सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात सूरजागड टेकडीवर गेल्या दीड वर्षापासून लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. ही खाण सुरू करताना स्थानिक आदिवासींनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, प्रशासनाच्या मदतीने कंपनीने विरोध दडपून उत्खनन सुरू केले. या मार्गावरून खनिजाची वाहतूक करणारी हजारो अवजड वाहने धावतात. यामुळे ५० किलोमीटरपर्यंतचा भाग धूळ, खराब रस्ते, वाहतूककोंडी, अपघात आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. आठवडाभरात या भागात झालेल्या अपघातांत शिक्षकासह १२ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. यामुळे लोहखाणीविरोधात पुन्हा एकदा असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

खाणीची सद्य:स्थिती काय आहे?

मागील दीड वर्षांपासून सूरजागड टेकडीवर उत्खनन सुरू आहे. सुरुवातीला ३० लाख टन उत्खननाची परवानगी होती. आता ती वाढवून १ कोटी टन इतकी करण्यात आली आहे. लोह प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्याने खनिजाची बाहेर विक्री करण्यात येत आहे. नक्षल्यांची दहशत आणि स्थानिक आदिवासींचा विरोध यामुळे ‘लॉयड मेटल्स’ कंपनीला कंत्राट मिळाल्यानंतर उत्खननासाठी तब्बल दोन दशके वाट पाहावी लागली होती. आता उत्खनन सुरळीत सुरू असले तरी कंपनी आणि स्थानिक यांच्यात थेट संवाद नसल्याने अधूनमधून विरोधाचा भडका उडत असतो.

प्रशासनाची भूमिका काय?

नक्षलग्रस्त आणि उद्योगविरहित जिल्हा असल्याने या भागाचा विकास झाला नाही. मात्र, खाणीमुळे विकास होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. त्यामुळे कंपनीला विविध परवानग्या देताना नियम वाकवल्याचे आरोप झाले होते. अजूनही कंपनीला जिल्हा प्रशासन झुकते माप देत असल्याची ओरड स्थानिकांमधून होत असते. तर खाणीमुळे रोजगार मिळाला, जिल्ह्याला शेकडो कोटींचा महसूल प्राप्त झाल्याचे सांगून अधिकारी वेळ मारून नेत असले तरी विकास केवळ नेत्यांच्या भाषणात आणि कागदावर दिसत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रशासनाला नागरिकांच्या अडचणींपेक्षा कंपनीचे हित महत्त्वाचे वाटते काय, असा सवाल केला जात आहे.

विश्लेषण : जात प्रमाणपत्र काढताना कोणती काळजी घेतली जावी? त्यात होणाऱ्या चुका कशा टाळता येतील?

परिसराची अवस्था काय?

सूरजागड टेकडीवर उत्खनन सुरू करताना खाण म्हणजे विकास असे एकंदरीत चित्र उभे करण्यात आले होते. याच आधारावर स्थानिक आदिवासींचे म्हणणे ऐकून न घेता खाणीला परवानगी देण्यात आल्याचा आरोप होत असतो. परंतु दीड वर्षात हा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. सूरजागड ते आष्टी मार्गावरील रस्ते, शेती आणि गावांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. धुळीमुळे नागरिक हैराण आहे. लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते खराब झाले आहेत. कायम अपघात होत असतात. शेती उद्ध्वस्त झाली आहे. एकूण ५० किलोमीटरचा परिसर आज नरकयातना भोगत असल्याची भावना स्थनिक बोलून दाखवितात. अपघातामुळे नागरिकांचा हकनाक बळी जातोय.

नेत्यांची भूमिका काय?

मूळ समस्या खनिजांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे निर्माण होत आहे. त्यामुळे खाणीचे नियोजन करताना ही समस्या केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळतो. यावर सत्ताधाऱ्यांसह विविध पक्षांतील नेते बोटचेपी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. अपघात असो की धुळीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, यासाठी नेत्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. परिणामी या भागात कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.

नागरिकांचे म्हणणे काय?

खाणीमुळे विकास होणार, रोजगार मिळणार अशी आश्वासने देण्यात आली होती. त्याची या भागातील नागरिकांनाही भुरळ पडली होती. मात्र, दीड वर्षात त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. दररोज प्रवास करताना त्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अपघाताचा कायमच धोका असतो. गेल्या आठवड्याभरात झालेल्या दोन अपघातांत एक शिक्षक आणि १२ वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेला. तरीही प्रशासन कंपनीधार्जिणी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आपल्या घरातील सदस्य घराबाहेर पडला तर सहीसलामत परत येणार काय, याची चिंता नागरिकांना सतावते आहे. दुसरीकडे कंपनी या समस्येबाबत थेट नागरिकांशी संवाद न साधता गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मोठे आंदोलन उभारल्याशिवाय पर्याय नसल्याची भावना नागरिक बोलून दाखवीत आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे खाणीविरोधात येत्या काही दिवसांत असंतोषाचा भडका उडाला, तर आश्चर्य वाटायला नको.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surajagad iron mine in gadchiroli naxalite etapalli print exp pmw
First published on: 25-05-2023 at 09:35 IST