ब्रिटनमधील एका शहरात १७ हजार टन कचरा रस्त्यांवर पडला आहे. या कचऱ्यामुळे बर्मिंगहॅम शहरावर महामारीचे संकट निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे शहरातील कचरा कामगार पूर्णपणे संपावर गेले आहेत. ही संपाची लाट संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे संकट मोठे आहे. ब्रिटनमध्ये संपाची लाट पसरेल, असा इशारा एका युनियन नेत्याने दिला आहे. कामगार आणि सरकारमध्ये वेतनावरून वाद सुरू आहे. त्यामुळे ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असणाऱ्या बर्मिंगहॅममध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग तयार झाले आहेत. रस्त्यांवर चक्क मांजरीच्या आकाराचे उंदीर धावत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
ब्रिटनमधील परिस्थिती इतकी वाईट आहे की, सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागू शकते, या भीतीने लष्कराला तैनात करण्यात आले आहे. पण आता, हे संकट केवळ बर्मिंगहॅमपुरते मर्यादित राहणार नाही. संप करणाऱ्या कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था युनायटेडचे राष्ट्रीय प्रमुख अधिकारी ओनय कसाब म्हणाले की, जर स्थानिक परिषदांनी त्यांचा दृष्टिकोन बदलला नाही, तर अशाच प्रकारचा निर्णय ब्रिटनच्या प्रत्येक शहरामध्ये घेण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जातील. नेमके ब्रिटनमध्ये काय सुरू आहे? तेथील एकूण परिस्थिती काय? त्याविषयी जाणून घेऊ.

कचराकुंडी कामगार संपावर असण्याचे कारण काय?
बर्मिंगहॅममध्ये सिटी कौन्सिल आणि कचरा कामगार यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. तोच वाद अलीकडील संकटासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. वेतनकपातविरोधात कचरा पुनर्वापर आणि संकलन अधिकारी निषेध करीत आहेत. कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या संस्थेने सिटी कौन्सिल पुनर्रचना योजनेंतर्गत सुमारे १५० कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात ८,००० पौंड (८.८४ लाख रुपये) इतकी कपात होऊ शकते, असे सांगितले आहे. परंतु, सिटी कौन्सिलने आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले आहे. कचरा पुनर्वापर आणि संकलन अधिकाऱ्यांची भूमिका स्थानिक प्राधिकरणांमध्ये वापरली जाऊ शकत नाही. असे केल्यास सर्वांना समान वेतन द्यावे लागू शकते, असे सिटी कौन्सिलचे सांगणे आहे. बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल आधीच आर्थिक तणावात आहे. २०२३ मध्ये त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली होती.
जानेवारीमध्ये ३५० हून अधिक कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर कामगारांनी ११ मार्च रोजी अनिश्चित काळासाठी संप जाहीर केला. युनायटेडचे म्हणणे आहे की, वेतनात केलेली नुकसानकारक कपात मागे घेतल्याशिवाय हा वाद संपणार नाही. “बर्मिंगहॅम कौन्सिल हा वाद सहजपणे सोडवू शकते; परंतु त्यांना कोणत्याही पद्धतीने वेतनकपात लादायची असल्याचे दिसते,” असे युनायटेडचे सरचिटणीस शेरोन ग्रॅहम म्हणाले.
हजारो टन कचऱ्याने नागरिक त्रस्त
बर्मिंगहॅममध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग तयार होत असल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी ही संकटाची स्थिती असल्याचे नागरिकांचे सांगणे आहे. कुजलेल्या कचऱ्याने कोल्हे, झुरळे व उंदीर आकर्षित होत आहेत. या शहरातील रहिवासी फैजाह इफ्तिखर यांनी ‘स्काय न्यूज’ला सांगितले की, त्यांनी शहराची ही स्थिती यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. “ही स्थिती खरोखर गंभीर आणि भयानक आहे. कचरा नेण्यासाठी कोणी नसल्याने कचरा साचत चालला आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी आहे आणि सर्वत्र उंदरांचे साम्राज्य झाले आहे. इथे जगणे अवघड होत आहे,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, ” माझा जन्म इथेच झाला; परंतु यापूर्वी मी अशी परिस्थिती कधीही पहिली नाही. हे कोणाच्याही आरोग्यासाठी चांगले नाही. आम्हाला त्या कर्मचाऱ्यांच्या संपाचे कारण माहीत आहे; परंतु यापूर्वी मी अशी परिस्थिती कधीही पाहिलेली नाही. या संपानंतर अवघ्या चार आठवड्यात १७ हजार टन कचरा साचला आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती इतकी गंभीर झाली की, या ठिकाणी सैन्याला तैनात करावे लागले आहे. पण, वाढत्या दबावानंतरही, युनाइट आणि सिटी कौन्सिल यांच्यातील चर्चेतून अद्याप कोणताही समर्पक निर्णय घेण्यात यश आलेले नाही. युनियनने कौन्सिलच्या नवीनतम वेतन योजनेला नकार दिला आहे.
संपाची लाट संपूर्ण ब्रिटनमध्ये फैलावण्याचा इशारा
बर्मिंगहॅममधील संकट ही तणावाची केवळ सुरुवात असल्याचे सांगितले जात आहे. युनायटेडने इशारा दिला आहे की, जर संपूर्ण यूकेमधील कौन्सिल सार्वजनिक सेवा वेतनाबाबतच्या त्यांच्या धोरणांच्या बाबतीत पुनर्विचार करीत नसेल, तर इतर शहरांमध्येही असेच संप सुरू होऊ शकतात. ‘बीबीसी रेडिओ ४’च्या ‘टुडे’ कार्यक्रमात बोलताना, युनायटेडचे राष्ट्रीय प्रमुख अधिकारी कसाब म्हणाले की, जर इतर स्थानिक अधिकारी बर्मिंगहॅमच्या पुढाकाराचे अनुसरण करणार असतील, तर त्यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल.
ते पुढे म्हणाले, “जर इतर स्थानिक अधिकारी अत्यावश्यक सार्वजनिक सेवा कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा विचार करीत असतील, तर संपाची कारवाई संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरेल,” असे ते म्हणाले. ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार पीटरबरो आणि शेफिल्ड यांसारख्या शहरांमध्ये या संपाची सुरुवात होऊ शकते. शेफिल्डमध्ये आधीच संप सुरू आहे. उत्तर लंडनमधील ब्राइटन, बार्नेट येथील कौन्सिलमध्येही अशाच प्रकारच्या संपाचा इशारा दिला जात आहे, असे वृत्त ‘द टाइम्स’ने दिले आहे. युनायटेड आणि बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलमध्ये येत्या बुधवारी पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेत तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.