मंगळवारी (२८ मे) दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर विमानातील प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आपत्कालीन मार्गांचा वापर करून १७६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यासाठी विमानात असलेल्या ‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’चा (Evacuation Slides) शिताफीने वापर करण्यात आला. मात्र, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी एक अफवा असल्याचे नंतर निष्पन्न झाले. विमानामध्ये असलेले ‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’ म्हणजे नेमके काय असते आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो, याची माहिती घेऊ या.
‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’ म्हणजे काय?
‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’ या हवेने भरलेल्या असतात. त्या प्लास्टिक अथवा रबराचा वापर करून तयार करण्यात आलेल्या फुग्याच्या घसरगुंड्या असतात. त्यांचा वापर करण्याआधी त्यामध्ये हवा भरणे गरजेचे असते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानातील प्रवाशांची तातडीने आणि सुखरूप सुटका व्हावी यासाठी विमानाच्या दरवाजांजवळ हवेने भरलेल्या या घसरगुंड्या तैनात केल्या जातात. विमानाचे दरवाजे विशिष्ट उंचीवर असतात, अशा वेळी विमानातून सुटका होण्यासाठी सुखरूप मार्गाची गरज असते. ‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’च्या माध्यमातून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर पडता येते.
इव्हॅक्युएशन स्लाईड्सचेही चार प्रकार असतात. त्यामध्ये इन्फ्लेटेबल स्लाईड (Inflatable Slide), इनफ्लेटेबल स्लाईट / राफ्ट (Inflatable Slide/Raft), इनफ्लेटेबल एक्झिट रॅम्प (Inflatable Exit Ramp), इनफ्लेटेबल एक्झिट रॅम्प / स्लाईड (Inflatable Exit Ramp/Slide) यांचा समावेश होतो. थोडक्यात, कमी-अधिक फरकाने हवा भरून वापरली जाणारी प्लास्टिक अथवा रबराची घसरगुंडी, अशीच त्यांची रचना असते. मात्र, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हॅक्युएशन स्लाईड्सचा वापर केला जातो.
हेही वाचा : माणसाचं शरीर किती उकाडा सहन करु शकतं? उन्हामुळे मृत्यू कसा होतो?
कोणत्या इव्हॅक्युएशन स्लाईड्सचा कधी वापर केला जातो?
विमानाच्या दरवाजापासून ते खाली जमिनीपर्यंत जाणारा हा मार्ग इव्हॅक्युएशन स्लाईड्सच्या माध्यमातून तयार केला जातो. अगदी विमानाच्या पंखांनाही लागून हे मार्ग उभे केले जातात. त्यामुळे समजा, एखाद्याला दरवाजांमधून बाहेर पडता आले नाही, तर विमानाच्या पंखांना लागून असलेल्या इव्हॅक्युएशन स्लाईड्सचा वापर करता येतो. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या (EUASA) अहवालामध्ये असे म्हटले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जमिनीवरही हवा भरलेले तराफे ठेवले जाऊ शकतात. इनफ्लेटेबल स्लाईड/राफ्ट हेदेखील स्लाईडसारखेच काम करतात. मात्र, त्यांचा वापर पाण्यामध्येही करता येतो. अपघात झाल्यास अथवा आपत्कालीन प्रसंगी पाण्यामध्ये लँडिग केले असल्यास प्रवाशांना पाण्यामध्येही सुखरूपपणे उतरता यावे, यासाठी या तरंगणाऱ्या तराफ्यांना तैनात केले जाते.
आपत्कालीन परिस्थितीत सोय व्हावी म्हणून विमानाच्या पंखांनजीकही बाहेर पडण्याचा आपत्कालीन मार्ग असतो. त्यांना विमानाचे आपत्कालीन दरवाजे (Aircraft Emergency Exits) म्हटले जाते. या मार्गांचा वापर करून पंखांवर आल्यानंतर जमिनीवर उतरण्यासाठी ‘इनफ्लेटेबल एक्झिट रॅम्प’चा वापर करता येतो. थोडक्यात, विमानाच्या पंखांवरून खाली उतरण्यासाठी एका उतरंडीची रचना केलेली असते. इव्हॅक्यूएशन स्लाईड्स कार्बन फायबर्स आणि नायलॉनचा वापर करुन तयार केलेली असते. त्यांचे आगीपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यावर युरेथिनचाही थर लावलेला असतो. अत्यंत मजबूत अशा तंतुमय पदार्थांपासून त्याची निर्मिती केली जाते; जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत वापर होत असताना त्यांचे नुकसान होऊ नये.
simpleflying.com ने दिलेल्या माहितीनुसार, या स्लाईड्स व्यवस्थितपणे बांधून केबिनचा दरवाजा अथवा विमानाच्या सांगाड्यामध्ये बंदिस्त केलेल्या असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या स्लाईड्स बाहेर याव्यात आणि त्यांच्यामध्ये हवा भरावी, यासाठी दरवाजाजवळ एक बटणही असते. विमान हवेत असताना दरवाजे उघडता येत नाहीत. कारण- बाहेरील वातावरणाचा दबाव आणि विमानाच्या आतील दबाव यामध्ये प्रचंड फरक असतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सक्शन मशीनद्वारे या स्लाईड्समध्ये कार्बन डाय-ऑक्साईड अथवा नायट्रोजन गॅस भरला जातो.
हेही वाचा : मान्सून आला हे नक्की कसे समजते? मान्सून ऑनसेट म्हणजे काय? जाणून घ्या…
इव्हॅक्युएशन स्लाईड्सचा वापर करण्याबाबत काय नियम?
विमानाचा आपत्कालीन दरवाजा आणि जमीन यांच्यामधील अंतर सहा फूट किंवा त्याहून अधिक असेल तेव्हाच इव्हॅक्युएशन स्लाईड्सचा वापर करता येतो. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या (European Union Aviation Safety Agency) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, दरवाजा उघडल्यानंतर स्लाईड्स स्वयंचलित पद्धतीने तैनात होतात. स्लाईड्समध्ये सामान्यत: सहा ते दहा सेकंदांमध्ये हवा भरली जाते. यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हवामानाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्लाईड्स तैनात व्हायला हव्यात. उणे ४० अंश सेल्सिअस इतके थंड ते ७१ अंश सेल्सिअस इतके गरम हवामान असले तरीही स्लाईड्सने त्याचे काम चोखपणे बजावायला हवे. एक इंच प्रतितासापर्यंत पडणारा पाऊस आणि ४६ किमी/तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यातही या स्लाईड्सनी काम करणे अपेक्षित असते.