आपला रोजचा आहार किती आरोग्यदायी आहे, हे आपण वापरत असलेल्या भांड्यांवरही अवलंबून आहे. अन्न शिजवताना आपण कोणती भांडी वापरतो यावर ते किती आरोग्यदायी आहे किंवा किती हानिकारक ते ठरतं. भारतीय स्वयंपाकघरांमध्ये पिढ्यानपिढ्या मातीची भांडी, पितळेची किंवा तांब्याची भांडी वापरली जात. त्यावेळी फक्त सवय म्हणून नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर असल्यानेही या भांड्यांचा वापर केला जात असे. सध्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची भांडी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. मात्र, ही सर्व भांडी आरोग्यासाठी उपयुक्त आहेत का याचा विचार केला जात नाही. युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (USFDA)ने आता नेमका हाच इशारा दिला आहे.
सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीने बनवलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांवर यूएस एफडीएने प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांच्या उत्पादनांमध्ये असुरक्षित अशा प्रमाणात शिसे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जास्त प्रमाणात शिसं असल्याने ही भांडी वापरल्यास आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. भांड्यांमध्ये शिसं असणं ही इतकी मोठी चिंता का आहे आणि नेमकं कोणत्या प्रकारच्या भांड्यांवर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
यूएस एफडीएच्या मते, शुद्ध ॲल्युमिनियम भांडी म्हणून विकल्या जाणाऱ्या आणि टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत विकली जाणारी भांडी अन्न साठवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरण्यास असुरक्षित मानली गेली आहेत. अमेरिकन आरोग्य नियामकाने असा अहवाल दिला आहे की, हिंडॅलियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पितळ, ॲल्मुमिनियम आणि ॲल्युमिनियम मिश्रधातूंपासून बनवलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांचीही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिसं असल्याचं आढळलं आहे.
स्वयंपाकाच्या भांड्यांमुळे होणारं नुकसान लक्षात घेऊन यूएस एफडीएने सांगितले की, किरकोळ विक्रेत्यांनी या भांड्यांची विक्री बंद करावी आणि ग्राहकांनी ही भांडी अन्न शिजवण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरू नयेत.
शिसं आरोग्यासाठी हानिकारक आहे का?
शिसं हा एक विषारी जड धातू आहे. आरोग्यतज्ज्ञांचं या संदर्भात म्हणणं आहे की, या धातूचा अन्नाशी संपर्क हानिकारक आहे. नियमितपणे जर शिसं असलेल्या भांड्यात अन्न शिजवलं आणि ते शरीरात जमा होऊ लागलं तर ते दीर्घकाळासाठी शरीराला नुकसान पोहोचवू शकते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये शिशाचं प्रमाण अनेकदा १०० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम)पेक्षा जास्त होते. अनेक केसेसमध्ये जेव्हा अन्न शिजवले जाते किंवा साठवले जाते तेव्हा या भांड्यांमधून ठराविक प्रमाणापेक्षा जास्त शिसं आहारात येतं.
शिसं जास्त प्रमाणात असलेलं अन्न खाल्ल्याने कालांतराने रक्तातील शिशाचं प्रमाण वाढू शकतं. याचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलांवर होऊ शकतो. रोजच्या वापरात ही भांडी आल्याने कालांतराने शिकण्यात अडचणी, कमी बुद्ध्यांक आणि वर्तनातील बदल तसंच गर्भवती महिला आणि गर्भालादेखील धोका होऊ शकतो.
शिसं केवळ मेंदू आणि मज्जासंस्थेलाच हानी पोहोचवत नाही, तर ते रक्त, मूत्रपिंड आणि हृदयावरही परिणाम करते. परिणामी अशक्तपणा येऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो आणि सतत संपर्कात आल्यास ते मूत्रपिंडाच्या ऊतींमध्ये साचू शकते, यामुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता बिघडू शकते. त्यामुळे मूत्रपिंडाचा आजार किंवा कायमचे नुकसानही होऊ शकते. शिशांचं प्रमाण शरीरात जास्त झाल्याने त्यापासून होणाऱ्या आजारांची लक्षणे लगेचच लक्षात येतात. थकवा येणं, डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या किंवा न्यूरोलॉजिकल समस्या अशा समस्या येऊ शकतात. मुलांमध्ये अनेकदा विकासाच्या दृष्टीने विलंब, स्मरणशक्तीसंदर्भात समस्या आणि कमी एकाग्रता दिसून येते.
यूएस एफडीएने नेमकं काय म्हटले आहे?
यूएस एफडीएने ग्राहकांना आवाहन केले आहे की, त्यांनी जाहीर केलेल्या यादीतील कोणतेही स्वयंपाकाचे भांडे काळजीपूर्वक तपासून घ्यावे. जर त्यांच्याकडे अशी भांडी असतील तर ताबडतोब ती टाकून द्यावीत. ज्यांना संबंधित लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. याआधी भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या आयसीएमआरने मातीच्या भांड्यांना मान्यता दिली होती आणि त्यांना सर्वात सुरक्षित भांडी असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये स्वयंपाक केल्यास तेलाचा वापर कमी होतो आणि भांड्याला सर्व बाजूंनी उष्णता मिळाल्याने अन्नाचे पौष्टिक संतुलनही राखले जाते.
किरकोळ विक्रेते आणि वितरकांना यासारख्या उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश यूएस एफडीएने दिले आहेत. तसंच अन्न शिजवण्यासाठीच्या सुरक्षित भांड्यांच्या पद्धतींबद्दल मार्गदर्शनासाठी यूएस एफडीएशी संपर्क साधण्याचा सल्लाही दिला आहे. लोकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव यूएस एफडीए अजूनही भांड्यांमध्ये शिशाच्या पातळीवर लक्ष ठेवून आहे.