scorecardresearch

Premium

विश्लेषण: महाराष्ट्रातील वाघ करू लागलेत शेकडो किलोमीटरची ‘पदयात्रा’! कारणे कोणती? समस्या काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघाने सुमारे २००० किलोमीटर प्रवास करुन ओडिशा राज्य गाठले.

reasons problems Tigers Maharashtra starting walking hundreds kilometers
महाराष्ट्रातील वाघ करू लागलेत शेकडो किलोमीटरची ‘पदयात्रा’! कारणे कोणती? समस्या काय? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘रेडिओ कॉलर’मुळे अलीकडच्या काही वर्षात वाघांचे स्थलांतर उघडकीस येऊ लागले असले, तरी ही यंत्रणा येण्याआधीदेखील वाघांचे स्थलांतर होत होते. ‘रेडिओ कॉलर’सह आणि त्याशिवाय वाघांनी दूर अंतरापर्यंत केलेल्या स्थलांतराच्या घटना अलीकडच्या तीन-चार वर्षात उघडकीस आल्या. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘वॉकर’ या नावाने प्रसिद्ध वाघाने ३०२० किलोमीटरचा प्रवास केला. तो ‘रेडिओ कॉलर’मुळे उघडकीस आला. तर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघाने सुमारे २००० किलोमीटर प्रवास करुन ओडिशा राज्य गाठले. विशेष म्हणजे या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ नव्हती.

वाघ स्थलांतर का करतात?

महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे तरुण नर वाघ अथवा वाघीण त्यांच्या अधिवासासाठी स्थलांतरित होत आहेत. याशिवाय वाघांनी स्थलांतर करण्याची अनेक कारणे आहेत. वाघांच्या मूळ अधिवासात इतर वाघाने प्रवेश केल्यास आणि तो वाघ त्याच्यापेक्षा वरचढ ठरल्यास हे स्थलांतर होते. बरेचदा तरुण आणि आईपासून नुकतेच वेगळे झालेले वाघ नवीन अधिवासाच्या शोधात स्थलांतर करतात. मानवी जीवनात वंशावळ वाढवणे ही जशी नैसर्गिक प्रक्रिया आहे, तीच प्राण्यांमध्येदेखील आहे. त्यामुळे ही वंशावळ पुढे नेण्यासाठी वाघ जोडीदाराच्या शोधात स्थलांतर करतात. शिकारीसाठी भटकंती हेही वाघ स्थलांतर करण्यामागील एक कारण आहे. एकाच क्षेत्रात एकापेक्षा अधिक वाघ असतील तर अशा वेळीदेखील वाघ स्थलांतर करण्याला प्राधान्य देतो.

kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
maratha community marathi news, economically backward marathi news
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
Eknath shinde devendra fadnavis 2
“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही”, लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक; म्हणाले, “आमच्याबरोबर दगाफटका…”
rohit pawar, baramati, lok sabha, supriya sule, sunetra pawar, ajit pawar, sharad pawar, maharashtra politics,
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान

नैसर्गिक स्थलांतर करण्यात धोका कोणता?

आईपासून नुकतेच वेगळे झालेले वाघाचे बछडे हे त्यांच्या निश्चित अधिवासासाठी आाणि सहचारिणी अथवा सहचर शोधण्यासाठी स्थलांतर करतात, तेव्हा मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडून येतात. बरेचदा गावशिवाराजवळ वाघ आढळून आला तर अतिउत्सुकतेपोटी त्याची छायाचित्रे काढण्यासाठी स्पर्धा लागते आणि अशा वेळी बिथरलेल्या वाघाकडून हल्ला होऊ शकतो. ‘सी१’ हा वाघाचा बछडा जेव्हा हिंगोलीत त्याच्या अधिवासाच्या शोधात फिरत होता, तेव्हा सुकडी गावातील लोकांनी अतिउत्सुकतेपोटी त्याची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला आणि वाघाच्या प्रतिहल्ल्यात त्यांना जखमी व्हावे लागले. याशिवाय स्थलांतर करताना बरेचदा वाघ राष्ट्रीय महामार्ग, नद्या, रेल्वे ओलांडतात. अशा वेळी त्यांच्या अपघाती मृत्यूचीदेखील शक्यता असते. स्थलांतर करताना वाघांना शिकाऱ्यांचाही धोका असतो.

वाघांच्या स्थलांतराचे फायदे काय?

वाघांच्या स्थलांतर प्रक्रियेमुळे अनेक नवे संचारमार्ग (कॉरिडॉर), जंगलांची संलग्नता उघडकीस आली आहे. त्यामुळे वाघांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या संचारमार्गाची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा वेळी त्या संचारमार्गाची सुरक्षितता राखणे हे वनखात्याचे काम आहे. महाराष्ट्रात अनेक वाघ स्थलांतर करून बाहेर गेले आहेत, पण आवश्यक असताना त्यावर अजूनही काम झालेले नाही. वाघांचे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करणे हे जनुकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे मानले जाते. वाघांच्या दीर्घकालीन जगण्यासाठी ‘कॉरिडॉर’ का महत्त्वाचे आहेत, हेदेखील या स्थलांतर प्रक्रियेतून स्पष्ट होते.

वाघांचे राज्यांतर्गत स्थलांतर कोणते?

न्यू नागझिरा अभयारण्यातून २०१४ साली ‘कानी’ नावाच्या वाघिणीने ६९.२ किलोमीटरचे अंतर पार करत नवेगाव अभयारण्यात स्थलांतर केले. २ ऑगस्ट २०१४ ला भरदिवसा ती कोका-चंद्रपूर या राज्य महामार्गावर आढळली. २३ नोव्हेंबर २०१४ ला चुलबंध धरण ओलांडून तिने जांबडीच्या दिशेने प्रयाण केले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ओलांडताना ती देवरीच्या गावकऱ्यांना दिसली आणि ३ डिसेंबर २०१४ ला नवेगाव अभयारण्यात तिचे स्थलांतर उघडकीस आले.

हेही वाचा… विश्लेषण: काँग्रेसमुक्त उत्तर भारत वि. भाजपमुक्त दक्षिण भारत! विधानसभा निकालांनी नवी विभागणी?

जुलै-ऑगस्ट २०१३ मध्ये नागझिरा अभयारण्यातून ‘जय’ नावाच्या वाघाने सुमारे ८० किलोमीटरचे अंतर पार करत उमरेड-करांडला अभयारण्यात स्थलांतर केले. त्यानंतर मे २०१७ मध्ये त्याच ‘जय’ या वाघाचा बछडा ‘बली’ने सुमारे १५० किलोमीटरचे अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले. जानेवारी २०१७ मध्ये कळमेश्वर कोंडाळीच्या राखीव जंगलातील ‘नवाब’ या नावाने प्रसिद्ध वाघाने अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात सुमारे १३५ किलोमीटरचे अंतर पार करून स्थलांतर केले. कळमेश्वरच्याच जंगलातून बोर अभयारण्यात एका वाघाने स्थलांतर केले.

वाघांचे राज्याबाहेरील स्थलांतर कोणते?

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘वॉकर’ या नावाने प्रसिद्ध वाघाने परराज्यातून स्थलांतर करत परत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. १४ महिन्यात या वाघाने ३०२० किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर आता ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघाने चार राज्यातील जंगल ओलांडत ओडिशा गाठण्यासाठी सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला. यापूर्वी फेब्रुवारी २०१३ मध्ये न्यू नागझिऱ्यातील ‘आयात’ या नावाने प्रसिद्ध वाघाने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी जंगलापर्यंत ६० किलोमीटरचे अंतर पार केले होते. तर ‘प्रिन्स’ने २०१०-११ मध्ये १२० किलोमीटरचे अंतर पार करत मध्यप्रदेश पेंच व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर केले होते.

rakhi.chavhan@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What are the reasons and problems for tigers in maharashtra starting walking for hundreds of kilometers print exp dvr

First published on: 08-12-2023 at 08:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×