सेवन किती करताय यावर तुमचं नियंत्रण राहत नाही.

हा ओपिएट्सचा मार्ग तेव्हाच अॅक्टिव्हेट होतो जेव्हा त्या उंदरांनी अतिरिक्त साखर ग्रहण केलेली असते, मात्र इतर अन्न किंवा फॅटी पदार्थ खाल्ल्याने नाही. जेव्हा संशोधकांनी हा मार्ग बंद केला तेव्हा उंदरांनी साखर खाणंच बंद केलं.

हीच पद्धत माणसांमध्येही आहे. संशोधकांनी काही माणसांच्याही मेंदूचा अभ्यास केला ज्यांनी साखरेचे सेवन केले होते.
तृप्ततेसाठी कारणीभूत असलेल्या पेशी साखर खाण्याची इच्छा झाल्याचा सिग्नल मेंदूला देतात आणि प्रामुख्याने ते तृप्ततेच्या बाबतच असे करतात. यावरून प्राणी किंवा मनुष्य पोट भरलेलं असतानाही जास्त साखरेचे पदार्थ का खातात हे स्पष्ट होतं असे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मेटाबॉलिझम रिसर्चचे हेनिंग फेन्सेलॉ यांनी सांगितले.

यावर फेन्सेलॉ यांनी पुढे असेही सांगितले की उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर साखर दुर्मिळ असली तरी जलद ऊर्जा पुरवणारी आहे. जेव्हा पण साखर किंवा कोणतेही गोड पदार्थ आपल्याकडे उपलब्ध असतात तेव्हा त्याचे सेवन नियंत्रित करण्यासाठी मेंदू आधीच तसा घडलेला असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डेझर्ट स्टमक’ समजून घेतल्यास त्याच्यावर उपाय म्हणून अधिक चांगले पर्याय शोधून काढता येतील असं संशोधकांचं म्हणणं आहे. आज वेट लॉस करण्यासाठी बहुतांश भूक कमी करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. अशावेळी संशोधकांना कदाचित मेंदूतील ओपिएट-रिसेप्टर्स यांच्यावर काम करून औषधांचा पुनर्विचार करणं गरजेचं वाटत आहे. फेन्सेलॉ यांच्या म्हणण्यानुसार, ओपिएट-रिसेप्टर्स यांच्यावर नियंत्रण मिळवणं हे भूक कमी करण्यापेक्षा जास्त प्रभावी असू शकतं. किंवा या दोन्ही केमिकल्सची सांगड घालून वजन कमी करण्यावर एक उत्तम पर्याय शोधला जाऊ शकतो.