अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर पहिल्याच दिवशी देशातील स्थलांतरित असलेल्यांवर निशाणा साधला. अवैधरित्या देशात येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर परत पाठवण्याकरिताही ट्रम्प यांनी अनेक निर्णय घेतले, ज्याचा परिणाम अमेरिकेत विविध देशांतून आलेल्या नागरिकांवर झाला. मात्र, आता एक नवीन माहिती समोर येत आहे. अमेरिकेत स्थलांतरितांना देशाचे नागरिकत्व देण्यासाठी लवकरच एक रिअॅलिटी टीव्ही शो सुरू करणार आहे. या आगळ्या-वेगळ्या विषयाची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे. परंतु, हा प्रकार नक्की काय आहे? खरंच एका रिअॅलिटी टीव्ही शोवरून लोकांना देशाचे नागरिकत्व मिळणार का? हा शो नेमका कशा स्वरूपाचा असेल? विजेत्यांना बक्षीस स्वरूपात काय मिळणार? त्याविषयी जाणून घेऊयात.
कसा असेल स्थलांतरितांसाठीचा हा रिअॅलिटी टीव्ही शो?
अमेरिकेत राहणारे अनेक नागरिक ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, आता अमेरिका लवकरच नागरिकत्वासाठीचा एक नवीन मार्ग प्रदान करू शकतो. अमेरिका एक असा रिअॅलिटी टीव्ही शो आणणार आहे, ज्याच्या मदतीने अमेरिकेतील स्थलांतरित नागरिकांना नागरिकत्व मिळू शकेल. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार होमलँड सिक्युरिटी विभाग एका टेलिव्हिजन मालिकेची तयारी करत आहे. यात नागरिकत्व मिळवण्यासाठी लोक स्पर्धा करतील. या शोचे तात्पुरते नाव ‘द अमेरिकन’ असल्याची माहिती आहे आणि शो अजूनही अगदी सुरुवातीच्या म्हणजेच तयारीच्या टप्प्यात आहे.
ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकारी याविषयी लेखक आणि दिग्दर्शकांशी चर्चा करत आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना सर्वात आधी लेखक आणि निर्माते रॉब वोर्सोफ यांनी मांडली होती, ते आता ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करून त्याला आणखी आकार देण्याच्या तयारीत आहेत. वोर्सोफ यांनी डक डायनेस्टी, द मिलियनेअर मॅचमेकर आणि डेटिंग नेकेड यांसारख्या रिअॅलिटी शोची निर्मिती केली आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, वोर्सोफ यांच्या ३५ पानांच्या नाटकात त्यांना अमेरिकन असण्याचा अर्थ काय आहे, हे साजरे करायचे आहे व् जगाला दाखवायचे आहे. त्याबरोबरच अमेरिकन असण्याचा अर्थ काय आहे याबद्दल राष्ट्रीय चर्चा करायची आहे. त्यांनी या शोबाबत लिहिलेल्या प्रस्तावित स्वरूपात, प्रत्येक तासाच्या एपिसोडमध्ये १२ पूर्व-तपासणी केलेले स्थलांतरित सहभागी होतील आणि अमेरिकेत प्रवास करतील. तसेच प्रादेशिक, सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेल्या अशा अनेक आव्हानांचा सामना करतील. मुख्य म्हणजे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी एका स्पर्धकाला बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे, परंतु देशातून हद्दपार केले जाणार नाही.
या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये आधीच कायदेशीर प्रणालीत असणाऱ्या स्थलांतरितांना सहभागी होता येणार आहे. या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये अमेरिकेचा इतिहास विचारला जाऊ शकतो आणि विज्ञानावरील प्रश्नमंजुषादेखील असू शकतात. परंतु, या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये ज्यांचा पराभव झाला त्यांना देशातून हद्दपार केले जाणार नाही. या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्यांचा प्रवास एलिस आयलंड येथून सुरू होईल. रिअॅलिटी टीव्ही शोमधील स्पर्धक ‘द सिटिझन शिप’ नावाच्या जहाजावर पोहोचतील.
या जहाजावर पोहोचल्यानंतर प्रत्येकाला प्रसिद्ध अमेरिकन नागरिकाद्वारे बेसबॉल ग्लोव्ह मिळतील. या रिअॅलिटी टीव्ही शोसाठी काही सेलिब्रिटींची नावे सुचवण्यात आली आहेत, ज्यात सोफिया व्हेर्गारा, रायन रेनॉल्ड्स आणि मिला कुनिस यांचा समावेश आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या स्वागतानंतर, स्पर्धक ‘द अमेरिकन’ नावाच्या ट्रेनमध्ये चढतील आणि तिथूनच स्पर्धेची सुरुवात होईल. स्पर्धकांना देशातील विविध भागांतील आव्हानांचा सामना करावा लागेल. जसे की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोने गोळा करणे, कोलोरॅडोमध्ये राफ्टिंग करणे, मेनमध्ये क्लॅम-डिगिंग करणे, डेट्रॉईटमध्ये मॉडेल टी कार असेंबल करणे आणि कॅन्ससमध्ये घोड्यावरून पत्र पोहोचवणे यांसारख्या कामांचा समावेश असेल.
विजेत्या स्पर्धकांना आणि पराभूत स्पर्धकांना काय मिळणार?
विजेत्या स्पर्धकाला कॅपिटॉलच्या पायऱ्यांवर एक शीर्ष अमेरिकन राजकारणी किंवा न्यायाधीश अमेरिकन नागरिक म्हणून शपथ देतील. दुसरीकडे, पराभूत स्पर्धकांना प्रतिष्ठित अमेरिकन बक्षिसे मिळतील. या बक्षिसांमध्ये दहा लाख अमेरिकन एअरलाइन्स पॉइंट्स, १०,००० डॉलर्सचे स्टारबक्स गिफ्ट कार्ड आणि जीवनात कधीही ७६ वेळा पेट्रोल भरता येईल.
हा शो कधी प्रसारित होणार?
हा शो सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. होमलँड सिक्युरिटी विभागाच्या प्रवक्त्या ट्रिसिया मॅकलॉघलिन यांच्या मते, हा शो अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात असून अजून प्रदर्शित होण्याला बराच वेळ आहे. त्या म्हणाल्या, “प्रत्येक प्रस्ताव नाकारण्यापूर्वी किंवा मंजुरीपूर्वी त्याची सखोल पडताळणी प्रक्रिया केली जाते. द अमेरिकनचा अजूनही आढावा घेतला जात आहे.” रॉब वोर्सोफ यांना विश्वास आहे की, या संकल्पनेत मोठे आणि व्यापक स्वरूपाचे व्यावसायिक यश मिळवण्याची क्षमता आहे. परंतु, अद्याप प्रकल्पाला आर्थिक पाठबळ किंवा त्याचे प्रसारण करण्यासाठी नेटवर्क मिळालेले नाही.
विशेष गोष्ट म्हणजे, वॉर्सोफ यांनी हा खेळ सुरू करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी माहिती दिली की, त्यांनी यापूर्वी ओबामा प्रशासन आणि बायडेन प्रशासनाच्या काळात अधिकाऱ्यांशी या कल्पनेवर चर्चा केली होती, परंतु योजना कधीच प्रत्यक्षात उतरली नाही. मात्र, आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनात इमिग्रेशन धोरणाच्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर या खेळाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून ट्रम्प यांची स्थलांतराबाबत कठोर भूमिका दिसून येत आहे. २० जानेवारी रोजी त्यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतल्यानंतर बेकायदा स्थलांतराविरोधातील कारवाया वाढवल्या.