Cloudburst causes Uttarakhand उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरू असून, राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी (५ ऑगस्ट) ढगफुटी झाली आणि त्यामुळे अचानक पूर आला. त्यामध्ये किमान चार लोकांचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण बेपत्ता असल्याची भीती आहे. उत्तरकाशीमधील धराली गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. महापुरामुळे घरे आणि इमारती वाहून गेल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा केली असून, मदतकार्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले आहे. ढगफुटी म्हणजे काय? उत्तराखंडमध्ये सतत या घटना का घडतात? धराली गावात नक्की काय घडलं? त्याविषयी जाणून घेऊयात.

ढगफुटी म्हणजे काय?

  • ढगफुटी म्हणजे कमी वेळेत, कमी जागेत होणारा अचानक व अतिशय तीव्र पाऊस. ढगफुटीची एक विशिष्ट व्याख्या आहे. त्यानुसार सुमारे १० किमी X १० किमी परिसरात एका तासात १० सेंमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडत असेल, तर त्याला ढगफुटी म्हणतात.
  • पर्वतीय ढगफुटीच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसाळ्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये अशा घटना सातत्याने घडतात, याचे कारण म्हणजे तेथील भौगोलिक परिस्थिती त्याला अनुकूल असते.
  • जमिनीवरून उष्ण वारे ढगांकडे जातात तेव्हा हा हवेचा प्रवाह पावसाच्या थेंबांना वरच्या दिशेने घेऊन जातो. त्यामुळे नवीन थेंब तयार होतात आणि पूर्वीपासून असणारे थेंब आणखी मोठे होतात. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक लाख लिटर पाणी साठते. त्यामुळे अचानक ढग एकमेकांवर आदळतात आणि अचानक एकाच वेळी पाऊस पडतो.
भारतामध्ये ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश, पश्चिम घाट आणि हिमालयीन प्रदेश ढगफुटीसाठी संवेदनशील आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

उत्तराखंडमध्ये अचानक पूर का येतो?

भारतामध्ये ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश, पश्चिम घाट आणि हिमालयीन प्रदेश ढगफुटीसाठी संवेदनशील आहेत. डोंगराळ भागात उष्ण हवेचे प्रवाह वरच्या दिशेने वाहत असल्यामुळे ढगफुटीची शक्यता जास्त असते. ढगफुटीमुळे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सहसा भूस्खलन व अचानक पूर येतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये सर्वांत भयंकर आपत्ती आली होती. त्यावेळी ढगफुटीमुळे आलेला विनाशकारी पूर आणि भूस्खलन यांमुळे अनेक गावे आणि शहरे नष्ट झाली होती. या आपत्तीमध्ये ६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि ४,५०० गावांना फटका बसला होता. तेव्हापासून उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. हवामान बदलासह अनेक कारणांमुळे अलीकडच्या वर्षांत अशा नैसर्गिक घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते, हवामानबदलामुळे हवा अधिक उष्ण होत असल्याने, ती जास्त काळ जास्त आर्द्रता धरून ठेवू शकते आणि ढगफुटीची शक्यता वाढते, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, डोंगराळ प्रदेशातील अनियोजित विकास व ढगफुटीमुळे होणारे नुकसान वाढले आहे. रस्ते, धरणे व इमारतींचे अनियंत्रित बांधकाम झाल्यामुळे प्रदेशातील नैसर्गिक जलनिःसारण प्रणालीला नुकसान पोहोचले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झाली आहे आणि पूर येत आहेत. जंगलतोड आणि जमिनीचा बदलणारा वापर यांमुळे पावसाचे पाणी शोषून घेण्याची तिची क्षमता कमी झाली आहे. या बदलांमुळे डोंगरउताराच्या पायावरही परिणाम झाला आहे आणि त्यामुळे ते भूस्खलनासाठी अधिक प्रवण झाले आहेत.

ढगफुटीची धराली येथील घटना किती गंभीर?

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात चिखलाच्या पाण्यामुळे किमान चार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. धराली हे गंगोत्रीला जाण्यासाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आणि महत्त्वाचा थांबा आहे. तेथे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व होम स्टे आहेत. “आज दुपारी १:४५ च्या सुमारास हर्शिल येथील भारतीय लष्कराच्या छावणीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धराली गावाजवळ भूस्खलन झाले,” असे भारतीय लष्कराने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. लष्कराने सांगितले की, २० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले असून, बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. “हर्शिल येथील भारतीय लष्कराच्या वैद्यकीय सुविधेत जखमींवर वेळेवर आणि प्रभावी उपचार केले जात आहेत,” असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)देखील बचावकार्य करीत आहेत. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे धरालीच्या डोंगराळ भागातून पाणी खाली आले आणि रस्ते, इमारती व दुकाने पाण्याखाली गेली.

स्थानिकांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, १० ते १२ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची शक्यता आहे आणि २० हून अधिक हॉटेल्स व होम स्टे वाहून गेले, असा अंदाज आहे. पंतप्रधान मोदींनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले, “या दुर्घटनेत ज्यांना फटका बसला आहे, त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.” ते म्हणाले, “मी सर्व पीडितांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. मदत व बचाव पथके प्रत्येक संभाव्य प्रयत्न करीत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाहीये.” धराली परिसरातील घटनेनंतर काही तासांनी उत्तराखंडच्या सुखी टॉपमध्ये आणखी एका ढगफुटीची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.