अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये टॅरिफ धोरण आणि बेकायदा स्थलांतरिताचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आहे. अमेरिकेत ट्रम्प यांच्या या भूमिकेविरोधात सर्वत्र निदर्शने होत आहेत. त्यांनी आतापर्यंत देशातून लाखो लोकांना हद्दपार केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम राबवली जाईल असे निवडणूक प्रचारात म्हटले होते. त्या अंतर्गत एप्रिलपर्यंत तब्बल दोन लाख लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. आता ट्रम्प प्रशासन फ्लोरिडामध्ये स्थलांतरितांसाठी एक नवीन तुरुंग विकसित करत आहे. हे तुरुंग वन्यजीवांनी वेढलेले असणार आहे. या तुरुंगाचे नाव आहे, ‘अ‍ॅलिगेटर अल्काट्राझ.’ परंतु, ट्रम्प यांनी हे तुरुंग विकसित करण्याचा निर्णय का घेतला? हे तरुंग किती भयंकर आहे? त्यावरून वाद का निर्माण झालाय? याबद्दल जाणून घेऊयात.

सोमवारपासून फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्समध्ये अ‍ॅलिगेटर अल्काट्राझ तुरुंग विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

काय आहे ‘अ‍ॅलिगेटर अल्काट्राझ’ विकसित करण्याचे कारण?

सोमवारपासून फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्समध्ये अ‍ॅलिगेटर अल्काट्राझ तुरुंग विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. दक्षिण फ्लोरिडात असणाऱ्या या प्रदेशाचे क्षेत्रफळाचा ११,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हा परिसर तिथे आढळणाऱ्या वन्यप्राणी विशेषतः मगरींमुळे प्रसिद्ध आहे. हा परिसर मियामीपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. रिपब्लिकन गव्हर्नर रॉन डीसँटिस यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ आणि फ्लोरिडाचे अॅटर्नी जनरल जेम्स उथमेयर यांनी हे तुरुंग विकसित करण्याचा विचार मांडल्यानंतर याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या तुरुंगाचा वापर डेड-कॉलियर ट्रेनिंग अँड ट्रान्झिशन एअरपोर्टवरील यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) द्वारे ताब्यात घेतलेल्या स्थलांतरितांना ठेवण्यासाठी केला जाणार आहे. त्यानंतर त्यांना देशातून हद्दपार केले जाईल. या परिसराचे विकासकाम वेगाने सुरू असून अनेक जड खांब आणि ट्रेलर या ठिकाणी नेण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तुरुंगात जवळजवळ १००० कैद्यांना ठेवणे शक्य आहे. उथमेयर यांनी एका पॉडकास्टवर सांगितले की, याचे काम पूर्ण झाल्यावर तब्बल पाच हजार कैद्यांना ठेवणे शक्य होईल. त्यांनी असेही सांगितले की, या ठिकाणी जास्त सुरक्षा नसेल आणि बांधकामदेखील कमीत कमी असेल.

ते म्हणाले, “अटकेत असलेल्या स्थलांतरितांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्यांच्या आजूबाजूला मगरी आणि अजगरांशिवाय काहीही दिसणार नाही. या तुरुंगातून बाहेर पडल्यास कुठेही जायची सोय किंवा लपण्याची जागा नाही.” उथमेयर यांनी एक्सवरील एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे, “हा तुरुंग कमी खर्च आणि मेहनतीने विकसित होणार आहे. आम्हाला खूप बांधकाम करण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले. ‘डीएचएस’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे की, या सुविधेसाठी प्रशासनाला दरवर्षी सुमारे ४५० दशलक्ष डॉलर्स इतका खर्च येईल. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (फेमा)द्वारे यासाठी निधी दिला जाईल.

होमलँड सिक्युरिटीप्रमुख क्रिस्टी नोएम यांनी एका निवेदनात म्हटले, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गुन्हेगार, बेकायदा स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्यासाठी किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण मार्गांनी अगदी युद्धपातळीवर काम करत आहोत. फ्लोरिडाबरोबरच्या आमच्या भागीदारीमुळे आम्ही काही दिवसांत या तुरुंगाचा विस्तार करून बेड स्पेस वाढवणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या तुरुंगामुळे का निर्माण झालाय वाद?

या तुरुंगाचा विकास पर्यावरणासाठी घातक असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. या तुरुंगाचे स्थान आणि निसर्ग व वन्यजीवांवर त्याचा संभाव्य परिणाम, यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बांधकामांमुळे फ्लोरिडा परिसंस्थेचा एक महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग असलेल्या पाणथळ जागेचे नुकसान होण्याची भीती पर्यावरणवाद्यांना आहे, असेही सांगितले जात आहे. या प्रदेशात मॅनेटी, फ्लोरिडा पँथर, सारस, अमेरिकन मगर आणि काही समुद्री कासव प्रजाती व बर्मी अजगर यांसारख्या अनेक धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत. मिकोसुकी येथील मूळ असणाऱ्या आणि अमेरिकन समुदायाच्या सदस्या बेट्टी ओसेओला यांनी बीबीसीला सांगितले की, पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल मला गंभीर चिंता आहे.” “त्या म्हणाल्या, “एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क आणि बिग सायप्रस नॅशनल प्रिझर्व्हने वेढलेली ही जमीन देशातील सर्वात नाजूक परिसंस्थांपैकी एक आहे,” फ्रेंड्स ऑफ द एव्हरग्लेड्स या वकिली गटाच्या निवेदनात म्हटले आहे, “भूतकाळातील चुका पुन्हा करू नका.”

काही पर्यावरणीय हक्क गटही याकडे दुर्लक्ष करत आहेत. फ्लोरिडाच्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (एसीएलयू) ने एका निवेदनात म्हटले आहे की, हे तुरुंग क्रूर आहेत. त्यातून नमूद करण्यात आले आहे की, आपल्या इमिग्रेशन प्रणालीत लोकांना शिक्षा करण्याचे कम सुरू आहे. मैमीडेडचे महापौरदेखील चिंतीत आहेत. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मियामी-डेड काउंटीच्या महापौर डॅनिएला लेव्हिन कावा यांनी फ्लोरिडा डिव्हिजन ऑफ इमर्जन्सी मॅनेजमेंटला पत्र लिहिले आहे. “या बाबींवर पूर्णपणे चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही आणि सरकारकडून या परिसराच्या विकासाचा वेग अचानक वाढल्याने या चिंतांकडे तुम्ही लक्ष द्या,” असे त्या म्हणाल्या.

परंतु, डीसँटिसच्या प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन केले आहे. “राज्यपाल डीसँटिस यांनी आग्रह धरला आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली फ्लोरिडा राज्य संघीय सरकार हे इमिग्रेशन कायद्याची अंमलबजावणी करण्यास मदत करेल,” असे डीसँटिसच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.