Sleep internship काहीच काम न करता आपल्याला पैसे मिळाले तर? असा विचार एकदा तरी आपल्या मनात आलाच असेल. हे केवळ आपल्या कल्पनेपुरते मर्यादित असते. परंतु, असे प्रत्यक्षात घडू शकते असे सांगितल्यास कदाचितच यावर तुमचा विश्वास बसेल, पण हे खरं आहे. रोज नऊ तासांची झोप घेऊन पुण्यातील एका तरुणीने तब्बल नऊ लाख रुपये मिळवले आहेत. पुण्यातील यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या पूजा माधव वाव्हल या तरुणीने बेनागलुरु येथे ६० दिवसांच्या झोपेवर आधारित एका इंटर्नशिपमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तिला भारताची ‘स्लीप चॅम्पियन ऑफ द इयर’ घोषित करण्यात आले आहे. नेमका हा प्रकार काय? काय आहे स्लीप इंटर्नशिप? खरंच केवळ झोप घेऊन पैसे मिळवणे शक्य आहे का? त्याविषयी जाणून घेऊयात.
स्लीप इंटर्नशिप काय आहे?
- पूजा माधव वाव्हल या तरुणीने रात्री रोज नऊ तास झोप घेऊन ९.१ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले आहे.
- स्लीप इंटर्नशिपसाठी भारतातील तब्बल एक लाखांहून अधिक जणांनी अर्ज केले होते.
- त्यातील केवळ १५ अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. या १५ जणांमध्ये पूजा माधव वाव्हलने सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
- भारतात वाढत असलेल्या झोपेच्या कमतरतेच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम डिझाइन करण्यात आला आहे.
- या स्पर्धेतील सहभागींवर स्लीप ट्रॅकर्सद्वारे लक्ष ठेवले जाते. तसेच त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना वेकफिट कंपनीच्या गाद्या दिल्या जातात.

मुख्य म्हणजे या इंटर्नशिप अंतर्गत त्यांना झोपेविषयीच्या कार्यशाळा आणि विश्रांतीच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने मार्गदर्शनदेखील करण्यात आले. त्यातील सहभागी स्पर्धकांनी डोळे बांधून स्वतःचा बेड तयार करणे, अलार्म घड्याळ शोधणे यांसारख्या अनेक कार्यामध्येही सहभाग घेतला. वाव्हलने त्यात ९१.३६ गुण मिळवून सर्वोच्च पारितोषिक जिंकले. तसेच १५ इंटर्नमध्ये प्रत्येकाला इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल एक लाख रुपये देण्यात आले. झोपेचे निरीक्षण कंपनीकडून केले जाते. त्यात झोप ही गाढ स्वरूपाची असणे महत्त्वाचे असते. मुख्य म्हणजे कंपनीकडून त्यासाठी योग्य सुविधादेखील दिल्या जातात.
स्लीप इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय?
किमान वय : अर्ज करताना अर्जदारांचे वय २२ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
फक्त एकच प्रवेशिका : प्रति व्यक्ती फक्त एकच अर्ज स्वीकारला जाईल. एका नावावर अनेक प्रवेशिका असल्यास त्या अपात्र ठरवल्या जातील.
पूर्णपणे भरलेले अर्ज : अपूर्ण अर्ज अपात्र ठरवले जातील.
अंतिम मुदतीचे पालन : उशिरा सादर केलेले अर्ज नाकारले जातील.
माजी इंटर्न पात्र नाहीत : सीझन १, २ आणि ३ मधील सहभागी पुन्हा अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
वेकफिट कर्मचाऱ्यांवर निर्बंध : वेकफिटचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय त्यात सहभागी होऊ शकत नाहीत.
संवाद : सर्व अपडेट्स एसएमएस, ईमेल, व्हॉट्सअॅप किंवा फोन कॉलद्वारे शेअर केले जातील.
माहितीची अचूकता : कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरवले जातील.
संमती आवश्यक : अर्ज करून उमेदवार अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणाशी सहमत असणे आवश्यक आहे.
२०१९ पासून स्लीप इंटर्नशिपचे प्रमाण का वाढत आहेत?
इंटर्नशिपची पहिली फेरी २०१९ मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक फेरीत, या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येत लोकांनी अर्ज केले आहेत. दरवर्षी काही निवडक सहभागींना ‘स्लीप इंटर्न’ म्हटले जाते. त्यांना सलग ६० दिवस रात्रीच्या वेळी किमान नऊ तास झोपण्यासाठी पैसे दिले जातात. त्यात कॉन्टॅक्टलेस ट्रॅकर वापरून झोपेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे आवश्यक असते. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन ऑनलाइन फॉर्म, व्हिडीओ रिज्युम आणि संक्षिप्त मुलाखतींद्वारे केले जाते. त्यात लोकांना हास्यास्पद प्रश्नही विचारले जातात. जसे की, एखाद्याची लवकर झोप येण्याची क्षमता किती किंवा वर्गात झोपेचा इतिहास राहीला आहे का, याबद्दल विचारणा केली जाते.
स्लीप इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर मिळणारी बक्षिसे
प्रत्येक निवडलेल्या इंटर्नला ६० दिवसांचे चक्र पूर्ण करण्यासाठी एक लाख रुपये दिले जातात. सर्वात उच्च दर्जाची झोप असलेल्या आणि परीक्षेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या सहभागीला १० लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त रोख बक्षीस दिले जाते. या विजेत्यांना ‘स्लीप चॅम्पियन’देखील म्हटले जाते. इंटर्नशिप घरातून काम करूनदेखील केली जाऊ शकते. इंटर्नशिपमधील सहभागी नागरिकांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी वेकफिट स्वतःच्या गाद्या आणि स्लीप ट्रॅकर्स वापरतात. काम आणि जीवन यांच्यात संतुलन शोधणाऱ्यांसाठी तरुण भारतीयांमध्ये ही कल्पना खूप लोकप्रिय झाली आहे.
२०२५ च्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्डनुसार, ५८ टक्के भारतीय रात्री ११ नंतर झोपायला जातात आणि जवळजवळ अर्ध्या रात्रीतून त्यांना जागही येते.बंगळुरूमधील साईश्वरी पाटील नावाच्या एका तरुणीनेदेखील गेल्या वर्षी नऊ लाख रुपये जिंकले होते. साईश्वर ही एक बँकर होती आणि तिने वेकफिटच्या इंटर्नशिपमध्ये भाग घेतला होता.