Jim Corbett Champawat tigress story: माणूस हा या भूतलावरचा सर्वाधिक क्रूर प्राणी आहे, असं म्हटलं जातं. अलबत त्याला धारधार नख नाहीत किंवा तीक्ष्ण सुळेही नाहीत. पण म्हणून तो वार करत नाही असं नाही. आपल्या स्वार्थासाठी हा प्राणी कुठल्याही थरापर्यंत जावू शकतो, हे नक्की आणि त्याचेच परिणाम ज्यावेळी भोगावे लागतात त्यावेळी मात्र सहजच समोरच्यावर दोषारोप करून मोकळा होतो. आपल्या चुकांमधून बोध घेणारे फारच थोडे असतात. हेच सांगणारा एक प्रसंग सुमारे १०० वर्षापूर्वी घडला होता…

शंभर वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी भयाचे सावट पसरले होते. गावं ओस पडली होती, शेतं रिकामी झाली होती आणि दोन देशांवर दहशतीचं सावट गडद झालं होतं. या भीतीच्या केंद्रस्थानी होती एकच होती ती म्हणजे बंगालची एक वाघीण. ती चंपावत वाघीण म्हणून प्रसिद्ध होती. ४३६ जणांचे प्राण घेणारी ही नरभक्षक वाघीण भारताच्या वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवणारी ठरली.

जंगलात अनेक वाघ, मग एकच वाघीण नरभक्षक कशी झाली?

ही भयावह कहाणी १८९० च्या दशकात नेपाळच्या जंगलांत सुरू झाली. या जंगलातील प्राण्यांच्या अधिवासाचा नाश झाल्यामुळे शिकार मिळेनाशी झाली होती. शिकार कमी झाल्याने त्या वाघिणीला उपासमारीचा सामना करावा लागत होता. त्यातच एका शिकाऱ्याने झाडलेल्या गोळीमुळे तिचा जबडा मोडला. त्यामुळे ती वन्य प्राण्यांची शिकार करू शकत नव्हती. परिणामी, जगण्यासाठी हतबल झालेल्या त्या वाघिणीने संथ आणि असुरक्षित शिकार म्हणून माणसांना निवडलं.

सुरुवातीचे हल्ले विखुरलेले आणि दुर्लक्षित होते. पण बळींची संख्या वाढू लागली तसतशी दहशत पसरली. भारतात प्रवेश करेपर्यंत तिने सुमारे २०० जणांचा बळी घेतला होता. बहुतेक वाघ माणसांपासून दूर राहतात, पण ही वाघीण दिवसाढवळ्या हल्ले करत असे आणि मानवी वस्त्यांच्या अगदी जवळ हिंडत असे. भीती इतकी वाढली की, शेतं ओस पडली, व्यापारी मार्ग बंद झाले आणि संपूर्ण प्रदेश दहशतीच्या सावटाखाली आला.

सैन्यसुद्धा तिच्या तांडवाला आळा घालण्यात का अपयशी ठरलं?

चंपावत वाघिणीला पकडण्यासाठी किंवा ठार करण्यासाठीचे प्रयत्न अधिकाधिक हतबलतेने सुरू झाले. बक्षिसं जाहीर झाली, शिकारी दूरदूरहून आले, पण काहीच उपयोग झाला नाही. नेपाळच्या सैन्याच्या एका तुकडीने तिला सीमेजवळ पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, सीमेजवळ अडकल्यावर शारदा नदीत उडी मारून पोहत तिने भारताची सीमा गाठली.

भारतामध्ये आल्यावर तिचे हल्ले अधिक वाढले, ती आणखी चतुरीने हल्ले करू लागली. ती एका हल्ल्यानंतर सुमारे २० मैलांपर्यंत फिरत असे आणि प्रामुख्याने जंगलात लाकूड किंवा झाडपाला गोळा करणाऱ्या स्त्रिया आणि मुलांवर हल्ला करत असे. गावकरी सतत भीतीच्या सावटाखाली जगत होते आणि अधिकारी तिच्या पुढील हालचालीचा अंदाज लावण्यात पूर्णपणे असमर्थ ठरत होते. फाटलेले कपडे आणि पडलेली हाडं हेच तिच्या मार्गक्रमणाचे पुरावे होते.

चंपावत वाघिणीच्या दहशतीचा शेवट कोणी केला?

१९०७ पर्यंत परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, ब्रिटीश प्रशासनाने कुमाऊँ पर्वतरांगांतील कुशल शिकारी जिम कॉर्बेट यांच्याकडे मदत मागितली. नरभक्षक वाघांच्या मागावर जाण्यात कॉर्बेट पारंगत होते. त्यांच्या मोहिमेला सुरुवात झाली तेव्हा वाघिणीने चंपावतजवळ १६ वर्षांच्या मुलीचा बळी घेतला होता. कॉर्बेट यांनी रक्ताच्या ठशांचा मागोवा घेतला आणि जवळपास ३०० गावकऱ्यांनी मानवी भिंत तयार करून त्यांना मदत केली. वाघीण दिसताच ती प्रचंड वेगाने झेपावली. कॉर्बेट यांनी गोळी झाडली. यात ती जखमी झाली, पण थांबली नाही. गोळ्या संपत आल्यावर कॉर्बेट यांनी एका गावकऱ्याची बंदूक घेतली आणि फक्त २० फूट अंतरावरून झाडलेल्या अखेरच्या गोळीने त्या भयावह नरभक्षक वाघिणीचा अंत केला.

हेही वाचा
India vs Pakistan:”हिंदू हे धूर्त,अविश्वासू आणि भित्रे,” म्हणणार्‍या पाकिस्तानला १९६५ साली कशी घडली अद्दल?, ७ महत्त्वाचे मुद्दे

तिच्या मृतदेहाच्या तपासणीत तिचे दात, विशेषतः वरची दाढ आणि सुळे पूर्णपणे तुटलेले होते असं लक्षात आलं. हीच जखम तिच्या नरभक्षक होण्याचं मुख्य कारण होती. या शोधाने जिम कॉर्बेट यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला. नरभक्षक प्राणी मुळात जन्मतः असे नसतात… ते मानवी हस्तक्षेप, अधिवासाचा नाश आणि जखमांमुळे असे होतात, याची प्रखर जाणीव त्यांना झाली. हळूहळू कॉर्बेट यांचं लक्ष वाघ मारण्यापेक्षा त्यांचं आणि त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करण्याकडे वळलं. त्यांनी जंगलतोड, मानवी अतिक्रमण आणि प्रजातींचं नष्ट होणं या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला.

चंपावत वाघिणीचा वारसा काय सांगतो?

तिच्या मृत्यूने ही कहाणी संपली नाही. उलट, ती भारतातील संवर्धन चळवळीची सुरुवात ठरली. जिम कॉर्बेट पुढे जाऊन भारतातील पहिले वन्यजीव संवर्धक ठरले. त्यांच्या वाघ आणि जंगलांचं रक्षण करण्याच्या प्रयत्नांतून १९३६ साली भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान स्थापन झालं. पुढे त्याचं नाव ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’ असं ठेवलं गेलं.

सौजन्य : विकिपीडिया
सौजन्य : विकिपीडिया

चंपावत वाघिणीचा वारसा आपल्याला निसर्गातील संतुलन किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देतो. या कथेतून मानवी कृती आणि हस्तक्षेपामुळे प्राणी-मानव संघर्ष कसे प्राणघातक रूप घेतो ते समजतं. रक्त, भीती आणि जगण्यासाठीच्या झुंजीतून जन्मलेली ही कहाणी निसर्गासोबतच सहअस्तित्व आणि संवर्धनच मानवजातीच्या टिकण्याचा खरा मार्ग आहे; हाच संदेश परोपरीनं देतं.