संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे ६७ हजार कोटी रुपयांच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली. या प्रस्तावांमध्ये लांब पल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालीसह विविध संरक्षण उपकरणांच्या खरेदीचा समावेश आहे. सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. आताच्या काळातले युद्ध समोरासमोर न लढता ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी लढली जात आहेत. त्यामुळे येत्या काळात सज्ज राहण्यासाठी भारत सरकार ड्रोन उत्पादनासाठी मोठ्या योजना आखत आहे. त्याशिवाय भारताने हे ड्रोन स्वदेशी पद्धतीने बनवण्याची योजनादेखील आखली आहे. medium-altitude long-endurance MALE अर्थात मध्यम उंची आणि दीर्घ सहनशीलता असलेल्या या MALE ड्रोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…
MALE ड्रोन बनवण्याची ही योजना काय आहे?
संरक्षण मंत्रालयाने अशा प्रकारच्या ८७ ड्रोनच्या खरेदीला मान्यता दिली आहे. राजनाथ यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदलासाठी कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सर्फेस क्राफ्ट, ब्राह्मोस फायर कंट्रोल सिस्टीम आणि लाँचरची खरेदी, बराक-१ पॉइंट डिफेन्स मिसाईल सिस्टीमचे अपग्रेडेशन यांनाही मंजुरी देण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सर्फेस क्राफ्टच्या खरेदीमुळे नौदलाला पाणबुडीविरोधी ऑपरेशन्समध्ये धोके ओळखण्याची आणि ते निष्प्रभ करण्याची क्षमता प्राप्त होईल. थर्मल इमेजरच्या खरेदीलादेखील मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रात्रीच्या वेळी ऑपरेशन्स राबवण्यास सैन्याला अधिक मदत होईल.
भारतीय हवाई दलासाठी माउंटन रडार खरेदी आणि स्पायडर शस्त्र प्रणाली अद्ययावत करण्यालाही मान्यता देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, माउंटन रडार तैनात केल्याने पर्वतीय भागात सीमांभोवती हवाई देखरेखीची क्षमता वाढेल. त्याच वेळी स्पायडर प्रणालीला इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी जोडल्याने हवाई संरक्षणाची क्षमता आणखी वाढेल. तसेच सी १७ आणि सी १३० या फ्लीट्सच्या देखभालीसाठी आणि एस ४०० लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या व्यापक वार्षिक देखभाल कराराला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत या ड्रोनच्या खरेदीसाठी २० हजार कोटी मोजावे लागतील. त्याबाबत एका भारतीय कंपनीचा परदेशी कंपनीशी करार होणार आहे. हे ड्रोन ६० टक्के स्वदेशी सामग्रीपासून तयार केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे ड्रोन इतर देशांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त काळ हवेत राहू शकतात. ते लांब पल्ल्यापर्यंत वाटचाल करू शकतात. तसेच त्यावर अनेक पेलोड आणि शस्त्रेदेखील वापरता येऊ शकतात. या ड्रोनमध्ये पाळत ठेवणे आणि प्रगत लढाऊ क्षमता असतील. हे ड्रोन ३० तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहू शकतील. तसेच त्यांना किमान ३५ हजार फूट उंची गाठता येऊ शकते. या ड्रोनच्या समावेशामुळे भारतीय सशस्त्र दलांची सीमाभागावर २४ तास देखरेख करण्याची कार्यक्षमता अधिक वाढेल.
हा निर्णय का घेण्यात आला?
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान ड्रोन आणि इतर शस्त्रांची गरज भासली. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ व ८ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तिन्ही भारतीय सैन्यदलांना उपकरणांची आवश्यकता होती.”
“आयएसआर अर्थात Intelligence, surveillance and reconnaissance आणि शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ८७ ड्रोनची किंमत सुमारे २० हजार कोटी रुपये असेल. आणखी ११ हजार कोटी रुपये १० वर्षांसाठी मूळ उपकरण उत्पादकांकडून लॉजिस्टिक आणि इतर वापरासाठी असतील”, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
MALE श्रेणीतील ड्रोनच्या समावेशामुळे तिन्ही सेवांची, त्यात प्रामुख्याने भारतीय हवाई दलाची पूर्व आणि पश्चिम सीमेवर लक्ष ठेवण्याची देखरेख क्षमता वाढू शकते”, असे एका अधिकाऱ्याने याआधी द हिंदू या वृत्तपत्राला सांगितले होते. गेल्या वर्षी अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोनच्या आधी भारताच्या ताफ्यात MALE ड्रोन समाविष्ट करण्याची आशा आहे. हे ड्रोन फक्त २०२९-३० पर्यंतच वितरित केले जातील. जानेवारी २०२४ मध्ये भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी बनावटीचे MALE ड्रोन मिळाले. हे ड्रोन अदानी डिफेन्स आणि इस्त्रायली कंपनी एल्बिट यांच्यातील करारांतर्गत हैदराबादमध्ये तयार करण्यात आले होते. दृष्टी १० स्टारलायनर म्हणून ओळखले जाणारे MALE ड्रोन ३६ तास हवेत राहू शकतात. त्यांना उपग्रह कनेक्टिव्हिटी आहे आणि ते ४५० किलो पेलोड नेऊ शकतात. एल्बिट कंपनीने तयार केलेल्या हर्मीस ९०० स्टारलायनरवर आधारित आहेत. भारतीय लष्कर आणि नौदलाने प्रत्येकी दोन ड्रोन समाविष्ट केले आहेत. एका सूत्राने सांगितले की, ड्रोनसाठी ७० टक्के स्वदेशी सामग्री होती. त्यावेळी भारतीय सशस्त्र दलांनी सांगितले होते की, ते सुमारे १५० MALE ड्रोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत.