-अमोल परांजपे

ब्राझीलची राजधानी ब्रासिलियामध्ये रविवारी अभूतपूर्व घटना घडली. माजी अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी देशाचे प्रतिनिधीगृह, राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय, एवढेच काय तर सर्वोच्च न्यालायलात घुसून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. बरोबर दोन वर्षांपूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अशीच घटना घडली होती. तत्कालिन मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांचा कित्ता ब्राझीलमध्ये बोल्सोनारो यांच्या पाठिराख्यांनी गिरवला आहे. या दोन घटनांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अशा पद्धतीने सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न, ही प्रथा रूढ होऊ पाहतेय का, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
discontent among people against ruling parties leaders in china
चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध अफवांचा उच्छाद

ब्राझीलमधील घटनेची राजकीय पार्श्वभूमी काय?

अनेक वर्षांनंतर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या दबावानंतर ब्राझीलमध्ये झालेल्या ‘मुक्त’ निवडणुकीत देशाचे अतिउजवे अध्यक्ष बोल्सोनारो यांचा निसटता पराभव झाला. त्यांना ४९.२ टक्के मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी लुईस इनासिओ लुला डिसिल्वा यांना ५०.८ टक्के मते मिळाली. बोल्सोनारो यांनी अनेक आढेवेढे घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावापोटी अध्यक्षाची खुर्ची रिकामी केली आणि डाव्या विचारसरणीचे लढवय्ये नेते डिसिल्वा राष्ट्राध्यक्ष झाले. मात्र बोल्सोनारो यांना हा पराभव मान्य नाही. देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असून त्यामुळे आपला निसटता पराभव झाला, असा त्यांचा दावा आहे. त्यांचे समर्थकांनाही अर्थातच डिसिल्वा अध्यक्ष झालेले पचनी पडलेले नाही.

निवडणूक निकाल ते ८ जानेवारीदरम्यान काय घडले?

अध्यक्षीय निवडणुकीच्या अनेक फेऱ्यांनंतर ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात डिसिल्वा यांचा निसटता का होईना, विजय झाला. त्यानंतर बराच काळ तत्कालीन अध्यक्ष बोल्सोनारो यांनी जनतेला झुलवत ठेवले. एकीकडे निवडणूक प्रक्रियेवर टीका सुरू ठेवतानाच त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची तयारीही दाखविली. आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहनही केले. त्यांचे समर्थक मात्र डिसिल्वा यांचा शपथविधी होऊ नये, याच्या प्रयत्नात होते. निवडणूक निकाल लागल्यापासूनच देशात लहान-मोठ्या चकमकी झडत होत्या. बोल्सोनारो समर्थक रस्त्यावर उतरून १ जानेवारीचे डिसिल्वांचे पदग्रहण रोखण्याची मागणी करीत होते. या काळात बोल्सोनारो स्वतः शांत असले, तरी समाजमाध्यमांवर एक वेगळाच कट शिजत होता.

रविवारच्या दंगलीचा पाया कसा रचला गेला?

८ जानेवारीच्या रविवारी सर्व सरकारी कार्यालये आणि न्यायालयांवर निदर्शने करण्यासाठी जमण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर केले गेले. असा मोर्चा निघणार असल्याची कुणकुण पोलीस आणि सरकारी यंत्रणांना असली, तरी हे आंदोलन एवढे ऊग्र रूप धारण करेल याचा अंदाज कुणालाही आला नसावा. मात्र समाजमाध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर करून बोल्सोनारो समर्थकांच्या गटांनी निरोप पोहोचविण्याचे काम केले. विशेषतः राजधानी ब्रासिलियामध्ये जास्तीत जास्त समर्थक जमतील याची व्यवस्था केली गेली. सगळ्या देशात एकाच वेळी अराजक माजवून डिसिल्वा यांना सत्तेवरून खाली खेचण्याची योजना तयार झाली होती.

८ जानेवारीला ब्रासिलियामध्ये कशा घटना घडल्या?

ब्रासिलियामधील लष्करी मुख्यालय असलेल्या चौकात एक आठवड्यापासून बोल्सोनारो समर्थक जमण्यास सुरूवात झाली होती. रविवारी हा आकडा काही हजारांच्या घरात गेला. यातल्या मोठ्या गटाने तिथून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘प्राका दोस ट्रीस पोदेरेस’ (तीन सत्तास्थानांचा चौक) या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे मोर्चा काढला. मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या भागातून हा मोर्चा राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय, सर्वोच्च न्यायालय आदी अत्यंत महत्त्वाच्या इमारतींवर धडकला. अत्यंत संवेदनशील भागात पोहोचेपर्यंत पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना कोणतीही आडकाठी केली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दंगल आणि सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न कसा झाला?

महत्त्वाच्या इमारतीजवळ पोहोचल्यावर मोर्चा अधिक हिंसक झाला. दगडफेक करून इमारतींच्या काचा फोडण्यात आल्या. अनेक ठिकाणी आगी लावण्यात आल्या. हिंसाचार रोखण्यासाठी सरसावलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. ब्राझीलचे झेंडे हातात घेऊन जमाव या तिन्ही महत्त्वाच्या इमारतींमध्ये शिरला. ते प्रतिनिधीगृह, न्यायालय आणि सगळा देश आपला असल्याचे त्यांनी जाहीर केले. लष्कराने हस्तक्षेप करावा आणि डिसिल्वा यांची राष्ट्राध्यक्षपदावरून हकालपट्टी करून पुन्हा ‘खरे अध्यक्ष’ बोल्सोनारो यांच्याकडे सत्ता द्यावी, अशी मागणी आंदोलक करीत होते. दंगेखोरांनी इमारतींमधील साहित्याची नासधूस केली. अनेक मौल्यवान वस्तू लांबविल्या. देशाच्या सत्ताकेंद्रात अनेक तास गोंधळ घातल्यानंतर अखेर पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणला. रबरी गोळ्या, अश्रूधूर याचा वापर करून जमावाला पांगविण्यात आणि इमारतींवर पुन्हा ताबा मिळविण्यात सरकारी यंत्रणांना यश आले. याप्रकरणी आतापर्यंत किमान ४०० जणांना अटक करण्यात आली आहे.

ब्राझीलमधील दंगलीवर जगभरातून प्रतिक्रिया काय?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ब्राझीलमधील घटनेचा निषेध केला. लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. संयुक्त राष्ट्रांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. युरोप, दक्षिण अमेरिकेतील अनेक राष्ट्रप्रमुखांनी घटनेची निंदा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे या घटनेचा निषेध केला. लोकशाही परंपरांचा आदर राखला गेलाच पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. या घटनेचा जगभरातून निषेध झाल्यानंतर आता बोल्सोनारो यांनी हात झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

बोल्सोनारो यांचा या घटनेत हात किती?

या दंगलीला आणि हिंसक मार्गाने हत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नाला बोल्सोनारो जबाबदार आहेत, असा थेट आरोप डिसिल्वा यांनी केला आहे. अर्थातच बोल्सोनारो यांनी हा आरोप फेटाळला आहे. रविवारचा हिंसाचार उफाळण्यापूर्वी ४८ तास आधी ते अमेरिकेत निघून गेले होते. अर्थातच, ते देशाबाहेर असताना सत्ता उलथविण्याचा प्रयत्न करणे हा पूर्वनियोजित कटाचाच भाग असावा, अशी शंका अनेकांना आहे.

‘गुरू’च्या पावलावर ‘शिष्या’चे पाऊल…

बरोबर २ वर्षे २ दिवस आधी बोल्सोनारो यांचे गुरू डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात जुनी लोकशाही उलथवून टाकण्याचा अगदी असाच प्रयत्न केला होता. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या ‘द कॅपिटॉल’ या संसदभवनावर ट्रम्प समर्थकांनी दंगल घडविली होती. त्यांनाही निवडणुकीचा निकाल मान्य नव्हता, बोल्सोनारोंनाही नाही. वॉशिंग्टनमध्येही सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न झाला आणि ब्रासिलियामध्येही… ट्रम्प यांनी जबाबदारी झटकली आणि बोल्सोनारो यांनीही. मात्र या दोन घटनांनी एक गोष्ट मात्र निश्चित अधोरेखित केली आहे. ती म्हणजे लोकशाही मार्गाने सत्ता मिळाली नाही किंवा गमवावी लागली, तर ‘अंधभक्तां’करवी ती बळकाविण्याचा प्रयत्न करण्याची. आगामी काळात लोकशाही मानणाऱ्या सर्व देशांमधील यंत्रणांना त्यासाठी सावध राहावे लागणार आहे.

amol.paranjpe@expressindia.com