सूर्यमालेतील तांबूस रंगाच्या मंगळ ग्रहावर एके काळी जीवसृष्टी होती, याचे पुरावे नासाच्या शास्त्रज्ञांना आढळले आहेत. मंगळावर असलेल्या नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने या ग्रहावरील काही खडकांची छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांचे विश्लेषण करणे सुरू असून मंगळावर एकेकाळी जीवसृष्टी असल्याचा हा भक्कम पुरावा असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. नासाच्या या ‘मंगळ’मय शोधाबद्दल…
नासाच्या शास्त्रज्ञांना मंगळावर काय आढळले?
नासाने २०२१ पासून पर्सिव्हरन्स नावाचा रोव्हर (यंत्रबग्गी) मंगळावर सोडला आहे. हा रोव्हर मंगळावर थेट जीवसृष्टी शोधू शकत नाही. पण या लाल ग्रहावरील नमुने गोळा करण्याची यंत्रणा या रोव्हरमध्ये आहे. गेल्या वर्षी या रोव्हरने मंगळावरील काही खडकांचे नमुने घेतले. हे खडक ज्या ठिकाणी आढळले, तिथे एके काळी नदी वाहत असावी, असे शास्त्रज्ञांना वाटते. सध्या ही कोरडी नदी आहे, पण तिथे लाखो वर्षांपूर्वी पाणी असावे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला आहे. या खडकांच्या शोधामुळे मंगळावर एकेकाळी जीवसृष्टी असल्याचा भक्कम पुरावा आहे, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
नासाचे शास्त्रज्ञ काय म्हणतात?
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात शास्त्रज्ञांनी अधोरेखित केले आहे की हा शोध मंगळावर भूतकाळातील जीवनाच्या शक्यतेला समर्थन देणाऱ्या सर्वात खात्रीलायक पुराव्यांपैकी एक आहे. स्टोनी ब्रूक विद्यापीठ (न्यूयॉर्क) च्या तज्ज्ञांनी अभ्यासलेल्या या खडकात रासायनिक अभिक्रियांमधून तयार झालेली दोन खनिजे आहेत. पृथ्वीवर अशा प्रक्रिया बहुतेकदा सूक्ष्मजीव क्रियाकलापांशी जोडल्या जातात. ‘‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रक्षेपित झालेल्या पहिल्या रोव्हर – पर्सिव्हरन्स रोव्हरने केलेला हा शोध मंगळावर जीवसृष्टीच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी आपण आतापर्यंत पोहोचलेल्या सर्वात जवळच्या शोधांपैकी एक आहे,’’ असे नासाचे प्रशासक शॉन डफी म्हणाले.
पर्सिव्हरन्स रोव्हरने अजून कोणते शोध लावले?
पर्सिव्हरन्स रोव्हरने नेरेट्वा व्हॅलिस नावाच्या कोरड्या नदीच्या खोऱ्याच्या काठावरील नीलम कॅन्यन नावाच्या खडकाचे नमुने घेतले आहेत. ३०० कोटी वर्षांपूर्वी हे खडक नदीच्या पाण्यात होते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. फेब्रुवारी २०२१ मध्ये हाच रोव्हर एका मोठ्या खड्ड्यात उतरला. या खड्ड्यातील खडकाचेही नमुने घेण्यात आले आहेत. हा खड्डा म्हणजे एक मोठा तलाव असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
पर्सिव्हरन्स रोव्हरचे लक्ष्य काय?
मंगळ ग्रहावरील नमुने गोळा करून, संग्रहित करून ते पृथ्वीवर परत आणण्याची पर्सिव्हरन्स रोव्हरची भविष्यातील मोहीम आहे. त्यामुळे अधिक तपशीलवार विश्लेषण करता येईल. रोव्हरने गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये संभाव्य जीवसृष्टी असल्याची पुष्टी करण्यासाठी तंत्र महत्त्वपूर्ण आहे. हे आधुनिक विज्ञानाचा आधारस्तंभ आहे, ज्यामुळे संशोधकांना दूरच्या ग्रहांवरही रासायनिक संयुगे, आण्विक संरचना आणि जैविक मार्कर ओळखण्यास सक्षम केले जाते.
रामन स्पेक्ट्रोस्कोपी आणि पर्सिव्हरन्स रोव्हर
पर्सिव्हरन्स रोव्हरमध्ये शेरलोक उपकरण मंगळावरील जीवनाच्या शोधात रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करते. रामन स्पेक्ट्रोस्कोपी हे एक क्रांतिकारी विश्लेषणात्मक तंत्र, रोव्हरने गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये संभाव्य जैवसृष्टीची पुष्टी करण्यासाठी महत्त्वपूर्ण तंत्र आहे. रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर रसायनशास्त्रात सामान्यतः स्ट्रक्चरल फिंगरप्रिंट प्रदान करण्यासाठी केला जातो, ज्याद्वारे रेणू ओळखले जाऊ शकतात. नोबेल पारितोषिक विजेते भारताचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी शोध लावलेल्या ‘रामन इफेक्ट’चा वापर या तंत्रात केला असल्याने त्याला रामन स्पेक्ट्रोस्कोपी असे नाव देण्यात आले आहे.