गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की एका ‘किलर व्हेल’ किंवा ऑर्का जातीच्या माशाने (हिंस्र डॉल्फिन मासा) लाइव्ह शो दरम्यान प्रशिक्षक जेसिका रॅडक्लिफला मारले. हा व्हिडिओ पाहताक्षणी काळजाचा थरकाप उडतो. पण नंतर जेव्हा आपल्याला असे कळते ही अशी घटना कधी घडलीच नाही, तेव्हा मात्र संताप होतो. एआय-जनरेटेड प्रतिमा आणि आवाजांचा वापर करून ही घटना तयार करून लाखो लोकांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
व्हिडिओत नेमके काय होते?
ऑर्का किंवा किलर व्हेल हा डॉल्फीन प्रजातीतील सर्वांत मोठा मासा. नावात व्हेल असले, तरी हा मासा अत्यंत निष्णात आणि हुशार शिकारी मासा आहे. मरिन पार्कमध्ये असलेले हे मासे प्रशिक्षित असले तरी ते कधी हिंसक होणारच नाहीत, याची खात्री कोणी देऊ शकत नाही. म्हणूनच या व्हिडिओवर कोणाचाही सहज विश्वास बसू शकतो. हा व्हिडिओ केलाच अशा पद्धतीने होता, की कोणालाही खरा वाटावा. पॅसिफिक ब्लू मरिन पार्कमध्ये ही घटना घडली असा दावा केला होता. माशाचा खेळ बघण्यासाठी खूप लोक जमलेले या व्हिडिओत दिसत होते. जेसिका रॅडक्लिफ नावाची महिला ऑर्का माशावर नाच करत होती. हा मासा पाण्यातून बाहेर येताच लोकांनी जल्लोषात टाळ्या वाजवल्या, पण अचानक मासा हिंसक झाला आणि त्याने जेसिकावर हल्ला केला. आनंदाचे चित्कार भीतीदायक किंकाळ्यांमध्ये परिवर्तित झाले. हा व्हिडिओ काही मिनिटांमध्ये टिकटॉक, फेसबुक आणि अन्य समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला.
व्हिडिओ बनावट?
प्रत्यक्षात तज्ज्ञांनी तपासणी केली तेव्हा भलतेच आढळले. तपासकर्त्यांचा असा दावा आहे की ट्रेनरच्या नावापासून ते मरीन पार्कपर्यंतची संपूर्ण कथाच बनावट होती. अशी कोणतीही जेसिका नाही, ना कोणते पॅसिफिक ब्लू मरिन पार्क अस्तित्वात आहे. एआय-जनरेटेड प्रतिमा आणि आवाजांचा वापर करून ही घटना लोकांसमोर उभी करण्यात आली. पण एआय निर्मित आवाज ओळखू येतात, हालचालींमध्ये सातत्य नसते. मुळात अशी घटना घडल्याच्या वृत्ताला कोणत्याही अधिकृत यंत्रणेने दुजोरा दिला नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
आणखी एक असाच व्हिडिओ?
अशाच पद्धतीने मरिना लिसारो नावाच्या प्रशिक्षक महिलेचा ऑर्काच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. हाही बनावटच होता.
बनावट व्हिडिओ का बनवले जातात?
तज्ज्ञांच्या मते, अशा एआय-निर्मित बनावट पण क्रूर कथा लवकर पसरतात, याचे एक कारण म्हणजे त्या लोकांच्या खऱ्या भीतीवर आधारलेल्या असतात. ऑर्का मासे हे अत्यंत बुद्धिमान, ताकदवान आणि समुद्रातील सर्वोच्च शिकारी आहेत, आणि याआधी मरिन पार्कमध्ये त्यांच्यामुळे अनेक प्राणघातक घटना वास्तवात घडल्या आहेत. जेव्हा कल्पित गोष्टींमध्ये काही प्रमाणात सत्य मिसळले जाते, तेव्हा लोक त्यावर जास्त विश्वास ठेवतात. जेसिका रॅडक्लिफविषयीची व्हायरल अफवा बनावट असली, तरीही असे बंदिस्त जागेत असलेल्या ऑर्कांचा धोका हा खरा आहे.
ऑर्कांच्या हिंसेच्या खऱ्या घटना कोणत्या?
सर्वात प्रसिद्ध उदाहरणांपैकी एक म्हणजे टिलिकम नावाच्या एका महाकाय नर ऑर्काने तीन लोकांचा बळी घेतला होता. १९९१ साली, सीलॅंड ऑफ द पॅसिफिक येथे प्रशिक्षक केल्टी बर्न टिलिकम असलेल्या टाकीत पडली आणि बुडून मेली. टिलिकम तिला पुन्हापुन्हा पाण्याखाली खेचत होता, तर इतर ऑर्कांनी तिला वाचवण्याचे प्रयत्न रोखले. डॅनियल ड्युक्सचा मृतदेह १९९९ साली टिलिकमच्या पाठीवर सापडला. तपासकर्त्यांच्या मते, तो रात्रीच्या वेळी टाकीत शिरला असावा.
सर्वात चर्चेत आलेली घटना २०१० मध्ये घडली. ऑर्लॅंडो येथील सीवर्ल्ड शोदरम्यान टिलिकमने अत्यंत अनुभवी प्रशिक्षक डॉन ब्रॅन्शो हिला ठार मारले. टिलिकमने तिला पाण्याखाली खेचून ठेवले होते.
बनावट व्हिडिओ बनवण्याची प्रमुख कारणे काय?
– राजकीय फायद्यासाठी, समाजात गोंधळ निर्माण करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती/गटाची प्रतिमा खराब करण्यासाठी गैरसमज पसरविणे किंवा खोटा प्रचार करणे.
-व्ह्यूज, फॉलोअर्स किंवा जाहिरातींच्या उत्पन्नासाठी सनसनाटी व्हिडिओ तयार करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे.
-आर्थिक फायद्यासाठी किंवा व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी खोट्या पुराव्यांचा वापर करणे.
एआय-निर्मित बनावट ओळखावी कशी?
चेहऱ्याच्या हालचाली आणि भाव बारकाईने तपासले की व्हिडीओ बनावट असल्याचे कळते. एआय निर्मित व्हिडिओतील व्यक्तींच्या डोळ्यांची हालचाल नैसर्गिक नसते. पापण्यांची उघडझाप नीट होत नाही. ओठांच्या हालचाली आणि बोलण्याचा आवाज नीट जुळत नाही. चेहऱ्यावर किंवा वस्तूंवर सावल्या अनैसर्गिक दिसतात. ऑडिओ आणि व्हिडिओमध्ये विलंब किंवा सिंक्रोनायझेशनचा अभाव असतो.
लोक तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यासाठी किंवा कलात्मक निर्मितीसाठीही अशा व्हिडिओंचा वापर करतात.पण चुकीच्या वापरामुळे त्याचे परिणाम नकारात्मक आणि भयंकर होऊ शकतात.