अभिजीत बेल्हेकर
जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ची उंची २९०३५ फूट. उंचीचे हे असामान्य आव्हान स्वीकारूनच १९२१ पासून मानवाने शिखर सर करण्याची मोहीम सुरू केली. पण, त्याला पहिले यश २९ मे १९५३ रोजी मिळाले. सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे ही ती पहिलीवहिली मानवी पावले. यंदा या यशाला सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तर वर्षांत ‘एव्हरेस्ट’ने गिर्यारोहण आणि या शिखराला अंगण बहाल करणाऱ्या नेपाळच्या आयुष्यात खूप बदल घडवले.




‘एव्हरेस्ट’चे आकर्षण कायम का आहे?
जगातील सर्वोच्च शिखर हे असामान्य बिरूद असल्याने ‘एव्हरेस्ट’ कायम एक आकर्षण आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. यातूनच पहिल्या यशानंतर शिखराचे ते सर्वोच्च टोक गाठण्याचे जणू वेडच लागले. दरवर्षी नव्या मोहिमा, नवी पावले या शिखराकडे धावू लागली. सुरुवातीच्या काही दशकात साधनांची कमतरता, चढाईतील तांत्रिक अडथळे आणि आर्थिक पाठबळाअभावी ही संख्या मर्यादित होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दशकांत जसजसे अडथळ्यांच्या या कड्या सुटत गेल्या तसे या ‘सरगमाथा’च्या दिशने शेकडो गिर्यारोहकांची पावले पडू लागली आहेत. सुरुवातीला दोन आकड्यात असलेली ही संख्या गेल्या पंचवीस वर्षांत शेकड्यात पोहोचली. यंदा तर या संख्येने टोक गाठत तब्बल ४७० गिर्यारोहकांनी ‘एव्हरेस्ट’साठी दोर बांधले. गेल्या सत्तर वर्षातील या असंख्य चढाया आणि संघर्षातून आतापर्यंत सात हजार ६२१ गिर्यारोहकांनी या सर्वोच्च माथ्याचा स्पर्श अनुभवला आहे.
अर्थव्यवस्थेला गती कशी मिळाली?
‘एव्हरेस्ट’सह अनेक महत्त्वाची हिमशिखरे नेपाळमध्ये वसली आहेत. या हिमशिखरांनी केवळ गिर्यारोहणच नाही,तर त्यातून नेपाळच्या अर्थकारणास मोठे बळ दिले आहे. या देशाच्या एकूण महसुली उत्पन्नात आज एव्हरेस्ट, अन्य गिर्यारोहण, पर्यटन यांचा वाटा ६० टक्क्यांच्या आसपास आहे. मोहिमांसाठी लागणारे सरकारी परवाना शुल्क, गिर्यारोहकांचे वास्तव्य, प्रवास या साऱ्यातून हे उत्पन्न मिळते. ‘एव्हरेस्ट’साठी लागणारे केवळ परवाना शुल्क ११ हजार डॉलर इतके आहे. या एकाच घटकातून नेपाळला मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज येईल. याशिवाय काठमांडूपासून ते एव्हरेस्ट पायथ्यापर्यंतच्या छोट्या गावांपर्यंतचा प्रवास, निवास, हॉटेल व्यवसाय, रुग्णालये, आरोग्य विमा, बाजारपेठा, मार्गदर्शक अशी मोठी साखळी यात गुंतली आहे. यातून स्थानिक रोजगार आणि नेपाळच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.
शेर्पांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली?
शेर्पांना गिर्यारोहणात चढाईच्या दोराएवढे महत्त्व असते. त्यांना या साहसी जगाची ‘लाइफलाइन’ म्हटले जाते. नेपाळ-तिबेटच्या प्रांतात पाच हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर जन्मलेली ही जमात जन्मत:च गिर्यारोहणाचे रक्त घेऊन आलेली. सुरुवातीला भारवाहक, दिशादर्शक आणि आता तर अनुभवी मार्गदर्शक म्हणून गिर्यारोहणात काम करत आहे. या शेर्पांच्या तीन-तीन पिढ्या आज या जगात कार्यरत आहेत. पूर्वी केवळ भारवाहक असणारे हे शेर्पा आता शिक्षण घेत आत्मनिर्भर आणि व्यावसायिक झाले आहेत. इंग्रजीसह अन्य भाषांवर प्रभुत्व मिळवत त्यांनी जगभर आपले व्यावसायिक जाळे विणले आहे. यातील काहींनी तर आता या क्षेत्रात ‘ट्रेकिंग एजन्सी’सारख्या कंपन्या सुरू केल्या आहेत. गिर्यारोहणात नावाजलेले शेर्पा या कंपन्यांमध्ये आज नोकरीवर आहेत. अन्य कामांसाठीही इथे शेकडो स्थानिकांना रोजगार दिला जातो. कामी रीता शेर्पा, पासांग दावा शेर्पा, अपा शेर्पा सारखे विक्रमवीर शेर्पा तर आज जगातील अनेक कंपन्यांचे व्यवसायदूत बनले आहेत. केवळ ‘एव्हरेस्ट’ आणि गिर्यारोहणाच्या जोरावर या शेर्पांनी गाठलेली ही नवी शिखरे म्हणावी लागतील.
वाढत्या गिर्यारोहणातून संकटांच्या मालिका का वाढल्या?
गिर्यारोहणाचा वाढता प्रसार आणि ‘एव्हरेस्ट’चे आकर्षण यामुळे या वाटेवर येणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. सहज मिळणारे परवाने, तांत्रिक साहाय्यापासून ते सर्व सुविधा पुरविणाऱ्या गिर्यारोहण कंपन्यांमुळे एव्हरेस्टचा प्रवेश तुलनेने सोपा झाला आहे. मात्र, ‘एव्हरेस्ट’च्या वाटेवरील अपघातही वाढले आहेत. मानवाचा वाढता वावर हिमालयाच्या रचनेला धोका निर्माण करत आहे. यातूनच हिमकडे कोसळणे, हिमदरीत अडकणे अशा आपत्ती सतत उद्भवत आहेत. अशा संकटांना तोंड देण्याची, त्यातून बचाव करण्याची अनेकांकडे कुवत नसल्याचे दिसून आलेले आहे. ‘एव्हरेस्ट’सारख्या शिखर चढाईसाठी लागणारी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पुरेशी क्षमता नसलेले अनेक जण केवळ पैसा आणि आकर्षणाच्या जोरावर इकडे वळू लागल्यामुळे या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे नोंदवतात.
पर्यावरणाचे नवे प्रश्न कसे निर्माण झाले?
‘एव्हरेस्ट’ परिसरातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक रचनेत वेगाने बदल होत आहेत. तापमानात वाढ होत असून हिमनद्या वितळू लागल्या आहेत. हिमभेगांचे वाढते प्रमाण, हिमकडे कोसळण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही या परिसरातील ढासळत्या पर्यावरणाकडे बोट दाखवत आहे. हिमशिखरांवरचा वाढता कचरा ही एक नवी समस्या बनली आहे. कृत्रिम प्राणवायूचे रिकामे सिलिंडर, सोडून दिलेले तंबू, अन्य साहित्य, प्लास्टिक आणि जागोजागी गेले अनेक वर्षे तसेच पडून असलेले मृतदेह हे या सर्वोच्च शिखरांपुढचे एक नवे संकट ठरले आहे. अनेक अभ्यासक यासाठी अनियंत्रित, वाढत्या गिर्यारोहणाला जबाबदार धरत त्याला वेळीच आवर घालण्याची मागणी करत आहेत. असे करू शकलो नाही तर यातून अनेक नवे प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
abhijit.belhekar@expressindia.com