देशातील सर्वात मोठे बंदर पालघरमधील वाढवण येथे उभारण्यात येत आहे. सध्या या बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे या बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच बंदराला आसपासच्या गावांशी जोडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) वरोर, वाढवण ते तवा असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाच्या बांधकामासाठी गेल्या आठवड्यात एनएचएआयकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच महामार्गाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वाढवण बंदराला तवा येथून केवळ ३० मिनिटांत पोहोचता येणार आहे. तेव्हा हा महामार्ग नेमका आहे कसा आणि त्याचा फायदा कसा होणार याचा हा आढावा…
देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणमध्ये?
महाराष्ट्रात जेएनपीए आणि मुंबई अशी दोन मोठी बंदरे आहेत. या बंदरांवर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होते. या दोन्ही बंदरांची क्षमता आता संपत चालली आहे. अशा वेळी नवीन बंदराची उभारणी करणे गरजेचे झाले आहे. मुंबई बंदराच्या विकासासाठी पुरेशी जागाच नाही. तर जेएनपीए बंदराचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे नवीन बंदर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदर उभारले जाणार आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यास ते जगातील पाचव्या क्रमांकाचे तर देशातील पहिले सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. अंदाजे ७६ हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. २०२९ पर्यंत वाढवण बंदराचा पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. तेव्हा वाढवण बंदरापर्यंत बांधकाम साहित्य, कच्चा माल नेण्यासाठी सेवारस्ता तातडीने बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढवण बंदराला जोडणाऱ्या सेवारस्त्यासह वरोर, वाढवण ते तवा द्रुतगती महामार्गाच्या कामाला शक्य तितक्या लवकरच सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
वरोर, वाढवण ते तवा महामार्गाची गरज का?
वाढवण बंदर ज्या ठिकाणी वसवले जात आहे, तिथे जाण्यासाठी सध्या स्वतंत्र, थेट रस्ता नाही. त्यामुळे वरोर, वाढवण ते तवा असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेत याची जबाबदारी एनएचएआयकडे देण्यात आली. आजच्या घडीला वाढवण बंदराच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तवा येथून पालघर आणि मग वरोरवरून जावे लागते. यासाठी किमान दीड तास लागतो. तर दुसरीकडे वाढवण बंदराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. यासाठी बांधकाम साहित्य, वाहने, यंत्रसामग्री नेण्यासाठी आणि कामगार, मजूर, अधिकाऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्त्याची गरज आहे. त्यामुळे वरोर,वाढवण ते तवा द्रुतगती महामार्गातच काही किलोमीटरचा कायमस्वरूपी सेवारस्ताही बांधला जाणार आहे. या सेवारस्त्यावरून बांधकाम साहित्य, यंत्रसमाग्री आणली जाणार आहे. तर काम पूण झाल्यानंतर हा सेवारस्ता स्थानिकांना वापरता येणार आहे. तर या सेवारस्त्याला जोडून वरोर, वाढवण ते तवा असा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार असून पुढे हा महामार्ग थेट समृद्धी महामार्गावरील भरवीरपर्यंत नेला जाणार आहे. तवा ते भरवीर अशा द्रुतगती महामार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) केले जाणार आहे.
प्रकल्प नेमका आहे कसा?
वरोर, वाढवण ते तवा द्रुतगती महामार्ग ३२.१८० किमी लांबीचा असून आठपदरी असा हा महामार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३५०० कोटी रुपये (बांधकाम आणि भूसंपादन) इतका खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग पालघरमधील २४ गावांमधून जाणार असून महामार्गासाठी या गावांमधील सुमारे ६०० हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. त्यानुसार एनएचएआयकडून सध्या भूसंपादनाच्यादृष्टीने संयुक्त मोजणी सुरू असून २४ पैकी २२ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित मोजणी येत्या काही दिवसात पूर्ण करत भूसंपादनास वेग देत ९० टक्के जागा संपादित करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. तर दुसरीकडे या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठीच गेल्या आठवड्यात या महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२५७५.०८ कोटी रुपयांची निविदा?
एनएचएआयकडून गेल्या आठवड्यात या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५७५.०८ कोटी रुपयांची ही निविदा असून चार पदरी सेवा रस्ता आणि आठपदरी द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. ३ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबरदरम्यान इच्छुक कंपन्यांना या कामासाठी निविदा सादर करता येणार आहेत.
वरोर, वाढवण ते तवा प्रवास ३० मिनिटांत?
महामार्गाचे कंत्राट बहाल करत कार्यादेश जारी केल्यानंतर महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. २०२६ मध्ये कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. काम सुरू झाल्यापासून अडीच वर्षांचा कालावधी कामाच्या पुर्णत्वासाठी देण्यात आला आहे. तर सेवारस्ता काम सुरु झाल्यापासून एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार २०२९ मध्ये वरोर,वाढवण ते तवा द्रुतगती महामार्ग सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास वरोर, वाढवण बंदर ते तवा प्रवास केवळ ३० मिनिटांत शक्य होणार आहे. अशा या महामार्गावरून २०५० पर्यंत दिवसाला दोन लाख ३६ हजार वाहने धावतील असा दावा एनएचएआयकडून करण्यात आला आहे.