ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते जोडणी, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, बाळकुम-गायमुख खाडी किनारी मार्ग, मेट्रो प्रकल्प, अंतर्गत मेट्रो प्रकल्प यासह विविध प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. यापैकी अनेक प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. काही प्रकल्पांची कामे येत्या काही महिन्यात सुरू होणार आहेत. या पायाभूत सुविधांंमुळे ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलत असतानाच ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर वृद्धी केंद्र (ग्रोथ सेंटर) उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ठाणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये कळवा परिसरात विकास केंद्रासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखेच हे महत्त्वाकांक्षी ग्रोथ सेंटर असेल.

कळव्यासारखी ग्रोंथ सेंटर इतत्रही

या वृद्धी केंद्रामुळे ठाणेकरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ठाणे-नवी मुंबईच्या वेशीवरील हे एकमेव नियोजित विकास केंद्र नाही. कल्याण, भिवंडी, खारबाव, ठाणे, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये राज्य सरकारने लहान-मोठी विकास केंद्रे उभारण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे हे विकासाचे मोठे केंद्र ठरेल अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : थेट विदेशी गुंतवणुकीचे उच्चांकी शिखर; जगाला भारताचे आकर्षण कशामुळे?

ठाण्याची बदलती औद्योगिक ओळख…

एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून वागळे इस्टेटटचा परिसर ओळखला जायचा. या भागात अनेक कारखाने होते. या कारखान्यांमध्ये अनेक नागरिक काम करीत होते. येथील अनेक कामगारांनी कारखान्याच्या परिसरातच उभ्या राहात असलेल्या बेकायदा चाळी आणि इमारतींमध्ये घरे घेतली. कालांतराने काही कारखाने बंद पडले. तर काही कारखाने स्थलांतरित झाले. यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोस‌ळली. बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर आयटी पार्क आणि गृहप्रकल्प उभे राहात आहेत. कामगार वास्तव्यास असलेल्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेऊन या भागात समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येत आहे. यातून सुनियोजित शहराचा विकास केला जाणार आहे. या योजनेमुळे वागळे इस्टेट भागाचे रहिवास क्षेत्रात रूपांतर होत असल्याने या भागाची औद्योगिक वसाहत ही ओळख बदलत आहे.

वृद्धी केंद्राची उभारणी का?

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नगरीकरण झाले आहे. घोडबंदर भागात मोठ-मोठ्या नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. वाढत्या नगरीकरणाबरोबरच शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय, अवजड वाहनांची वाहतूक शहरातूनच होते. या वाहतूकीमुळे शहरात कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिका यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये रस्ते रुंदीकरण, रस्ते जोडणी, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, बाळकुम-गायमुख खाडी किनारी मार्ग, मेट्रो प्रकल्प, अंतर्गत मेट्रो प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी अनेक प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे तर, काही प्रकल्पांची कामे येत्या काही महिन्यात सुरू होणार आहेत. या पायाभूत सुविधांंमुळे ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलत असतानाच, आता या पायाभूत सुविधांच्या मदतीने शहरात रोजगाराची संधी उपलब्ध देण्यासाठी पालिकेने कळव्यात वृद्धी केंद्र (ग्रोथ सेंटर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : ८६० वर्षे जुने कॅथेड्रल… ५ वर्षे दुरुस्ती… पॅरिसमधील ‘नोत्र दाम’ पुन्हा सुरू होणे का महत्त्वाचे?

ठाण्यातील ग्रोथ सेंटर कुठे?

ठाणे शहराला मोठा खाडीकिनारा लाभला आहे. ही खाडी शहराला दोन भागांत विभागते. पश्चिम भागात वागळे इस्टेट, जुने ठाणे, पाचपाखाडी, कोपरी आणि घोडबंदर असे १ ते ६ सेक्टर येतात. तर, पूर्वेकडील भागात कळवा, मुंब्रा, दिवा असे ८ ते ११ सेक्टर येतात. यातील ८ सेक्टर हे कळवा परिसरात येते. या शहरात सर्व दिशांना चांगली प्रवेशयोग्यता आहे. सेक्टर ८ चे काही भाग पूर्वी औद्योगिक विकासाखाली होते, जे आता प्रामुख्याने निवासी क्षेत्र म्हणून विकसित केले गेले आहे. सेक्टर ८ मधील ग्रोथ सेंटरची प्रस्तावित जागा नवी मुंबई ओद्योगिक क्षेत्राशी जोडलेली आहे. येथील ठाणे-बेलापूर रोड पट्ट्यात मोठे औद्योगिक क्षेत्र असून हा रस्ता पुढे कळवा परिसराला जोडण्यात आलेला आहे. ठाण्याचे वृद्धी केंद्र नवी मुंबई शहराच्या औद्योगिक पट्ट्याला जोडण्यासाठी कळव्यातील जागेची निवड पालिकेने केली आहे. ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर हे वृद्धी केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी ठाणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये कळवा परिसरात जागा आरक्षित केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृद्धी केंद्रातून रोजगाराची संधी कशी?

मुंबई महानगरातील शहरे आणि त्यांच्या वेशीवर असलेल्या ग्रामीण भागात समतोल विकास साधणे, महानगर क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे, अर्थव्यवस्था उत्तेजन देणे आणि उत्पादन वाढवणे, या उद्देशातून मुंबई महानगर परिसरात विकास केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. महानगर क्षेत्रातील शहरांच्या वेशीवर असलेल्या ग्रामीण भागात वृद्धी केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आता ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या वेशीवर नवे वृद्धी केंद्र उभारले जाणार आहे. कळवा परिसरातील वृद्धी केंद्रासाठी आरक्षित केलेली जागा नवी मुंबई ओद्योगिक क्षेत्राशी जोडलेली आहे. येथील ठाणे-बेलापूर रोड पट्ट्यात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या मोठ्या आस्थापनांसाठी नवी मुंबई हे योग्य स्थान म्हणून मानले जाऊ शकते. यातूनच याठिकाणी सेमीकंडक्टर सारखा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. मुंबईशी थेट जोडलेल्या किंवा अपरिहार्यपणे जोडलेले आणि लहान खाजगी कार्यालये, बँका, अर्धघाऊक बाजार आणि इतर संबंधित व्यावसायिकांना मुंबईतील विकास केंद्रांमध्ये स्थान मिळणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठाण्यात कळवा गावामध्ये वृद्धी केंद्र विकसित करण्यात येणार आहे. कळवा गावातील जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. सरकारच्या मालकीची आणि दळणवळणासाठी योग्य अशी ही मोकळी जमीन आहे. सरकारी सेवांचा विकास करून, सार्वजनिक प्रशासन आणि व्यावसायिकरित्या जमिनीचा वापर करून हे वृद्धी केंद्र संपूर्ण प्रदेशासाठी मूल्यवर्धित ठरेल.