मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये विविध राज्यांचे शासक आपापसांत मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्यासाठी एकमेकांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देत आले आहेत. बरेचदा देशादेशांमधील करार, तह अथवा ठराव करतानाही मुत्सद्देगिरी म्हणून दोन राज्ये वा देशांमध्ये काही वस्तूंचेही आदान-प्रदान होत आले आहे. आधुनिक जगामध्ये याला ‘पॉलिटिकल डिप्लोमसी’ (राजकीय मुत्सद्देगिरी) असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर डिप्लोमसी म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एखादा व्यवहार प्रत्यक्षात आणण्यासाठी वा तंटे सोडविण्यासाठी एकमेकांप्रति दाखविलेला चांगुलपणा असतो. अशी मुत्सद्देगिरी कशाही स्वरूपात दाखवली जाऊ शकते. उदाहरणार्थ- आंतराराष्ट्रीय राजकारणामध्ये ‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’ ही एक प्रभावी पद्धत सर्रास वापरली जाते. अलीकडेच मलेशियाने याच पद्धतीचा वापर करीत ‘ओरांगउटान डिप्लोमसी’ सुरू केली आहे. मलेशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पाम तेल उत्पादक देश आहे. पर्यावरणाच्या समस्येबाबत असलेली देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी मलेशिया ‘ओरांगउटान डिप्लोमसी’चा वापर करीत आहे.

काय आहे मलेशियाची ओरांगउटान डिप्लोमसी?

ओरांगउटान ही वानराची एक सुप्रसिद्ध प्रजाती असून, ती मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे जे देश पाम तेल खरेदी करतात, त्यांना ओरांगउटान देण्याचा निर्णय मलेशियाने घेतला आहे. वानराची ही प्रजाती दुर्मीळ होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे पाम तेल उद्योगामुळेच त्यांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर मलेशियाकडून ओरांगउटानबद्दल असलेली चिंता व्यक्त करण्यासाठी या डिप्लोमसीचा वापर केला जात आहे. याआधी चीनने अशाच प्रकारे ‘पांडा डिप्लोमसी’ आणली होती. त्याचेच अनुकरण मलेशिया करीत आहे. पाम तेल उत्पादनामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणासंदर्भातील चिंता या डिप्लोमसीमुळे कमी होईल, अशी आशा मलेशियाला आहे. अशा प्रकारचे धोरण अपारंपरिक असले तरीही ते सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून जागतिक राजकारणामध्ये आपले इप्सित साध्य करण्यासाठीचे एक प्रभावी साधन मानले जाते.

हेही वाचा : मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे केरळमध्ये चिमुरडीचा मृत्यू; काय आहे प्रकरण?

‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’ कशी काम करते?

‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’मध्ये दोन देश एकमेकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी देशातील प्राण्यांची देवाण-घेवाण करतात. बरेचदा या देवाण-घेवाणीमध्ये दिले जाणारे प्राणी त्या देशाची ओळख असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मुत्सद्देगिरीला सांस्कृतिकदृष्ट्याही एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. उदाहरणार्थ, फार पूर्वापार काळापासूून चीन ‘पांडा डिप्लोमसी’चा वापर करीत आला आहे. चीनच्या तांग राजवंशातील सम्राट शांतता आणि सहकार्याचे प्रतीक म्हणून इतर शासकांना पांडा भेट द्यायचे.

‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’बाबतचा इतिहास काय सांगतो?

प्राचीन मानवी संस्कृतीमध्येही अ‍ॅनिमल डिप्लोमसीच्या नोंदी आढळतात. इजिप्तमधील सम्राट आपल्या संपत्ती आणि सत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी इतर देशांतील सम्राटांना दुर्मीळ प्राणी द्यायचे. इसवी सन पूर्व १५०० मध्ये इजिप्तचा सम्राट हॅटशेपसटने सीरियाच्या राजाला भेट म्हणून एक जिराफ पाठविला होता. मध्ययुगीन काळामध्ये युरोपातील सम्राट निसर्गावरील त्यांचा अधिकार दाखविण्यासाठी सिंह आणि वाघ यांसारख्या प्राण्यांची वारंवार देवाणघेवाण करायचे. हे प्राणी सत्तेचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जायचे. अगदी आशियामध्येही दोन शासकांमध्ये आदर आणि एकतेचे प्रतीक म्हणून हत्तींची देवाण-घेवाण व्हायची.

‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’साठी चीन प्रसिद्ध का?

अ‍ॅनिमल डिप्लोमसीची सुरुवात चीनमधून झाल्याचे मानले जाते. तांग वंशातील सम्राट (इसवी सन ६१८-९०७) इतर सम्राटांना शांती आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून पांडा भेट द्यायचे. चीन या धोरणाचा वापर आजतागायत करताना दिसून येतो. नोव्हेंबर २०२३ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले होते. या यशस्वी बैठकीनंतर चीनने ‘पांडा डिप्लोमसी’चा वापर करीत अमेरिकेला पांडा भेट दिला होता.

हेही वाचा : निबंध लिहिण्याच्या अटीसह मुलाला जामीन; वडिलांना अटक, असं का?

मलेशियाची ‘ओरांगउटान डिप्लोमसी’ काय आहे?

पर्यावरणाच्या समस्या कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मलेशिया या डिप्लोमसीचा वापर करीत आहे. ओरांगउटानच्या संवर्धनासाठी इतर देशांना आपल्याबरोबर जोडणे हे मलेशियाच्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. मलेशिया हा जगातील दुसरा सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. तिथे पाम तेलाच्या लागवडीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे. त्यामुळे मलेशियावर आजवर टीकाही झाली आहे. या जंगलतोडीमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर असलेले ओरांगउटान आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ‘ओरांगउटान डिप्लोमसी’च्या माध्यमातून मलेशिया आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने ओरांगउटानच्या संवर्धनासाठी इतर देशांबरोबर सहकार्य करणे, पर्यावरणपूरक पद्धतीने पाम तेलाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे हा या धोरणाचा भाग आहे.