जगभरातील संशोधक पर्यायी ऊर्जा संसाधनांचा शोध घेत आहेत. कारण- भविष्यात जगभरात ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. ऊर्जा संकटाच्या सावटाखाली असणाऱ्या जगासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका नव्या वैज्ञानिक संशोधनात पृथ्वीच्या अनेक भागांत नैसर्गिक हायड्रोजनचे साठे असण्याची शक्यता आहे. हा नैसर्गिक साठा पुढील १,७०,००० वर्षे जगाची ऊर्जेची गरज भागवू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा जगासाठी एक जॅकपॉट असल्याचे म्हटले जात आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ, डऱ्हॅम विद्यापीठ व टोरंटो विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले आहे की, नैसर्गिकरीत्या निर्माण होणारा हायड्रोजन स्वच्छ, दीर्घकालीन ऊर्जास्रोत म्हणून वापरता येऊ शकतो. जगात जीवाश्म इंधने बदलण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशात हा शोध जागतिक ऊर्जाप्रणालींमध्ये क्रांती घडवू शकतो आणि शाश्वत ऊर्जेच्या शोधात एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो. हायड्रोजन महत्त्वाचा का आहे? त्याचा साठा नक्की कोठे आहे? त्याचे महत्त्व काय? जाणून घेऊ.

हायड्रोजन इतका महत्त्वाचा का?

हायड्रोजन हे स्वच्छ ज्वलनशील इंधन आहे, जे वापरल्यावर फक्त पाणी उत्सर्जित करते. हायड्रोजनच्या उत्पादनादरम्यान प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही हरित वायूचे उत्सर्जन होत नाही. खत उत्पादनासारख्या उद्योगांमध्ये हायड्रोजन महत्त्वाचा आहे. हायड्रोजनचा वापर आता विस्तारत आहे आणि वाहतूक, वीज व ऊर्जा साठवणुकीत त्याचा वापर केला जात आहे. परंतु, सध्या बहुतेक हायड्रोजन जीवाश्म इंधनांपासून तयार केला जातो. परंतु, नैसर्गिक हायड्रोजनला व्हाइट हायड्रोजन म्हटले जाते. त्याला ‘गोल्ड’, ‘नॅचरल’, ‘जिओलॉजिओ’ हायड्रोजन, असेही म्हटले जाते.

हायड्रोजनचा साठा नेमका कोठे आहे?

पृथ्वीतलावर हायड्रोजन या घटकाचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी हा घटक वेगवेगळ्या घटकांबरोबर संमिश्र स्वरूपात आढळतो. हायड्रोजन सामान्यतः पृथ्वीच्या खोलवर आढळून येतो आणि पाणी व लोहयुक्त खडकांमधील प्रतिक्रियांमुळे कालांतराने हळूहळू बाहेर पडते. शास्त्रज्ञांनी आता कॅनेडियन शिल्डसारख्या प्रदेशात संशोधन सुरू केले आहे, जिथे हायड्रोजन नैसर्गिकरीत्या पृष्ठभागावर झिरपतो. नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, असे क्षेत्र खूपच व्यापक स्वरूपाचे असू शकते आणि त्यामुळे ती ठिकाणे जगभरातील हायड्रोजनचा स्रोत ठरू शकतात. आतापर्यंत जगभरात अमेरिका, ओमान, माली, पूर्व युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यांसारख्या काही देशांत हायड्रोजनचा साठा आढळून आला आहे.

हायड्रोजनचा वापर इंधन स्रोत म्हणून होऊ शकतो?

हायड्रोजनचा वापर इंधन स्रोत म्हणून होऊ शकतो. परंतु, ही प्रक्रिया ड्रिलिंग आणि पंपिंगइतकी सोपी नाही. नैसर्गिक हायड्रोजन मिळवायचा असल्यास एका नवीन प्रकारच्या शोध धोरणाची आवश्यकता आहे. या धोरणात वायू कसा तयार होतो, हा वायू जमिनीखाली कसा अडकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञ आता याचा शोध घेण्यासाठी आणि सुरक्षितपणे हायड्रोजन बाहेर काढण्यासाठी शाश्वत पद्धती विकसित करीत आहेत. जसे जमिनीतून हेलियम काढला जातो. हेही त्याच स्वरूपाचे असेल. पूर्वी मोठ्या प्रमाणात हायड्रोजनची निर्मिती केवळ प्रयोगशाळेत करता येऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा समज होता. परंतु, फ्रान्समध्ये लागलेल्या शोधानंतर कोणतीही ऊर्जा खर्च न करता नैसर्गिकरीत्या हायड्रोजनची निर्मिती होऊ शकते, असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

सध्या हायड्रोजनचा वापर का करता येत नाही?

व्हाइट हायड्रोन हा हरित ऊर्जास्रोत असून कोणत्याही हरित वायूचे उत्सर्जन न करता, त्याद्वारे ऊर्जानिर्मिती करू शकतो. मुख्य म्हणजे ग्रीन हायड्रोजनच्या तुलनेत व्हाइट हायड्रोजन अधिक किफायतशीर असते. परंतु, नैसर्गिक हायड्रोजनचा वापर करायचा असल्यास काही आव्हाने आहेत. त्यातील प्रमुख आव्हान म्हणजे जीवाणू. काही भूगर्भातील सूक्ष्मजंतू प्रत्यक्षात हायड्रोजनचे अन्न म्हणून सेवन करतात. याचाच अर्थ असा की, हे नैसर्गिक वायूचे कप्पे कालांतराने अदृश्यदेखील होऊ शकतात. हायड्रोजन वापरण्यायोग्य ठेवण्याकरिता संशोधकांना अशी ठिकाणे शोधणे आवश्यक आहेत, जिथे ते सूक्ष्म जीवांपासून हायड्रोन संरक्षित असेल. या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नियमनाचीदेखील आवश्यकता आहे. या साठयांचा वापर करायचा असल्यास मोठ्या प्रमाणात विकास आणि चाचणी आवश्यक असेल.

या शोधामुळे जागतिक ऊर्जा संकट दूर होईल?

हा शोध खूप मोठा आहे, ज्यामुळे नक्कीच जागतिक ऊर्जा संकट दूर होऊ शकते. जर हे भूमिगत नैसर्गिक हायड्रोजन साठे शोधता आले आणि त्याला बाहेर काढले गेले, तर ते कमी-कार्बन उत्सर्जन करून दीर्घ काळापर्यंत उर्जेचा पुरवठा करू शकेल आणि जीवाश्म इंधनांना बदलण्यासदेखील मदत करू शकेल. अभ्यासातील माहितीनुसार, हा स्रोत हजारो वर्षांची जागतिक हायड्रोजन मागणी पूर्ण करू शकतो. परंतु, २०५० पर्यंत जागतिक हायड्रोजनचा वापर सहा पटींनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नैसर्गिक हायड्रोजन स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील एक मोठी पोकळी भरून काढू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा शोध कोणी लावला?

या शोधामागील संशोधन पथकाने वापरण्यायोग्य हायड्रोजन साठ्यांचा शोध सुरू करण्यासाठी स्नोफॉक्स डिस्कव्हरी लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी भूगर्भीय कौशल्य आणि उपग्रह डेटा एकत्रित करीत असून, त्यांचे ध्येय व्यावसायिकरीत्या विकसित करता येणाऱ्या हायड्रोजनचा संचय शोधणे आहे.