गेले कित्येक दिवस चर्चेत असलेल्या ‘टेस्ला’ची रोबोटॅक्सी गेल्या रविवारी अमेरिकेतील रस्त्यावर अवतरली. ‘टेस्ला’चे सीईओ इलॉन मस्क यांनी तशी घोषणा ‘एक्स’वर केली. ४.२० लाख डॉलर इतक्या थेट किमतीत ‘टेस्ला’ मॉडेल ‘वाय’ या चालकरहित रोबोटॅक्सीची पहिली सफर ऑस्टिनच्या काही भागांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी सकाळी टेक्सासच्या राजधानीतील गजबजलेल्या साऊथ काँग्रेस परिसरात ड्रायव्हर नसलेली रोबोटॅक्सीतील सैर अनेकांनी अनुभवली.

समाजमाध्यमांवरील अनेकांनी रोबोटॅक्सीच्या ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या. त्यावरची त्यांची टिप्पणी अशी होती, की सुरक्षा निरीक्षक म्हणून एक प्रवासी रोबोटॅक्सीतील मागील आसनावर बसलेला आहे.

रोबोटॅक्सीची अधिकृत घोषणा का नाही?

रोबोटॅक्सी तयार करणाऱ्या कंपनीने मात्र यावर कोणतेही विधान प्रसारित केले नसून ‘रोबोटॅक्सी’च्या भवितव्याबाबतचा तपशील पुरवलेला नाही. मात्र, ऑस्टिनच्या भूसीमित क्षेत्रात १० ते २० वाहनांचे परिचालन प्रायोगिक तत्त्वावर घडवून आणले. ही किमया अगदी जवळून अनुभवण्यासाठी प्रभावकांच्या एका छोट्याशा गटाला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते.

स्वयंचलित वाहनांसाठी कायदा का?

अशा स्वयंचलित वाहनांसाठी नियम काय असावेत यासाठी टेक्सास कायदेमंडळाने तयारी सुरू केली आहे. स्वयंचलित वाहनांसाठी राज्याची परवानगी मिळविण्यासाठीच्या नव्या विधेयकावर टेक्सास गव्हर्नर ग्रेग ॲबट यांनी स्वाक्षरी केल्याच्या काही दिवसांनंतर रोबोटॅक्सीचे परिचालन पार पडले. कायदेविषयक प्रक्रियेनंतर १ सप्टेंबरपर्यंत हा कायदा अमलात येणार नसला तरी स्वयंचलित अर्थात चालकरहित वाहनांबाबत नियमनासाठी हस्तक्षेपात तितकीशी उत्सुकता न दाखवणाऱ्या टेक्सासने आपल्या पहिल्या धोरणात बदलाचे संकेत दिले आहेत. स्वयंचलित वाहनांच्या सुरक्षेबाबत ‘टेस्ला’ या सारख्या कंपन्यांनी कठोर उपाययोजना करणे या कायद्यानुसार बंधनकारक असेल. त्यात पोलीस व प्रथम प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींसाठी आपत्कालीन प्रतिसाद काय असतील आणि चौथ्या स्तरावरील (लेवल फोर ऑटोनॉमस) स्वयंचलित मानके निश्चित करण्यात आली आहेत. याचा अर्थ मानवी हस्तक्षेपाशिवाय विशिष्ट स्थितीत वाहन स्वत:हून रस्त्यावर धावू शकेल.

रोबोटॅक्सीला रडार का नाही?

रडारशिवाय पूर्णत: कॅमेऱ्यांवरील अवलंबन निश्चित करून ‘टेस्ला’ने वाहन उद्योगातील निकषांना हरताळ फासल्याचे वृत्त आहे. सुरक्षा जोखीम व मागील विलंब या दोन्ही पातळीवर टीकाकारांनी चिंता व्यक्त केल्यानंतही इलॉन मस्क यांनी कंपनीच्या साऱ्या कृतीचे समर्थन वारंवार केले होते. याउलट कॅमेऱ्यांवर आधारित ‘टेस्ला’ची यंत्रणा सुरक्षा व अधिकाधिक व्याप्ती पुरेशी असल्याचा इलॉन मस्क यांचा पूर्वीपासूनचा हेका होता.

रोबोटॅक्सी वेगळी कशी?

गेली कित्येक वर्षे मस्क स्वयंचलित कारबाबत बोलत आले आहेत आणि आता त्यांनी ऑस्टिनमध्ये रोबोटॅक्सी रस्त्यावर आणताना सुरक्षेच्या मुद्द्याला कंपनी सर्वोच्च प्राधान्य देईल, असे स्पष्ट केले. या कार प्रतिकूल वातावरण, ओबडधोबड रस्त्यांवरून अगदी निर्धोकपणे क्रमण करतील. शिवाय ज्या भूभागातील प्रत्येक कानाकोपरा सुरक्षित आहे, अशा रस्त्यांवर अल्पवयीन मुलेही या स्वयंचलित कारमध्ये बसतील, असेही मस्क म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेस्लासमोरची वाट खडतर का?

कंपनीच्या भविष्यकालीन योजनांसाठी टेस्लाची रोबोटॅक्सी हे मोठे पाऊल आहे. विश्लेषकांच्या मते, मानवयंत्र अर्थात रोबोप्रमाणेच रोबोटॅक्सीचे व्यावसायिकीकरण आणि कृत्रिम प्रज्ञेचा वापर कंपनी कशा प्रकारे करू शकेल, यावर ‘टेस्ला’च्या दीर्घकालीन योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. तरीही ‘टेस्ला’समोरची वाट तितकीशी सोपी नाही. जीएमच्या मालकीच्या ‘क्रूझ’ या ‘टेस्ला’ची प्रतिस्पर्धी कंपनीने नुकत्याच घडलेल्या अपघातानंतर कारचे परिचालन रद्द केले. अल्फोबेटच्या ‘वेमो’ व ॲमेझॉनच्या ‘झूक्स’ या कारचे प्रायोगिक तत्त्वावरील परिचालन काटेकोर नियमनांतर्गत करण्यात आले.     त्याच वेळी टेस्लाच्या वेगळ्या दृष्टिकोनाचा विचार करता केवळ कॅमेऱ्यांवरील अवलंबित्व टेस्लाचे स्पर्धेतील वेगळेपण दर्शवणारे आहे. किंबहुना ‘टेस्ला’ने स्वत:चे सुरक्षा निकष आणि विश्वासार्हता निश्चित केली आहे.