Dangers of New World Screwworms : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक महत्वाचे निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांची मुस्कटदाबी करीत त्यांना देशातून हद्दपार केलै. त्यानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी अतिरिक्त आयात शुल्काचं हत्यार उगारलं. आता अमेरिकेनं ‘प्लाय वॉर’ ही नवीन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत हजारो माश्यांची फौज विमानाद्वारे आकाशात सोडली जाणार आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनातील कृषी सचिव ब्रूक रोलिन्स यांनी त्या संदर्भातील घोषणा केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या मोहिमेचा नेमका हेतू काय? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा….
मागील काही महिन्यांपासून अमेरिका व मेक्सिकोमध्ये एका विशिष्ट प्रकारचे कीटक आढळून येत आहेत. मांस खाणाऱ्या या कीटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे गोमांस उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याशिवाय पाळीव व वन्य प्राण्यांसाठीही हे कीटक हानिकारक ठरत आहेत. विज्ञानाच्या भाषेत या कीटकांना ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म फ्लाय’ असं नाव देण्यात आलं आहे. या जीवघेण्या कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठीच अमेरिकन सरकारनं आकाशात विशिष्ट प्रकारच्या म्हणजे वंध्य नर माश्यांसह मादी माश्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या नर वंध्य माश्या मादी माश्यांबरोबर मिलन करतील आणि त्यांना अंडी घालण्यापासून रोखतील.
विमानातून आकाशात व जंगलात माश्या सोडण्याच्या मोहिमेमुळे अमेरिकेतील १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या पशुधन व गोमांस उद्योगाचे संरक्षण होणार आहे.अमेरिकेतील तज्ज्ञांना अशी भीती आहे की, ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म फ्लाय’ या माश्या गोमांस उद्योगाला प्रचंड हानी पोहोचवू शकतात. त्याशिवाय त्या वन्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून, त्यांचा जीवही घेऊ शकतात.
आणखी वाचा : AI मुळे भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका? कॅनडाचा व्हिसा मिळवणं का होतंय कठीण?
माशाच करणार दुसऱ्या माश्यांचा नायनाट
न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म (NWS) माश्यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेने टेक्सासमधील मेक्सिको सीमेजवळ एक माशी-प्रजनन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८.५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनातील ७० कोटी रुपये) खर्च येणार आहे. त्याशिवाय हिडाल्गो काउंटीमधील मूर एअर बेसजवळही असेच प्रजनन केंद्र उभारले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे पश्चिम गोलार्धात उभारण्यात येणारे हे दुसरे केंद्र असेल. त्याआधी पनामा येथे माशी प्रजनन केंद्र कार्यरत आहे. त्याअंतर्गत उत्तरेकडे कूच करणाऱ्या न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म माश्यांना रोखण्यात अमेरिकेला मोठं यश मिळालं आहे.
“अमेरिकेने यापूर्वीही न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म माश्यांचा नायनाट केला आणि आम्ही पुन्हा तेच करू,” असं अमेरिकेचे कृषी सचिव ब्रूक रोलिन्स यांनी दक्षिण टेक्सासमधील एअर बेसवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी राज्य सरकार व गुरेपालक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. अमेरिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, या प्रजनन केंद्रातून लाखो वंध्य नर स्क्रूवॉर्म माश्यांचे प्रजनन केले जाईल आणि त्यांना विमानांमधून आकाशात व जंगलात सोडले जाईल. या नर माशा जीवघेण्या मादी माश्यांचा शोध घेतील आणि त्यांच्याशी संयोग करून, त्यांना अंडी घालण्यापासून रोखतील.
ही योजना कशी कार्य करणार?
१९५० च्या दशकात अमेरिकेने ‘Sterile Insect Technique’ नावाची एक मोहीम आखली होती, त्याअंतर्गत किरणोत्सर्गाचा वापर करून नर माश्यांना वंध्य करण्यात आलं. नंतर त्यांना मादी माश्यांबरोबर संयोग करण्यासाठी जंगलात सोडण्यात आलं. विशेष बाब म्हणजे- स्क्रूवॉर्म प्रजातीतील मादी माश्या फक्त एकदाय संयोग करतात. यादरम्यान त्यांनी वंध्य नर माश्यांबरोबर संयोग केला, तर त्यांना कधीच अंडी घालता येणार नाहीत. परिणामी या प्रजातीच्या माश्यांची पुढील पैदास थांबण्यास मोठी मदत होते. अमेरिकेने अशाच पद्धतीचा वापर नंतर डासांवरही केला होता. फ्लोरिडा विद्यापीठातील परजीवी अभ्यासाचे सहायक प्राध्यापक एडविन बर्गेस यांनी ‘NBC News’ला सांगितले, “ही तंत्रज्ञानाची एक अत्यंत प्रभावी पद्धत असून, त्यातून कोणत्याही मोठ्या समस्येवर नियंत्रण मिळवता येतं. कीटकांचा नाश करण्यासाठी हवेत कीटकनाशकाची फवारणी केल्याने पर्यावरणाची हानी होते; मात्र या पद्धतीमुळे पर्यावरणाचा समतोल राहतो आणि कोणतेही प्रदूषण होत नाही.”

न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म माश्या नेमक्या काय करतात?
न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म माशा अत्यंत धोकादायक कीटक मानले जातात. ‘स्क्रूवॉर्म’ हे नाव त्यांच्या जखमेमध्ये आत घुसून,मांस खाण्याच्या क्रूर पद्धतीवरून पडले आहे. एखाद्या लाकडी वस्तूंमध्ये जसं आपण स्क्रू फिरवतो, अगदी तशाच पद्धतीनं या माश्या जनावरांच्या शरीरात शिरतात आणि त्यांचे मांस खातात. टेक्सास विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. फिलिप कॉफमन यांच्या मते, या माश्या मृत नव्हे, तर जिवंत जनावरांचे मांस खातात. विशेषत: गाई व घोड्यांच्या ताज्या मांसावर त्या आपली उपजीविका करतात.
काही प्रकरणांमध्ये या माश्यांनी पाळीव प्राण्यांबरोबर माणसांनाही संसर्गित केलं आहे. या माश्या मुख्यतः क्युबा, हैती, डोमिनिकन रिपब्लिक आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागांत आढळून येतात. त्यांच्या कुरतडल्याने प्राण्यांच्या अंगावर मोठी जखम होते आणि एक ते दोन आठवड्यांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. “ही माशी दोन आठवड्यांत १,००० पौंड वजनाची गाय मारू शकते,” असे अमेरिकन व्हेटरनरी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मायकेल बेली यांनी ‘USA Today’ला सांगितले.
हेही वाचा : ईशान्य रेल्वेच्या माध्यमातून भारताची बांगलादेश-चीन युतीवर मात करण्याची योजना
अमेरिकेकडे सरकतंय स्क्रूवॉर्म माश्यांचे नवीन संकट
२०२२ मध्ये अमेरिकेने या माश्यांचे देशातून उच्चाटन केले होते. मात्र, मध्य अमेरिकेत पुन्हा एकदा न्यू वर्ल्ड स्क्रूवॉर्म माश्यांचा प्रसार होत आहे. २०२३ मध्ये पनामामध्ये या माश्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांचा प्रसार मेक्सिकोपर्यंत पोहोचला. वाढते तापमान हे माश्यांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या मध्य अमेरिकेतील सुमारे १७ दशलक्ष पशुधन धोक्यात आहे. मेक्सिकोमध्ये अमेरिकेच्या दुप्पट जनावरे असून, हे कीटक त्यांच्याकडेही कूच करीत आहेत. टेक्सास आणि फ्लोरिडामध्येच सुमारे १४ दशलक्ष जनावरे या कीटकांच्या छायेत सापडले आहेत. त्यामुळे या माश्यांचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेली नवीन मोहीम किती प्रभावी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.