Decline in alcohol use मद्यपान करणे ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक आवड आणि निवड असली तरी मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु, लोकांमधील मद्यपानाचे प्रमाणात वाढत आहे, हेही तितकेच खरे. अमेरिकेत मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अमेरिकेत प्रौढांमधील मद्यपानाचे प्रमाण आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी पातळीवर आले आहे. अमेरिकेतील प्रौढांपैकी केवळ ५४ टक्के लोकांनी दारूचे सेवन करीत असल्याचे सांगितले आहे. हे गॅलपच्या जवळपास ९० वर्षांच्या सर्वेक्षणातील सर्वांत कमी प्रमाण आहे. त्याचबरोबर मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे मानणाऱ्या अमेरिकन लोकांची संख्या वाढत आहे. त्यामागील नेमकी कारणे काय? अमेरिकेत नक्की काय घडतंय? जाणून घेऊयात…

गॅलपच्या सर्वेक्षणातून नक्की काय समोर आले?

  • गॅलपने १९३९ पासून अमेरिकन लोकांच्या मद्यपानाच्या सवयी आणि २००१ पासून मद्यपानाच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल सर्वेक्षण केले आहे आणि लोकांचे मत जाणून घेतले आहे.
  • गॅलपने ७ ते २१ जुलैदरम्यान केलेल्या वार्षिक सर्वेक्षणातून ही ताजी आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात ५४ टक्के लोकांनी मद्यपान करीत असल्याचे सांगितले.
  • १९९७ ते २०२३ या काळात किमान ६० टक्के अमेरिकन लोकांनी मद्यपान करीत असल्याचे सांगितले होते. ही संख्या २०२३ मध्ये ६२ टक्के, २०२४ मध्ये ५८ टक्के आणि आता ५४ टक्क्यांपर्यंत कमी झाली.
  • मागील काही वर्षांत अमेरिकन लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपानात सलग घट नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गॅलपच्या सर्वेक्षणात यापूर्वी अशी घट नोंदवण्यात आलेली नव्हती.
गॅलपने १९३९ पासून अमेरिकन लोकांच्या मद्यपानाच्या सवयी आणि २००१ पासून मद्यपानाच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल सर्वेक्षण केले आहे आणि लोकांचे मत जाणून घेतले आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

२०२३ मध्ये ६२ टक्के लोकांनी आपण मद्यपान करीत असल्याचे सांगितले होते. मद्यपानातील घट पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त झाली असल्याचे नोंदवण्यात आले आहे. तसेच, श्वेतवर्णीय प्रौढांमध्येही मद्यपानात ११ टक्क्यांची घट झाली आहे; तर इतर वंशाच्या लोकांमध्ये हे प्रमाण ५० टक्के असल्याचे नोंदवण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वीच अमेरिकेतील तरुणांनी मद्यपान करणे कमी केले होते; पण हा कल आणखी वाढला असून, त्यांचे प्रमाण २०२३ मध्ये ५९ टक्क्यांवरून आज ५० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे त्यांचा मद्यपानाचा दर प्रौढांपेक्षा कमी झाला आहे. अलीकडील काही दशकांत राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये मद्यपान करणाऱ्यांच्या प्रमाणात फारसा फरक नव्हता; परंतु मागील दोन वर्षांत यात बदल झाला आहे. रिपब्लिकनमध्ये मद्यपानाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. रिपब्लिकन मद्यपान करणार्‍यांचे प्रमाण ४६ टक्के आहे; तर डेमोक्रॅटमध्ये हे प्रमाण ६१ टक्के आहे.

बहुसंख्य लोकांना मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक का वाटते?

गॅलपच्या सर्वेक्षणात बहुसंख्य (५३ टक्के) अमेरिकन लोकांनी असे म्हटले आहे की, मध्यम प्रमाणात मद्यपान किंवा दिवसातून एक किंवा दोन पेग घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. केवळ सहा टक्के लोक हे प्रमाण आरोग्यासाठी चांगले मानतात. मध्यम मद्यपान हानिकारक आहे, असे २०१८ मध्ये २८ टक्के, २०२३ मध्ये ३९ टक्के व एक वर्षापूर्वी ४५ टक्के लोकांचे सांगणे होते. मात्र, आता असे सांगणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दशकात तरुणांमधील मद्यपानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाच वयोगट मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे मानणारा सर्वांत मोठा गट ठरला आहे. २००१ मध्ये सुमारे ३० टक्के तरुण आणि मध्यमवयीन प्रौढांनी मध्यम मद्यपान हानिकारक मानले होते; तर २१ टक्के वृद्ध प्रौढांनीही यावर सहमती दर्शविली. मध्यम आणि वृद्ध प्रौढांमध्येही मद्यपान आरोग्यासाठी वाईट आहे, असा विश्वास मागील काही सर्वेक्षणांमध्ये वाढला आहे.

नागरिकांच्या सेवन पद्धतीत बदल

मद्यपान करणाऱ्या अमेरिकन लोकांमध्ये सेवनाच्या पद्धती बदलत आहेत. गेल्या २४ तासांत मद्यपान केले असल्याचे केवळ २४ टक्के लोक सांगतात; तर ४० टक्के लोक म्हणतात की, त्यांनी शेवटचे मद्यपान करून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. ज्या प्रौढांना असे वाटते की, मध्यम प्रमाणात मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, ते इतर सर्वांइतकेच मद्यपान करतात. आरोग्याशी संबंधित चिंता असलेल्यांपैकी केवळ अर्धे लोक म्हणतात की, त्यांनी गेल्या सात दिवसांत कमी प्रमाणात मद्यपान केले आहे.

अमेरिकेतली या बदलाचे कारण काय?

वैद्यकीय संशोधक मद्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा शोध घेत आहेत. अमेरिकन लोकांच्या मद्यपानाच्या सवयींमध्ये बदल होत आहेत. अमेरिकेतील मद्यपान करणाऱ्या प्रौढांच्या प्रमाणात अनेक दशकांपासून स्थिरता होती; पण आता गॅलपने अमेरिकेतील मद्यपानाच्या दरात मोठी घट नोंदवली आहे. दारू विकणाऱ्या कंपन्यांसाठी आणखी एक आव्हान असे आहे की, मोठ्या प्रमाणात मद्यपान करणारे लोकही आता त्यांचे मद्यपानाचे प्रमाण कमी करीत असल्याचे दिसत आहे.

मद्यपान करणे हानिकारक आहे हे सुरुवातीला तरुणांनी वृद्ध अमेरिकन नागरिकांपेक्षा आधी स्वीकारले होते. त्यावेळी मध्यम मद्यपान, विशेषतः वाइन हृदयासाठी आरोग्यदायी मानली जात होती. परंतु, आता कोणत्याही स्वरूपातील दारू हानिकारक आहे, हा विश्वास वृद्ध प्रौढांमध्येही वाढत आहे. मद्यपानाच्या धोक्यांबद्दल आता डॉक्टर्स आणि वैद्यकीय संशोधक काय सांगतात, यावर अमेरिकेत भविष्यातील मद्यपानाचा दर वाढेल की आणखी कमी होईल, हे ठरेल. १९६० च्या दशकात अमेरिकेच्या सर्जन जनरलने तंबाखूबाबत दिलेल्या इशाऱ्यांमुळे धूम्रपानात दीर्घकाळ घट सुरू झाली होती. अमेरिकेतील मद्यपानाचा दर डॉक्टर, आरोग्य अधिकारी आणि धोरणकर्ते मद्यपानाच्या कमी-जास्त मात्रेविषयी काय सांगतात, यावरही अवलंबून असेल.