भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात तुर्कियेने पाकिस्तानला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. तुर्किये विरोधात भारतीयांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. आता तुर्कियेला AIM-120C-8 प्रगत मध्यम-श्रेणीच्या हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (AMRAAMs) विकण्यास अमेरिकेने मान्यता दिल्याने भारतात गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. भारत-पाक तणावादरम्यान पाकिस्तानने भारतावर जे ड्रोन हल्ले केले, ते ड्रोन आणि शस्त्रे तुर्कियेकडून पाकिस्तानला पुरवण्यात आली होती.
अमेरिकेकडे तुर्कियेने क्षेपणास्त्रांबरोबर विविध प्रकारच्या २२५ मिलियन डॉलर्स किमतीच्या क्षेपणास्त्रांचीदेखील मागणी केली आहे. या हालचालीने पाकिस्तानशी असलेल्या तुर्कीच्या संरक्षण संबंधांकडेदेखील लक्ष वेधले आहे. भारताची चिंता वाढण्याचे कारण केवळ क्षेपणास्त्र नाही, तर भू-राजकीय परिणाम विशेषतः पाकिस्तानला तुर्कियेचा वाढता पाठिंबादेखील भारतासाठी राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरत आहे. या कराराला अमेरिकेचा दुटप्पीपणा म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका आणि तुर्कियेमध्ये नक्की काय करार झाला? AMRAAM क्षेपणास्त्र काय आहे? भारताची चिंता वाढण्याचे कारण काय? जाणून घेऊयात.

अमेरिका आणि तुर्कियेमधील करार काय?
१४ मे रोजी यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (डीएससीए) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तुर्कीने औपचारिकपणे ५३ AIM-१२०C-८ AMRAAM खरेदी करण्याची विनंती केली आहे. त्याला अद्याप काँग्रेसची (अमेरिकन संसद) मान्यता मिळालेली नाही. या करारात केवळ क्षेपणास्त्र नसून AMRAAM कंटेनर, कॉमन म्युनिशन्स बिल्ट-इन-टेस्ट रीप्रोग्रामिंग इक्विपमेंट (CMBRE), सुटे भाग आणि दुरुस्ती भाग, वर्गीकृत सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर डिलिव्हरी आणि सपोर्ट, वाहतूक सेवा आणि प्रोग्राम लॉजिस्टिक्स यांचादेखील समावेश आहे. डीएससीएने म्हटले आहे, “या प्रस्तावित विक्रीमुळे तुर्कियेला त्यांच्या मातृभूमीचे आणि तेथे तैनात असलेल्या अमेरिकन कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत हवाई संरक्षण क्षमता मिळेल. मुख्य म्हणजे तुर्कियेला या वस्तू आणि सेवा त्यांच्या सशस्त्र दलात सामावून घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.”
‘AMRAAM’ इतके महत्त्वाचे का आहे?
‘AIM-120 AMRAAM’ ही आधुनिक युद्धात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक आहे. ही क्षेपणास्त्र दृश्य श्रेणीच्या पलीकडे मारा करण्याकरिता डिझाइन केलेली आहेत. या क्षेपणास्त्राचे उत्पादक रेथिऑनने याचे वर्णन जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्र म्हणून केले आहे. AMRAAM ची ४,९०० हून अधिक लाईव्ह-फायर परिस्थितींमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र F-15, F-16, F/A-18, F-22 रॅप्टर, F-35, युरोफायटर टायफून, ग्रिपेन, टोर्नाडो, हॅरियर या प्रकारांसह अनेक लढाऊ विमानांमध्ये बसविण्यात आले आहे. ही नॅशनल अॅडव्हान्स्ड सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टममध्ये वापरली जाणारी मानक शस्त्र प्रणालीदेखील आहे, जी एक अत्यंत सक्षम जमिनीवर आधारित हवाई संरक्षण प्रणाली आहे.
भारताची चिंता वाढण्याचे कारण काय?
या करारामुळे भारताची चिंता वाढली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ल्यानंतर झालेल्या हवाई लढाईत पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरवर भारतीय विमानांवर AMRAAM क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही चकमक घडली होती.

भारतातील वरिष्ठ सरकारी सूत्रांनुसार, भारताने अमेरिकेला पुरावे सादर केले आहेत, जे दर्शवितात की या चकमकीत पाकिस्तानी विमानांनी AMRAAM क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. सूत्रांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले, “अमेरिकेच्या निर्णयामुळे केंद्र सरकार घाबरले आहे, कारण २०१९ मध्ये भारतीय लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून केलेल्या अयशस्वी हवाई हल्ल्यात पाकिस्तानने दृश्यमान श्रेणीच्या पलीकडे असलेल्या एफ१६ लढाऊ विमाने आणि AMRAAM क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे पुरावे अमेरिकेला दिले होते.”
पाकिस्तानबरोबर तुर्कियेचे वाढते संबंध
गेल्या काही वर्षांत, तुर्कियेने पाकिस्तान बरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ केले आहेत. त्यांचे संबंध राजनैतिकतेपलीकडे शस्त्रे आणि संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत विस्तारले आहेत. तुर्किये पाकिस्तानला सोंगर आणि यिहा मॉडेलसह अनेक ड्रोन पुरवले आहेत. याच ड्रोनचा वापर पाकिस्तानने भारताविरोधात केल्याचे समोर आले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी काश्मीर प्रश्नावर आणि इतर प्रादेशिक बाबींवर पाकिस्तानची उघड बाजू घेतली आहे. भारताने सीमापार दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर, एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला आणि तुर्कियेचे समर्थन असल्याचे स्पष्ट केले. तुर्कियेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, “तणाव वाढू नये म्हणून तुर्किये जे काही करू शकेल ते करण्यास तयार आहे आणि त्या संदर्भात त्यांचे राजनैतिक संपर्क सुरू राहतील असे एर्दोगान यांनी सांगितले.”
“आम्हाला काळजी आहे की पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव मोठ्या संघर्षात रूपांतरित होऊ शकतो. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे असंख्य नागरिकांचे बळी गेले आहेत. हल्ल्यात प्राण गमावलेल्या आमच्या बांधवांसाठी मी अल्लाहच्या दयेसाठी प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा माझ्या संवेदना व्यक्त करतो,” असे सोशल मिडियावरील एका पोस्टमध्ये एर्दोगान यांनी म्हटले . त्यांनी या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या विनंतीलाही मान्यता दिली.