रिलायन्स फाउंडेशनतर्फे संचालित ‘वनतारा’ या वन्यप्राणी आणि बचाव केंद्रात येणाऱ्या प्राण्यांच्या चौकशीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत केले. हे पथक ‘वनतारा’ मध्ये भारतातून तसेच परदेशातून प्राणी आणताना वन्यजीव संरक्षण कायदा तसेच आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे योग्य पालन झाले किंवा नाही याची चौकशी करणार आहे. १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत एसआयटीला त्यांचा अहवाल सादर करायचा आहे. प्राणी कल्याण कायदा, वन्यप्राणी आयात-निर्यात कायदा, वन्यजीव तस्करी, पाणी आणि कार्बन क्रेडीट दुरुपयोग अशा बाबींचा तपास करणार आहे.

एसआयटीमध्ये कोणकोण?

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली उत्तराखंड व तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, कस्टम अधिकारी अनिश गुप्ता या समितीत आहे. मात्र, वन्यप्राणी कायदेतज्ज्ञ, वन्यप्राणी तज्ज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, वनखात्यात सेवा बजावलेला अधिकारी अशा कुणाचाही या पथकात समावेश नाही. ‘वनतारा’त वन्यप्राणी कसे आणले जातात, नियम कसे तुडवले जातात हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे ही समिती कशापद्धतीने तपास करणार, निष्पक्ष चौकशी करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

कोल्हापुरात काय घडले..?

कोल्हापूरमधील एका मंदिरातून महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’ येथे आणण्यात आले, त्यानंतर ‘वनतारा’मध्ये आणण्यात येणाऱ्या वन्यप्राण्यांवर उघडपणे बोलण्यास सुरुवात झाली. जुलैच्या मध्यावर ‘पेटा’ या संस्थेने महादेवी हत्तीणीच्या आरोग्याबाबत तक्रार केली. त्यानंतर न्यायालयाने या हत्तीणीला ‘वनतारा’ येथे हलवण्याचे निर्देश दिले. मात्र, या निर्णयाला कोल्हापुरातूनच नाही तर संपूर्ण राज्यातून प्रचंड विरोध झाला. यात ‘पेटा’ची भूमिका संशयास्पद ठरली. पण त्याचवेळी ‘वनतारा’च्या निर्देशावरूनच ‘पेटा’ने हे पाऊल उचलल्याचा आरोप झाला. प्रसारमाध्यमांसह समाजमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले. त्यामुळे अधिवक्ता सीआर जया सुकिन आणि देव शर्मा यांनी जनहित याचिका दाखल केल्या. त्यांनी ‘वनतारा’ येथे कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला.

गडचिरोली ‘हत्ती अपहरणा’ची चौकशी होईल?

२०२२ मध्ये ‘वनतारा’ या वन्यप्राणी बचाव व पुनर्वसन केंद्रासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील ‘पातानील’ हत्ती कॅम्पमधील जगदीश, जयलक्ष्मी व विजय हे तीन हत्ती नेण्यात आले. गावकऱ्यांचा विरोध होऊ नये म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास ही कार्यवाही करण्यात आली. वनखात्याच्या परवानगीशिवाय ती होऊच शकत नव्हती. खात्याच्या समन्वयाने ‘वनतारा’साठी या तीन हत्तींचे अपहरण करण्यात आल्याची टिकाही त्यावेळी झाली. कारण हे हत्ती नेताना नेहमीप्रमाणेच नियम आणि कायद्याला बगल देण्यात आली. हे हत्ती ‘वनतारा’ला नेण्यासंदर्भात न्यायालयाचाही कोणता आदेश नव्हता. तसेच ‘पेटा’ सारख्या संस्थेनेही तक्रार केली नव्हती. मात्र, पातानील कॅम्पमध्ये हत्ती सुरक्षित आणि त्यांची व्यवस्थित देखभाल होत असताना ऐन मध्यरात्री या हत्तींची ‘वनतारा’साठी रवानगी करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरसारखा लढा या परिसरातील नागरिकांना उभारता आला नाही. पातानिलच्या ‘हत्ती अपहरणा’ची एसआयटीमार्फत चौकशी होणार का, आमचे हत्ती आम्हाला परत देणार का, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कमलापूरच्या ‘हत्ती कॅम्प’वर अजूनही डोळा?

कमलापूर येथील हत्ती कॅम्पवर त्यापूर्वी अशीच वेळ आली होती. तेव्हा ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली आणि ‘वनतारा’च्या मनसुुब्यांवर पाणी फेरले गेले. कमलापूरचे गावकरीच नाही तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी याला कडाडून विरोध केला. अजूनही या परिसरातील नागरिक आपले हत्ती ‘वनतारा’त जाऊ नयेत यासाठी सजग आहेत. मात्र, कमलापूरचा प्रयोग सुरू होण्यापूर्वीच फसल्याने पातानिल हत्ती कॅम्पमधील हत्ती नेण्यात आले. कमलापूरच्या या हत्ती कॅम्पकडे आधीही वनखात्याचे दुर्लक्ष होते आणि आताही आहे. सध्या या ठिकाणी नऊ हत्ती आहेत, ज्यात नागझिरा येथून आणलेल्या ९० वर्षांहून अधिक वय असलेल्या ‘रुपा’ या हत्तीणीचा समावेश आहे. वनखात्याचे आर्थिक आणि मानसिक पाठबळ नसतानाही माहूत आणि चाराकटर त्यांच्या बळावर या हत्तींचे अतिशय व्यवस्थित संगोपन करत आहेत. काही वर्षांपूर्वी याठिकाणी नक्षलवाद्यांचा हल्ला झाला होता, त्यानंतरही ते डगमगले नाहीत. त्यामुळेच राज्यभरातून पर्यटन कमलापूरच्या या हत्ती कॅम्पला भेट देण्यासाठी येतात.

‘वनतारा’त प्राण्यांच्या स्रोताचे गूढ कायम?

वनतारा’ या वन्यप्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या स्रोतांवर वन्यजीव तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताच्या विविध भागातून या पुनर्वसन व बचाव केंद्रात प्राणी आणले आहेत. भारताबाहेरूनदेखील वन्यप्राणी दाखल होतात. त्यामुळे हे सर्वच वन्यप्राणी कायदेशिररित्या वाचवले गेले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आसाम राज्यातून २१ हत्तींना पशुरुग्णवाहिकेतून या केंद्रात हलवण्यात आले. तर महाराष्ट्रातील पातानिल हत्ती कॅम्प, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून काही हत्ती या ठिकाणी पाठवण्यात आले. महाराष्ट्रातील गोरेवाडा बचाव केंद्रातून १५ वाघ ‘वनतारा’त स्थलांतरित करण्यात आले. तर अजून काही वाघांची मागणी पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने बिबटे पाठवले होते. विदेशातूनही या ठिकाणी प्राणी आणले गेले. मात्र, प्राण्यांचे स्थलांतरण करताना केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून परवानगी तसेच वन्यप्राण्यांची वाहतूक करताना ‘वाहतूक परवाना’ घ्यावा लागतो. गुजरातमधील जामनगरच्या या केंद्रात प्राणी स्थलांतरित करताना प्राधिकरणाकडून परवानगी व वाहतूक परवाना घेतला होता का, असा प्रश्न वन्यजीव तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे हे प्राणीसंग्रहालय नाही तर वन्यप्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र आहे. तरीही याठिकाणी प्राणी आणताना कायदे आणि नियमांची पायमल्ली होत आहे.

rakhi.chavhan@expressindia.com