अमोल परांजपे

एकीकडे युक्रेनच्या प्रतिहल्ल्याला तोंड देत असलेल्या रशियासमोर शनिवारी एक नवे मोठे संकट उभे ठाकले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये मुक्त हस्ते वापरलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’ या भाडोत्री सैनिकांच्या लष्कराने बंडाचा झेंडा फडकविला आहे. युक्रेन सीमेवरील मोक्याच्या ठिकाणांवर या गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे रशियाची आणखी शकले पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रशियानेच पोसलेल्या या भस्मासुराने अखेर आपल्या निर्मात्याच्या डोक्यावर हात ठेवल्याचे यामुळे स्पष्ट होत असताना, या गटाचा इतिहास तपासणे आवश्यक आहे.

‘वॅग्नर ग्रुप’ काय आहे?

‘पीएमसी वॅग्नर’ असे अधिकृत नाव असलेला हा गट स्वत: खासगी कंपनी असल्याचे सांगतो. या कथित कंपनीकडे काही हजार पगारी सैनिक आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर हे एक ‘भाडोत्री लष्कर’ असून ‘सुपारी’ देणाऱ्या कुणालाही ते सेवा देते. चेचेन्याच्या युद्धात लष्करी तुकडीचे नेतृत्व केलेले ज्येष्ठ रशियन लष्करी अधिकारी दिमित्री व्हॅलेरिएविच उतकिन हे या कंपनीचे संस्थापक असल्याचे मानले जाते. वॅग्नर ग्रुप हा नाझीवादी, श्वेतवर्णवादी आणि अतिउजव्या अतिरेकी विचारसरणीचा आहे. स्वतः उतकिन इतके कडवे हिटलरवादी आहेत, की त्यांच्या मानेखाली दोन्ही बाजूला नाझी पक्षाची चिन्हे गोंदविलेली आहेत. वॅग्नर या नावाचे मूळ काय हे कुणालाच माहित नसले तरी एका गृहितकानुसार, हिटलरचा आवडता संगीतकार रिचर्ड वॅग्नर याच्यावरून हे नाव ठेवले असावे. रशियातील अब्जाधीश येवगेनी प्रिगोझिन यांचे मोठे आर्थिक पाठबळ या कंपनीला मिळाले असून सध्या तेच वॅग्नरचे प्रमुख आहेत.

वॅग्नरचा वापर रशियाने कसा केला?

२०१४ साली युक्रेनमधून क्रिमियाचा लचका तोडताना पुतिन यांनी सर्वप्रथम या भाडोत्री सैनिकांचा वापर केला. नंतर युक्रेनच्या डोनबास प्रदेशातील फुटिरतावादी गटांना ही संघटना लष्करी आणि वेळप्रसंगी आर्थिक मदत करत होती. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही भागांमध्ये याच वॅग्नर गटाचे सैनिक लढा देत आहेत. बाख्मुत शहर याच कंपनीने ताब्यात घेतले आहे. ज्या गोष्टी रशियाचे लष्कर उघडउघड करू शकत नाही, अशा कारवाया पुतिन हे वॅग्नर ग्रुपकरवी करून घेत असल्याचे बोलले जाते. युद्धकैद्यांचा छळ करणे, अतिरेकी गटांना मदत करणे आदी कामे वॅग्नरचे भाडोत्री सैनिक बिनबोभाट करत असतात. युक्रेनमध्ये प्रत्यक्ष लष्कर घुसविण्यापूर्वी पुतिन यांनी या गटाकरवी स्वत:च्याच भागात खोटे हल्ले घडवून (फॉल्स फ्लॅग ऑपरेशन) युद्धाला कारण निर्माण केल्याचे सांगितले जाते.

रशियात धुमश्चक्री, वॅग्नर ग्रुपच्या बंडामुळे पुतिन संकटात; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणतात, “आता तिथे एवढा गोंधळ झालाय की…!”

अन्य देशांमधील कारवाया कोणत्या?

२०१५ साली सीरियामध्ये सरकारच्या बाजुने वॅग्नरचे भाडोत्री सैनिक लढले. यावेळी त्या देशातील तेलाच्या विहिरींचे संरक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारीही याच गटाने पार पाडली होती. लीबियामध्ये जनरल खलिफा हफ्तार यांनी वॅग्नरच्या सैनिकांना आपल्या बाजूने रणांगणात उतरविले होते. मध्य आफ्रिकेतील हिऱ्याच्या खाणी आणि सुदानमधील सोन्याच्या खाणींच्या संरक्षणाचे काम तेथील सरकारांनी याच कंपनीला दिल्याचे सांगितले जाते. माली या पश्चिम आफ्रिकेतील देशामध्ये तेथील सरकारने इस्लामी दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी वॅग्नर गटाची मदत घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी केलेल्या कामगिरीची माली सरकारने प्रशंसाही केली होती. या कारवायांमधून प्रिगोझिन यांनी अमाप पैसा कमाविल्याचीही वदंता आहे.

वॅग्नरबाबत जगभरात कोणती चर्चा?

भाडोत्री सैनिकांच्या वापराचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांमधील गटाच्या प्रमुख सोर्चा मॅकलिऑड यांच्या मते अधिकृतरित्या वॅग्नर ग्रुप असे काही अस्तित्वात नाही. विविध कंपन्या आणि छोट्या-छोट्या गटांचे हे जाळे आहे. युक्रेन युद्धात वॅग्नर ग्रुपचा सहभाग मोठा असल्याने पाश्चिमात्य देशांनी त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर अनेक निर्बंध लादले आहेत. जानेवारीमध्ये अमेरिकेने या गटाचा समावेश ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनां’च्या यादीमध्ये केला. या गटाचे सैनिक सामुदायिक हत्याकांड, बलात्कार, मुलांचे अपहरण, तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये युरोपीय महासंघानेही या गटाशी संबंधितांवर विविध प्रकारचे निर्बंध लागू केले होते.

वॅग्नर ग्रुपच्या बंडाचे कारण काय?

युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या आधीपासूनच वॅग्नर गटाच्या रशियन लष्करासोबत कुरबुरी सुरू आहेत. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्यावर प्रिगोझिन यांचा विशेष राग आहे. युद्धामध्ये रशियाचे नाक ठेचले जात असताना लष्कर आणि वॅग्नर यांनी एकमेकांकडे बोटे दाखविण्यास सुरुवात केली. प्रिगोझिन यांनी तर रशियाचे सैन्य आपल्या पिछाडीवर खंदक खणत असून आपल्या सैनिकांवर हल्लेही करत आहे, असा गंभीर आरोप केला. अखेर शनिवारी दोन्ही लष्करांमध्ये धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. रोस्तोव-ओन-डॉन हे शहर आपण ताब्यात घेतल्याचे वॅग्नरने जाहीर केल्यानंतर पुतिन यांनी प्रिगोझिन यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारला. प्रिगोझिन यांनी आतापर्यंत पुतिन यांच्याविरोधात एकही शब्द उच्चारलेला नसला तरी त्यांच्या सैन्याने रशियाची राजधानी मॉस्कोकडे कूच केली आहे. अर्ध्या वाटेवर असलेल्या वोरोनेझ शहरातील लष्करी ठाणीही त्यांनी ताब्यात घेतली आहेत. आा युक्रेनच्या सैनिकांशी लढणाऱ्या दोन फौजा आता एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com