पाकिस्तानात गेल्या काही दिवसांमध्ये सिंह आणि त्यांच्या मालकांची धरपकड हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यातूनच त्या देशाच्या वन्य प्राण्यांविषयीच्या धोरणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. वाघ-सिंह पाळण्यासाठी विशेष परवाना आवश्यक असतो. त्यांच्यासाठी पुरेशा आकाराचा पिंजरा असणे अनिवार्य आहे, तसेच मानक कार्यप्रणालीचे पालन करावे लागते.
पाकिस्तानात वाघ-सिंहांची धरपकड का?
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये ७ जुलैला एक धक्कादायक घटना घडली. तेथील एका फार्महाऊसवर पाळलेला सिंह निसटला आणि त्याने एका महिला व तिच्या वय वर्षे पाच आणि सात असलेल्या दोन मुलांवर हल्ला केला. त्यामध्ये हे तिघेही जखमी झाले. सुदैवाने यात कोणाचाही जीव गेला नाही. यानंतर सिंहाच्या मालकाला अटक करण्यात आली. माझी पत्नी व मुलांवर सिंहाकडून हल्ला होत असताना त्याचा मालक केवळ बघत होता आणि त्याने त्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही असा आरोप जखमी महिलेच्या पतीने केला. या हल्ल्यानंतर सिंह त्याच्या मालकाच्या फार्महाऊसकडे परत गेला. तिथून त्याला सफारी पार्कमध्ये पाठवण्यात आले. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी पाळीव वाघ-सिंह आणि त्यांच्या मालकांविरोधात कारवाई सुरू केली.पाकिस्तानात गेल्या काही दिवसांमध्ये सिंह आणि त्यांच्या मालकांची धरपकड हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यातूनच त्या देशाच्या वन्य प्राण्यांविषयीच्या धोरणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. वाघ-सिंह पाळण्यासाठी विशेष परवाना आवश्यक असतो. त्यांच्यासाठी पुरेशा आकाराचा पिंजरा असणे अनिवार्य आहे, तसेच मानक कार्यप्रणालीचे पालन करावे लागते.
पाकिस्तानात लोकशाही असली तरी सरंजामशाहीचा अंमल पुरता पुसला गेलेला नाही. वाघ-सिंहांसारखे क्रूर पाणी पाळणे, त्यांना माणसाळवणे ही बाब अजूनही प्रतिष्ठेची मानली जाते. आपल्या संपत्ती आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी अनेक जण हा मार्ग अवलंबतात. विशेषतः समाजमाध्यमांच्या लोकप्रियतेनंतर गेल्या दशकभरात प्रसिद्धी मिळवण्याचा एक मार्ग म्हणूनही अनेकजण वाघ-सिंहांबरोबरची छायाचित्रे प्रसिद्ध करत असतात. ३० वर्षीय कैम अली यांनीही सिंह पाळला होता. पण त्या सिंहाने त्यांच्या भाच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी तो विकून टाकला. समाजातील ताकद आणि प्रभाव दाखवून देण्यासाठी अनेक जण वाघ-सिंह पाळत असल्याचे अली मान्य करतात. वन्यप्राणी संवर्धक म्हणून काम करणारे बद्र मुनीर यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली की, जगात कुठेही राहत्या घरांमध्ये धोकादायक प्राणी ठेवले जात नाहीत. पण पाकिस्तानात प्रतिष्ठेच्या विचित्र कल्पना आहेत. लोक त्यांना आपल्या वाहनांमधून फिरवतात, टिकटॉक व्हिडिओ काढतात आणि एखादा प्राणी त्यांच्या ताब्यातून निसटल्यानंतर मात्र घाबरून जाण्याशिवाय त्यांना दुसरे काही करता येत नाही.
राजकीय प्रतीकांसाठीही वापर
पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीगच्या (नवाज गट) चिन्हामध्ये वाघाचा वापर करण्यात आला आहे. तसा प्राण्यांचा राजकीय चिन्हांसाठी वापर आपल्या देशात नवा नाही. पण पाकिस्तानात सारेच न्यारे. तिथे ‘पीएमएलएन’ पक्षाचे समर्थक आपल्या नेत्याच्या प्रति असलेली निष्ठा दाखवण्यासाठीही वाघ पाळत असल्याचे दिसून आले आहे.
हल्ल्यानंतरची धरपकड
सिंहाने महिला आणि तिच्या दोन मुलांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये वन्य प्राण्यांचा शोध घेतला गेला. त्यामध्ये मुख्यतः कोणत्याही अधिकृत परवान्याविना पाळलेल्या वन्य प्राण्यांना ताब्यात घेऊन सफारी पार्कमध्ये सोडण्याची कारवाई करण्यात आली. याअंतर्गत एकट्या पंजाबमधून १८ पाळीव सिंह ताब्यात घेण्यात आले. या सिंहांना पाळण्याची त्यांच्या मालकांकडे कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले. त्याशिवाय वन्यजीव आणि उद्याने विभागाने वाघ आणि सिंहांच्या ३८ प्रजनन केंद्रांवर छापे टाकले आणि नियमांचे पालन न केल्याबद्दल आठ जणांना अटक केली. पंजाबमध्ये अशा प्रकारची ५८४ केंद्रे असल्याची माहिती वन्यजीव आणि उद्याने विभागाचे महासंचालक मुबीन इलाही यांनी ‘रॉयटर्स’ला दिली.
वन्य प्राणी पाळण्याचे नियम
मुबीन इलाही यांनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमांनुसार, वाघ-सिंह पाळण्यासाठी विशेष परवाना आवश्यक असतो. त्यांच्यासाठी पुरेशा आकाराचा पिंजरा असणे अनिवार्य आहे, तसेच मानक कार्यप्रणालीचे पालन करावे लागते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दोन लाख पाकिस्तानी रुपये इतका दंड आणि सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. पाकिस्तानातील पंजाबमध्ये वाघ-सिंहांची नोंदवलेली संख्या ५८७ असली तरी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बेकायदा वन्य प्राणी पाळण्याच्या प्रकारांमुळे प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी अधिक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाळीव वन्य प्राण्यांची हेळसांड
अमेरिकेतील ‘युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर ॲनिमल लॉ स्टडीज’च्या सहाय्यक प्राध्यापिक हिरा जलाल यांनी पाकिस्तानातील प्राण्यांशी संबंधित कायदेशीर समस्यांवर काम केले आहे. त्या सांगतात की, त्यांच्या काही मित्रमंडळींना आपापले वाघ-सिंह पाळीव कुत्र्याप्रमाणे फिरवायला आणि मिरवायला आवडते. अनेकदा या प्राण्यांना वाहनाच्या मागील आसनांवर बसवले जाते आणि त्यांना रस्त्यांवरून फिरवून आणले जाते. त्याच वेळी या प्राण्यांना चांगल्या अवस्थेत ठेवले जात नाही असेही निरीक्षण त्या नोंदवतात. विशेषतः त्यांना घरांच्या अंगणामध्ये ठेवले जाते. त्यांची नखे काढलेली असतात, काही वेळा त्यांना अफूसारखी गुंगीची औषधे दिली जातात आणि छायाचित्रे काढण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. आता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्यानंतर या परिस्थितीत काही प्रमाणात तरी फरक पडेल अशी तेथील वन्य प्राणीप्रेमींना आशा वाटत आहे.
nima.patil@expressindia.com