अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांच्या निर्यातीवरील कर लक्षणीयरीत्या कमी केले आहेत. चीनच्या व्यापार प्रतिनिधींनी स्वित्झर्लंड येथे झालेल्या चर्चेचा हा परिणाम आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर व ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी (१२ मे) पत्रकार परिषदेत घोषणा केली की, दोन्ही देशांनी ९० दिवसांच्या कर विरामावर सहमती दर्शविली आहे आणि ते करदेखील परस्पर कमी करतील. प्रत्यक्षात चीनवरील अमेरिकेचा कर आता ३० टक्के एवढा आहे. पूर्वी हा कर १४५ टक्के इतका होता. चीनचा अमेरिकेवरील कर आता १० टक्के इतका आहे, जो पूर्वी १२५ टक्के इतका होता. त्यामुळे अमेरिका आणि चीन अशा दोघांचेही चलन मजबूत झाले आहे.
दोन्ही देशांनी आर्थिक आणि व्यापारी संबंधांबद्दल चर्चा सुरू ठेवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यासही सहमती दर्शविली. चीनच्या वतीने जीनेव्हा येथे झालेल्या चर्चेचे नेतृत्व करणारे उपपंतप्रधान हे लिफेंग यांना भविष्यातील बैठकांमध्ये चीनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. हे लिफेंग यांनी अलीकडच्या काही महिन्यांत पश्चिमी व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधला आहे. ज्या नेत्यांना लिफेंग भेटले आहेत, त्यांनी त्यांच्याबद्दल असे चित्र उभे केले आहे की, आता जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापाराचा मार्ग निश्चित करण्यात एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून ते समोर येत आहेत.
हे लिफेंग कोण आहेत?
हे लिफेंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय आहेत. २०२४ मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये हे लिफेंग यांचे वर्णन ‘चिनी अर्थव्यवस्थेच्या चाव्या असलेल्यांपैकी एक’ असे करण्यात आले होते. जून १९८१ मध्ये ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षात सामील झाले होते. चीनमध्ये आग्नेय शहरातील झियामेनचे ते रहिवासी आहेत. त्यांनी सरकारी वित्त क्षेत्राचे शिक्षण घेण्यासह डॉक्टरेट पदवीही घेतली आहे. १९८० च्या दशकात जेव्हा या प्रदेशात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले जात होते, तेव्हा लिफेंग यांचा सरकार करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये थेट सहभाग होता. शी जिनपिंग यांच्याशी १९७०-८० च्या दशकात लिफेंग यांचा थेट परिचय झाला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लिफेंग यांना मिळाली. तेव्हा शी जिनपिंग झियामेनमध्ये नवनियुक्त उपमहापौरपदी होते. या दोघांमधील मैत्रीमुळे लिफेंग यांचे करिअर यशस्वीतेच्या मार्गावर वाटचाल करू लागलं. “२००८ मध्ये शी जिनपिंग चीनचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याकडे देशाचे पुढचे संभाव्य नेते म्हणून पाहिले जात होते. त्यांची बदली उत्तरेकडील तियानजिन शहरात करण्यात आली”, असे डब्ल्यूएसजेच्या एका अहवालात म्हटले आहे.
पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि चिनी अर्थव्यवस्था
२०१३ मध्ये चीनमधील सर्वोच्च पदावर काम करताना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतःला निष्ठावंतांनी वेढून घेतले आणि नंतर सत्ता बळकट करण्यासाठी काम सुरू केले. तेव्हा हे लिफेंग यांना त्यांच्या जवळच्या वर्तुळात स्थान देण्यात आले. त्यानंतर हे लिफेंग यांनी आर्थिक नियोजनात मोठ्या भूमिका पार पाडल्या. अर्थव्यवस्थेवर राज्य नियंत्रण राखण्याबाबतच्या शी जिनपिंग यांच्या जागतिक दृष्टिकोनाशी लिफेंग यांचे विचार जुळले. २०१७ ते २०२३ पर्यंत त्यांनी राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे नेतृत्व केले.
मार्च २०२३ मध्ये हे लिफेंग यांना चीनचे व्हाईस प्रीमियर म्हणून मान्यता देण्यात आली. या पदावरील अधिकारी थेट पंतप्रधानांच्या अंतर्गत काम करतात, जे चीनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली राजकीय पद आहे. हे लिफेंग हे सध्या पंतप्रधान ली कियांग यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या चार व्हाईस प्रीमियरपैकी एक आहेत.
पंतप्रधानांकडे अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही असते. चीनच्या पंतप्रधानांनी आणि उपपंतप्रधानांनी अनेकदा देशाच्या आर्थिक घडामोडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
माजी उपपंतप्रधान लिऊ हे हार्वर्डमध्ये शिक्षण घेतलेले शी जिनपिंग यांचे सल्लागार होते. “वॉशिंग्टनने वर्षानुवर्षे केलेल्या आर्थिक सुधारणांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला होता,” असे वृत्त फायनान्शियल टाइम्सने दिले आहे.
हे लिफेंग यांनी चिनी अर्थव्यवस्थेत अनेक मोठे बदल घडवून आणले आहेत. लिफेंग हे इंग्रजी न बोलणारे आणि कधीही परदेशात वास्तव्य न केलेले व्यक्ती आहेत. मात्र, विश्लेषकांचे म्हणणे आहे की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी असलेल्या जवळीकीने लिफेंग यांना एक महत्त्वाचा आवाज ठरविले आहे. अलीकडच्याच अहवालात, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, त्यांनी गेल्या वर्षभरात हे लिफेंग यांना भेटलेल्या १३ परदेशी गुंतवणूकदार आणि राजदूतांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आतापर्यंत लिफेंग हे गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष जॉन वॉल्ड्रॉन, फायझरचे अध्यक्ष अल्बर्ट बोर्ला, अॅपलचे प्रमुख टिम कुक व एनव्हीडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग यांना भेटले आहेत.